भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अन्यायाला वाचा फोडणाऱ्या कैक क्रांतिकारकांची आहुती पडली. मात्र भारताला स्वातंत्र्य केवळ अहिंसेच्या मार्गाने आणि सत्याग्रह करून मिळाले” असा एक एकांगी समज दीर्घकाळ समाजमनसात रुजवला गेला. परकीय साम्राज्यशाहीचा पाया खिळखिळा करण्यात सशस्त्र क्रांतीची अखंड मालिका निर्णायक ठरली होती. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या तब्बल २६ वर्षे आधी, सह्याद्रीच्या कुशीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेला थेट लष्करी आव्हान देणारे, रयतेचे प्रति-प्रशासन उभे करणारे आणि संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा काढणारे आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक हे या सशस्त्र राष्ट्रयज्ञाचे आद्य प्रणेते होते.
कौटुंबिक पार्श्वभूमी
उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भिवडी येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात गडकिल्ल्यांचे रक्षण करणाऱ्या रामोशी-बेरड समाजाचा लढाऊ वारसा त्यांना लाभला होता. १८१८ मध्ये मराठा साम्राज्याच्या पाडावानंतर इंग्रजांनी या समाजाची पारंपरिक वतने, हक्क आणि संरक्षणाची जबाबदारी एका फटक्यात हिरावून घेतली. या अन्यायाविरुद्ध उमाजींनी तरुण वयातच शस्त्र उपसले. १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या कैदेत असताना त्यांनी अक्षरओळख आणि प्रशासनाची समज आत्मसात केली. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी जेजुरीच्या श्री खंडोबाच्या साक्षीने भंडारा उधळून परकीय इंग्रज सत्तेला या भूमीवरून समूळ नष्ट करण्याची ऐतिहासिक प्रतिज्ञा घेतली.
साक्षात शिवरायांचे रूप
उमाजींनी छत्रपती शिवरायांचे गनिमी युद्धतंत्र पुनरुज्जीवित केले. सह्याद्रीची दुर्गम भौगोलिक रचना, सुमारे पाच हजार निष्ठावंत सैनिक आणि अभेद्य गुप्तहेर जाळ्याच्या बळावर त्यांनी इंग्रज सैन्याला सलग चौदा वर्षे जेरीस आणले. २४ फेब्रुवारी १८२४ रोजी भांबुर्डा (पुणे) येथील इंग्रजांचा खजिना लुटून त्यांनी गोरगरिबांना वाटला व देवळांचा जीर्णोद्धार केला. पुण्याचा तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर एच. डी. रॉबर्टसन याने नोंदवले होते की, रयत उमाजींमध्ये शिवरायांचे रूप पाहत असून ते ब्रिटिशांचा पराभव करून स्वराज्य आणतील यावर जनतेचा ठाम विश्वास होता. जेजुरीहून स्वतःचे प्रति-प्रशासन चालवताना त्यांनी महिलांवरील अत्याचाराला हात तोडण्यासारखी कठोर शिक्षा देऊन शिवकालीन आचारसंहितेचे काटेकोर पालन केले.
उमाजींच्या क्रांतीकार्याचे सर्वोच्च शिखर म्हणजे १६ फेब्रुवारी १८३१ रोजी त्यांनी काढलेला ऐतिहासिक क्रांती-जाहीरनामा होय. या जाहीरनाम्याद्वारे त्यांनी भारतीयांना इंग्रजांच्या नोकऱ्या लाथाडण्याचे, शेतसारा व कर न देण्याचे आणि सर्व संस्थानिक व जनतेने एकाच वेळी उठाव करून परकीय प्रशासनाची रसद तोडण्याचे आदेश दिले. हा देशातील संपूर्ण सार्वभौम स्वातंत्र्याचा पहिला अधिकृत जाहीरनामा ठरला.
दगाफटका
ब्रिटिशांच्या या आर्थिक मोहाचा आणि कूटनीतीचा अखेर घातकी परिणाम झाला. उमाजींच्या अंतर्गत गोटातील काही लोकांचे पाय लटपटले. एका महिलेचे अपहरण केल्याच्या आरोपावरून उमाजींनी ज्याचे हात तोडून कडक शासन केले होते, तो काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. त्याच्या साथीला नाना चव्हाण हा सहकारीही इंग्रजांच्या बक्षिसाला भुलून फितूर झाला. या फितुरीमुळे १५ डिसेंबर १८३१ च्या रात्री भोरजवळील उतरोली या गावी एका घरात उमाजी नाईक बेसावध विश्रांती घेत असताना ब्रिटिश सैन्याने त्यांना चारी बाजूंनी वेढा घालून जेरबंद केले. उमाजींना पुण्याच्या शुक्रवार पेठेतील तत्कालीन मामलेदार कचेरीतील अंधारकोठडीत डांबण्यात आले. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्यात वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी या महानायकाला फाशी देण्यात आली. जनतेमध्ये दहशत बसावी म्हणून त्यांचे पार्थिव तीन दिवस झाडावर लटकवून ठेवण्यात आले होते.
स्वातंत्र्य सैनिकांची फळी
उमाजींचे हे बलिदान व्यर्थ गेले नाही; तर ती एका प्रदीर्घ सशस्त्र क्रांतीची जननी ठरली. पुढे १८७९ मध्ये आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी उभारलेल्या सशस्त्र सैन्याचा मुख्य कणा उमाजींच्याच लढाऊ समाजातील तरुण होते. हाच सशस्त्र क्षात्रतेजाचा धागा पुढे चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार भगतसिंग आणि थेट नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद सेने’पर्यंत अखंड वाहत राहिला.
सशस्त्र क्रांतिकारांमुळे देशाला स्वातंत्र्य
ब्रिटनचे माजी पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांच्या १९५६ मधील प्रत्यक्ष साक्षीतून सशस्त्र क्रांतिकारकांचा प्रभाव स्वातंत्र्य मिळण्यावर किती होता हे अधोरेखित होते. भारताच्या स्वातंत्र्य कायद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या ॲटली यांनी स्पष्ट कबूल केले होते की, आझाद हिंद सेनेचा लष्करी प्रभाव आणि १९४६ च्या नौदल उठावामुळे भारतीय सैनिकांची ब्रिटिशांवरील निष्ठा संपुष्टात आली होती, ज्यामुळे इंग्रजांना देश सोडावा लागला.
ज्या काळात भारतातील राजे-महाराजे ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करत होते, त्या काळात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडणारे उमाजी नाईक हे पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्याची पहिली ज्वाला पेटवणारे युगपुरुष ठरले.