Friday, September 20, 2024

राज्य शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करणारे; क्रांतिकारी सेमीकंडक्टर प्रकल्पाचे मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्घाटन

Share

ठाणे : एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करीत असून यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महापे औद्योगिक क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात केले.

ठाणे जिल्हातील महापे एमआयडीसी येथे मे.आर.आर.पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, मुंबई पोलीस दलाच्या फोर्स वनचे प्रमुख कृष्ण प्रकाश, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे, आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे शासन दिलेला शब्द पाळणारे आहे. लाडकी बहीण योजना यशस्वी करुन दाखविली. इतर योजनाही यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. विविध प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या दृष्टीने जलद गतीने कामे सुरु आहेत. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई मधील दोन तासाचे अंतर आता अवघ्या 20 मिनिटांवर आले आहे. महाराष्ट्रात बदल घडविणारे प्रकल्प आम्ही साकार करीत आहोत. राज्य शासनाने दाओसमध्ये पाच लाख करोडच्या उद्योग करारांवर सह्या केल्या आहेत. लोकांच्या हातांना निश्चित काम मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर युनिटमध्ये 400 लोकांना काम मिळणार आहे. या माध्यमातून अडॅव्हान्स टेक्नोलॉजी आपल्या राज्यात येत आहे. हे शासन सर्वांसाठी आहे. उद्योजकांना सबसीडी देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था अकरा क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आणली आहे.

लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे काम केले जात आहे. आतापर्यंत मोठे उद्योग महाराष्ट्रात आले आहेत, आणखी येत आहेत. शेतकऱ्याला केंद्र बिंदू मानून हे शासन काम करीत आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला चांगले सहकार्य लाभत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख