Monday, September 7, 2026

७ सप्टेंबर १९९३ : जेव्हा महाराष्ट्रातील विद्यार्थी मुंबईत उतरले

Share

शिक्षणाच्या प्रश्नांवर दोन वर्षांची तयारी, राज्यभर विद्यार्थी संपर्क आणि ७ सप्टेंबरला आझाद मैदानातून निघालेला सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा मोर्चा….


मुंबईतील सकाळची वेळ. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर विद्यार्थी येत होते. कोणी रेल्वेने आले होते, कोणी बसने. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले विद्यार्थी एकाच ठिकाणी जमा होत होते. हातात फलक होते. काहींच्या हातात झेंडे होते. घोषणांचा आवाज वाढत होता.

दिनांक ७ सप्टेंबर १९९३
दुपारी बारा वाजता आझाद मैदानातून विद्यार्थ्यांचा मोर्चा विधानभवनाच्या दिशेने निघाला. हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेला ‘विराट विद्यार्थी मोर्चा’ होता. उपलब्ध नोंदींनुसार, या मोर्चात सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. पण त्या दिवसाची गोष्ट केवळ मोर्चाच्या संख्येपुरती मर्यादित नाही. या मोर्चामागे जवळपास दोन वर्षांची तयारी होती. महाराष्ट्राच्या विविध भागांत जाऊन विद्यार्थ्यांशी केलेला संवाद आणि त्यांच्या शैक्षणिक प्रश्नांवर उभे केलेले आंदोलन यामागे होते.

एक लाख विद्यार्थ्यांचे लक्ष्य
या मोर्चाच्ची सुरुवात १९९१ मध्ये झाली. अभाविपच्या महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या अडचणी, शिक्षणव्यवस्थेतील प्रश्न, भ्रष्टाचार आणि प्रशासनाची उदासीनता याबाबत चर्चा झाली. या प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा निर्णय झाला. त्यातून मुंबईत एक लाख विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले. मोर्चा विधानभवनाच्या दिशेने नेण्याचे ठरले आणि तारीख निश्चित झाली—७ सप्टेंबर १९९३. एक लाख विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी मुंबईत आणण्याचे लक्ष्य होते. त्यासाठी आधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते.

दोन वर्षे महाराष्ट्रभर विद्यार्थी संपर्क
कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहोचले. महाविद्यालयांमध्ये बैठका घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. शैक्षणिक प्रश्नांचा अभ्यास करण्यात आला. त्या काळात संपर्कासाठी आजसारखी साधने उपलब्ध नव्हती. इंटरनेट नव्हते. सोशल मीडिया नव्हता. मोबाईल फोन सर्वसामान्यांच्या वापरात नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आधार होता प्रत्यक्ष संपर्क. दिवसभर महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि रात्री पोस्टर, भित्तीचित्रे व प्रचाराचे काम करणे, अशी तयारी सुरू होती. या काळात राज्यभर सुमारे आठ लाख विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यात आला. मोर्चा मुंबईतील कार्यक्रम न राहता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विषय व्हावा, यासाठी जिल्हानिहाय काम करण्यात आले.

‘आरंभ है प्रचंड’
मोर्चाच्या तयारीला दिशा देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात विद्यार्थी नेत्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनात ५०७ विद्यार्थी नेत्यांनी सहभाग घेतला. या संमेलनात राजेश पांडे, बाळासाहेब आपटे आणि अरुण जेटली यांनी भाषणे केली. या काळात विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झालेली घोषणा होती-

“उठ मित्रा, उगार मुठ —
शिक्षणाच्या बाजारातील तूच थांबव तुझी लूट”

मोर्चाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील विविध भागांत कार्यक्रम सुरू होते.

महाराष्ट्र मुंबईकडे निघाला
मोर्चासाठी केवळ मुंबईतील विद्यार्थी नव्हते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश, मराठवाडा आणि जनजाती भागांतून विद्यार्थी मुंबईत येणार होते. त्यासाठी प्रवासाचे नियोजन करण्यात आले. रेल्वे आणि बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली गेली. भोजनाची व्यवस्था करण्यात आली. मुंबईत स्वागतकक्ष उभारण्यात आले. विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र नोंदणी आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कोणत्या भागातून किती विद्यार्थी येणार, त्यांचा प्रवास कसा असेल, मुंबईत त्यांची व्यवस्था कुठे होईल, याचे नियोजन आधीच करण्यात आले होते.
मोर्चाच्या तयारीचे जळगाव येथील उदाहरण पहायचे झाल्यास तेथील कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांमध्ये बैठका घेतल्या. महाविद्यालये आणि वसतिगृहांमध्ये संपर्क केला. मोर्चाच्या आधीपासून अनेक कार्यकर्ते कार्यालयात राहून तयारी करत होते. या सुनियोजित कामाचा परिणाम म्हणून मोर्चात सर्वाधिक संख्या जळगाव जिल्ह्यातून आली होती.

७ सप्टेंबर : आझाद मैदानातून मोर्चा
७ सप्टेंबरच्या सकाळपासून विद्यार्थी आझाद मैदानाकडे येऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील आझाद मैदान हे मोर्चाचे प्रारंभिक ठिकाण होते. मैदानात विद्यार्थी जमा होत होते. घोषणा सुरू होत्या…..

“शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!”

दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. आझाद मैदानातून मोर्चा विधानभवनाच्या दिशेने निघाला. विद्यार्थ्यांच्या हातात मागण्यांचे फलक आणि बॅनर होते. शिक्षणाशी संबंधित प्रश्न या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते. मोर्चातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. तरीही मोर्चा शिस्तीत पुढे जात होता.

मोर्चा काळा घोडा परिसरात पोहोचला. तिथे सभेचे आयोजन करण्यात आले. पण आझाद मैदानातून विद्यार्थ्यांचे येणे सुरूच होते. त्यामुळे पुढचा भाग काळा घोड्यापर्यंत पोहोचला असतानाही मागून विद्यार्थी मोर्चात सहभागी होत होते. सभेला सुनील राजे यांच्या भाषणाने सुरुवात झाली. त्यानंतर अन्य विद्यार्थी नेत्यांची भाषणे झाली. यानंतर राजेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळ शिक्षणमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अभाविपच्या स्मरणलेखानुसार, शिक्षणमंत्री भेटीसाठी उपलब्ध झाले नाहीत. त्यानंतर मागण्यांचे निवेदन त्यांच्या दालनाबाहेर लावण्यात आले.

सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थी
अभाविपच्या अधिकृत संकेतस्थळावरील स्मरणलेखात एक लाख विद्यार्थ्यांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे आणि प्रत्यक्ष सहभाग त्यापेक्षा अधिक झाल्याचे नमूद आहे. अभाविपचा इतिहास सांगणाऱ्या ध्येय-यात्रा भाग १ या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार १३०९६७ विद्यार्थी व ५६०७ विद्यार्थिनी अशा एकूण १३६५७४ विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. या मोर्चाचे महत्त्व केवळ त्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत नव्हते. १९९१ मध्ये सुरू झालेली चर्चा, त्यानंतरचा राज्यभर विद्यार्थी संपर्क, शैक्षणिक प्रश्नांचा अभ्यास, महाविद्यालयांमधील बैठका, पोस्टर आणि भित्तीचित्रे, प्रवासाचे नियोजन, भोजन आणि नोंदणीची व्यवस्था—या सगळ्या कामातून ७ सप्टेंबरचा मोर्चा उभा राहिला. त्या काळात उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये हे काम करण्यात आले.
एका जिल्ह्यातील प्रश्न दुसऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि वेगवेगळ्या भागांतील विद्यार्थ्यांना एका विषयावर एकत्र आणणे, हा या तयारीचा महत्त्वाचा भाग होता. मोठ्या संख्येने विद्यार्थी एका शैक्षणिक विषयावर एकत्र येऊ शकतात, हे या मोर्चातून दिसून आले. आजच्या काळात विद्यार्थी आपल्या प्रश्नांसाठी सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि इतर माध्यमांचा वापर करतात. १९९३ मध्ये ही साधने नव्हती. प्रत्यक्ष विद्यार्थी संपर्क हाच मुख्य मार्ग होता.


म्हणून ७ सप्टेंबर १९९३ची आठवण केवळ एका मोठ्या मोर्चाची नाही. ती शैक्षणिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची, संघटन उभे करण्याची आणि त्या प्रश्नांना शासनासमोर निर्भीडपणे मांडण्याची आहे. हा दिवस त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्यार्थी चळवळीच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून नोंदवला गेला.

ऋषिकेश कासंडे

अन्य लेख

संबंधित लेख