Monday, September 7, 2026

नवे स्वातंत्र्य, अचूक नकाशाचे!

Share

– सत्यजित जोशी

एखादा नकाशा हा सुद्धा एक राजकीय प्रश्न बनू शकतो, याचा शोध अचानक जगाला लागला आहे. चार सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ‘करेक्ट द मॅप’ नावाचा एक ठराव संमत केला. यामध्ये विशेषतः आफ्रिका खंडाचे अधिक न्याय्य आणि प्रमाणबद्ध भौगोलिक प्रतिनिधित्व रेखाटण्याचे आवाहन आहे. या ठरावाच्या बाजूने १६४ तर विरोधात केवळ १ मतदान झाले, तर सहा देश तटस्थ राहिले. विशेष म्हणजे, या ठरावाला विरोध करणारा अमेरिका हा एकमेव देश होता; तर भारताने याच्या बाजूने कौल दिला. वरवर पाहता हा विषय केवळ तांत्रिक वाटू शकतो. आपण वापरत असलेले प्रचलित ‘मर्केटर प्रोजेक्शन’ (Mercator projection) ध्रुवीय प्रदेशांजवळील भूप्रदेशांचे आकारमान अवाजवी मोठे दाखवून नकाशात विकृती निर्माण करते. याउलट, ‘इक्वल अर्थ’ (Equal Earth) सारख्या समान-क्षेत्रफळ दर्शवणाऱ्या पद्धती वेगळे आणि वास्तववादी दृश्यरूप देतात. परंतु, या ठरावाचे महत्त्व केवळ नकाशाशास्त्रा पुरते मर्यादित नाही.

प्रत्येक नकाशा ही एक तडजोड असते. पृथ्वी गोल आहे आणि नकाशा सपाट. त्यामुळे क्षेत्रफळ, आकार, अंतर किंवा दिशा यांपैकी कशाचा तरी बळी द्यावाच लागतो. सोळाव्या शतकात उदयास आलेले मर्केटरचे नकाशाशास्त्र दर्यावर्दीसाठी उपयुक्त ठरले. ते कोपरे आणि दिशा अचूक दर्शवत होते. मात्र, त्या काळातील नाविक मोहिमांच्या पोटात साम्राज्य विस्तार आणि ख्रिश्चन धर्मप्रचार होता. या नकाशाची सर्वांत मोठी त्रुटी म्हणजे, ध्रुवांच्या जवळ असलेले प्रदेश त्यांच्या मूळ आकारापेक्षा खूपच मोठे दिसतात. परिणामी, मर्केटरच्या नकाशात ग्रीनलँड हा आफ्रिका खंडाएवढा दिसतो; जरी प्रत्यक्षात आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा कित्येक पटीने मोठा असला तरीही!

परंतु, राजकारण इथेच थांबत नाही, ते दुसऱ्याच पातळीवर प्रवेश करते. जेव्हा एखादे विशिष्ट प्रतिनिधित्व पिढ्यानपिढ्या वर्गखोल्या, अ‍ॅटलास, कार्यालये आणि प्रसारमाध्यमांतून एकमेव प्रमाण म्हणून वापरले जाते, तेव्हा ते मानवी ‘ज्ञानाचा’ भाग बनते. नकाशा हा केवळ जगाचे चित्र उरत नाही, तर जग समजून घेण्याच्या मानवी मानसिकतेचा एक अविभाज्य भाग बनतो.

इथेच वसाहतवाद आणि साम्राज्यवादाचा प्रवेश होतो. मर्केटरचा नकाशा केवळ युरोपचे उदात्तीकरण करण्यासाठी बनवला गेला नव्हता, तर तो ज्ञान आणि सत्तेच्या समीकरणाचा इतिहास होता. साम्राज्यवाद्यांना आपल्या नियंत्रणाखालील प्रदेशांची मोजणी, पाहणी, वर्गीकरण, नामकरण आणि प्रशासन करण्यासाठी अशा साधनांची गरज होती. वसाहतवादी राज्यकर्ते केवळ सैन्याच्या बळावर राज्य करत नव्हते; तर त्यांनी श्रेणी, जनगणना, सर्वेक्षणे, नकाशे आणि दप्तरखाना याद्वारे सत्ता निर्माण केली. प्रदेशाचा नकाशा तयार करणे म्हणजे सत्तेसाठी तो प्रदेश सुगम आणि नियंत्रित करणे होते.

भारताला हा इतिहास जवळून ठाऊक आहे. इंग्रजांचे ‘ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हे’ हे साम्राज्यशाहीपासून अलिप्त असे शैक्षणिक संशोधन नव्हते; तर भौगोलिक ज्ञान हे ब्रिटिश भारताला समजून घेण्याचे आणि त्याच्यावर राज्य करण्याचे साधन बनले होते. त्यामुळे वसाहतवादाने केवळ राजकीय संस्थाच मागे सोडल्या नाहीत, तर जगाचे वर्णन करण्याच्या ठोकळेबाज सवयीही मागे सोडल्या. साम्राज्यवादाचा सर्वात मोठा वारसा हा नव्हता की परकीय आपल्यावर राज्य करत होते; तर परकीय राजवटीत निर्माण झालेल्या व्यवस्था पुढे ‘वस्तुनिष्ठ आणि नैसर्गिक वास्तव’ म्हणून स्वीकारल्या गेल्या, हा होता. म्हणूनच, नकाशांबद्दलच्या या वादाकडे बौद्धिक आळस न दाखवता अत्यंत गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. सत्तेच्या संस्था हे ठरवतात की कोणते प्रतिनिधित्व प्रामाणिक मानले जावे. एकदा का अधिकारशाही आणि पुनरावृत्ती एकत्र आली की, पाहण्याची एक विशिष्ट पद्धत हीच ‘नैसर्गिक सत्य’ वाटू लागते.

अँटोनियो ग्राम्शीने राजकीय संदर्भात हीच प्रक्रिया स्पष्ट केली होती. ‘वर्चस्व’ (Hegemony) हे केवळ दडपशाहीवर चालत नाही. जेव्हा एखादे विशिष्ट जगणे आणि जग पाहण्याचा दृष्टिकोन हा सामान्य, परिचित आणि उघड सत्य वाटू लागतो, तेव्हा ते वर्चस्व यशस्वी होते. नकाशाशास्त्रही या प्रक्रियेत सहभागी होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न हा नाही की नकाशा कोणी काढला, तर तो नकाशा ‘प्रमाण’ मानण्याचे निकष कोणी प्रस्थापित केले?

अल्फ्रेड कोर्झिबस्कीचे “नकाशा म्हणजे प्रत्यक्ष भूप्रदेश नव्हे” (The map is not the territory) हे प्रसिद्ध विधान या वादाची दार्शनिक किल्ली प्रदान करते. वास्तव वेगळे असते आणि आपले वास्तवाचे सादरीकरण वेगळे असते. परंतु, मानवी समाज चित्रांशिवाय वास्तवाचा अनुभव क्वचितच घेतो. आपण संकल्पना, श्रेणी, आकडेवारी, नकाशे, कथा आणि प्रतिकांच्या माध्यमातून आपले अनुभव व्यवस्थित मांडतो. एखादे प्रतिनिधित्व त्रुटीपूर्ण असले, तरी ते अत्यंत शक्तिशाली बनू शकते.

म्हणूनच, युनोचा हा ठरावाचा प्रयत्न रंजक आहे; कारण तो वारसाहक्काने मिळालेल्या दृश्य-विषमतेविरुद्धचा एक लहान पण स्पष्ट बंड पुकारतो. याचे समर्थक असे मानतात की, जगाचे प्रतिनिधित्व करताना काही प्रदेशांचे आकार अवाजवी फुगवून दाखवणे आणि इतरांना दृष्यदृष्ट्या दुय्यम ठरवणे थांबवले पाहिजे. हा ठराव मर्केटर नकाशावर बंदी घालत नाही किंवा कोणतीही एकच पद्धत सक्तीची करत नाही. तो केवळ भूप्रदेशांचे सापेक्ष क्षेत्रफळ अचूक दाखवणाऱ्या पद्धतींचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देतो. हा फरक महत्त्वाचा आहे. प्रतिनिधित्वात सुधारणा करणे म्हणजे भूगोलाचे पुनर्रचना करणे नव्हे.

या सर्व संघर्षाला एक महत्त्वाचा भारतीय पदरही आहे. वि-वसाहतीकरण (Decolonisation) म्हणजे केवळ परकीय ध्वज, पुतळे किंवा नावे हटवणे नव्हे. तर inherited categories कडे (वारसाहक्काने मिळालेल्या संकल्पनांकडे) समीक्षात्मक दृष्टीने पाहण्याचा आत्मविश्वास आणि आत्मभान प्राप्त करणे होय. भारताला पाश्चात्य ज्ञानाचा त्याग करण्याची गरज नाही; परंतु केवळ शक्तिशाली देशांनी संस्थात्मक रूप दिले म्हणून ते ज्ञान ‘वैश्विक’ बनते, हा समज नाकारणे गरजेचे आहे. बौद्धिक स्वांतत्र्य म्हणजे उपयुक्त ज्ञान आणि वारशाने आलेली विषमता यातील फरक ओळखण्याची क्षमता होय.

मात्र, या कथेतील सर्वात रंजक भाग हा आहे की, कागदी नकाशांचे युग संपून आता ‘अल्गोरिदम’चे युग सुरू झाले आहे. आजचे नवे नकाशाकार हे सर्च इंजिन्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, रेकमेंडेशन सिस्टीम्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे आहेत. ते सातत्याने वास्तवाचे नवे नकाशे तयार करत असतात—काय आधी दिसावे, काय खाली ढकलले जावे, कशावर प्रकाश टाकावा, कशाकडे दुर्लक्ष करावे, कशाला मुख्य प्रवाह म्हणावे आणि कशाला उपेक्षित ठरवावे?

कालच्या काळात, साम्राज्यशाही सत्ता प्रदेशांचे नकाशे कसे काढायचे हे ठरवत होती. आजच्या डिजिटल युगात, तांत्रिक सत्ता ही मानवी मनाच्या नकाशात विचार, संस्कृती, इतिहास आणि माणसांना कसे स्थान द्यायचे हे ठरवत आहे. प्रश्न आता “ते कुठे आहे?” असा राहिला नसून, “यंत्रणेत ते किती ठळकपणे दिसते?” असा झाला आहे. म्हणूनच, युनोच्या या तांत्रिक वाटणाऱ्या ठरावाचे वाचन अधिक व्यापक दृष्टिकोनातून होणे गरजेचे आहे. प्रतिनिधित्वाचा लढा कधीही कागदावर संपत नाही; तो ज्ञान आणि सत्ता, वास्तव आणि आभास, आणि जे अस्तित्वात आहे ते विरुद्ध लोकांना जे पाहायला शिकवले जाते, यांमधील संघर्षाशी जोडलेला आहे.

एक विकृत नकाशा संपूर्ण खंडाचे चुकीचे चित्र उभे करू शकतो. परंतु, मानवी मनाच्या आत असलेला विकृत नकाशा संपूर्ण संस्कृतीचा विपर्यास करू शकतो. पहिला नकाशा प्रोजेक्शन बदलून दुरुस्त करता येतो; पण दुसऱ्यासाठी अत्यंत कठीण गोष्टीची गरज असते—ती म्हणजे ‘बौद्धिक स्वांतत्र्य’.

…………..

सध्याचा नकाशा (Mercator Projection) विरुद्ध नवा नकाशा (Equal Earth Projection)

वैशिष्ट्येसध्याचा नकाशा (Mercator Projection)नवा संभाव्य नकाशा (Equal Earth / Gall-Peters)
मुख्य उद्देश१६ व्या शतकातील सागरी जहाजांच्या दिशा आणि कोन अचूक ठेवणे.सर्व खंडांचे आणि देशांचे वास्तविक क्षेत्रफळ (Real Area) दाखवणे.
आफ्रिका आणि ग्रीनलँडग्रीनलँड आणि आफ्रिका खंड आकाराने सारखेच दिसतात.आफ्रिका हा ग्रीनलँडपेक्षा १४ पटीने मोठा स्पष्ट दिसतो.
भारत आणि युरोपयुरोपचा आकार प्रचंड मोठा, तर भारत आणि दक्षिण आशिया लहान वाटतो.भारत हा संपूर्ण युरोप खंडाच्या जवळजवळ निम्म्या आकाराचा अचूक प्रमाणात दिसतो.
उत्तर दक्षिण गोलार्धउत्तर गोलार्धातील देश (युरोप, उत्तर अमेरिका, रशिया) अवाजवी फुगलेले दिसतात.विषुववृत्ताजवळील (Equatorial) आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशियाई देश योग्य प्रमाणात दिसतात.

अन्य लेख

संबंधित लेख