Thursday, September 24, 2026

पुण्याच्या सायकलिंगला जागतिक झेप; भारतात प्रथमच रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप

Share

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे मोठे आयोजन भारतात करण्याच्या प्रयत्नांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. २०३२ यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद पुण्याला मिळाले असून, प्रथमच ही जागतिक सायकलिंग स्पर्धा भारतात होणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) यांच्या संयुक्त प्रयत्नांना केंद्र सरकारच्या पाठबळामुळे पुण्याची उमेदवारी यशस्वी ठरली. त्यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे.

कॅनडातील मॉन्ट्रियल येथे झालेल्या यूसीआय काँग्रेसमध्ये अंतिम उमेदवारी सादरीकरणानंतर पुण्याच्या यजमानपदाची घोषणा करण्यात आली. अंतिम टप्प्यात पुण्याची स्पर्धा नेदरलँड्समधील ग्रोनिंगेन/ड्रेंथे यांच्याशी होती. पुण्याने ही स्पर्धा जिंकत भारताला जागतिक रोड सायकलिंगच्या नकाशावर स्थान मिळवून दिले.

पुण्याच्या उमेदवारीला शहरातील वाढती सायकलिंग संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाचा अनुभव महत्त्वाचा ठरला. बजाज पुणे ग्रँड टूर, ही यूसीआय २.२ दर्जाची स्टेज रेस, पुण्याला आंतरराष्ट्रीय रोड सायकलिंगचे आयोजन करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ठरली आहे. २०२६ मधील या स्पर्धेसाठी २५ हून अधिक शासकीय विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला असून सुमारे ४३७ किलोमीटरचे रस्ते शर्यतीसाठी सज्ज करण्यात आले होते.

पुणे ग्रँड टूरमुळे केवळ व्यावसायिक सायकलपटूंनाच नव्हे, तर स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमींनाही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रोड सायकलिंगचा अनुभव मिळाला. या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पुण्याला देशातील महत्त्वाचे सायकलिंग डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना बळ देणारा ठरला.

२०३२च्या जागतिक स्पर्धेसाठी सप्टेंबरमध्ये झालेल्या यूसीआयच्या पाहणीदरम्यान प्रस्तावित मार्ग, क्रीडा सुविधा, निवासव्यवस्था आणि आयोजनाशी संबंधित पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. बालेवाडी क्रीडा संकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसेच पुणे ग्रँड टूरमध्ये वापरण्यात आलेले मार्ग आणि रेस कन्व्हॉय व्यवस्थेचेही सादरीकरण करण्यात आले.

यूसीआयचे अध्यक्ष डेव्हिड लॅपार्टिएंट यांनी पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून भारतात सायकलिंगच्या विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. पुणे ग्रँड टूरच्या प्रगतीबाबत सादर करण्यात आलेला अहवाल अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०३२च्या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रात सायकलिंगसाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच खेळाडू विकास, प्रशिक्षकांची क्षमता वाढवणे आणि तांत्रिक मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः महिला आणि युवा सायकलपटूंच्या सहभागाला चालना देण्याचे नियोजन आहे.

या जागतिक स्पर्धेमुळे पुण्याच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. प्रस्तावित सायकलिंग मार्गांमधून पुणे आणि परिसरातील किल्ले, घाट, शेतीप्रधान भाग, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि धार्मिक पर्यटनस्थळे जगासमोर आणण्याची संधी मिळणार आहे. आयोजकांच्या अंदाजानुसार, या स्पर्धेला सुमारे २५ लाख प्रेक्षक आकर्षित होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि डिजिटल माध्यमांमधून पुण्याची क्रीडा आणि पर्यटन ओळख जगभर पोहोचण्याची शक्यता आहे.

भारताने जागतिक क्रीडा आयोजनाचे केंद्र बनण्याच्या दिशेने यापूर्वीच प्रयत्न सुरू केले आहेत. २०३६च्या ऑलिम्पिक यजमानपदाची भारताची महत्त्वाकांक्षा आणि राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५मध्ये जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडूंच्या विकासासाठी तळागाळापासून उच्च स्तरापर्यंतची व्यवस्था, क्रीडा पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा उत्कृष्टतेवर देण्यात आलेला भर या व्यापक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर पुण्याला मिळालेले २०३२चे यजमानपद महत्त्वाचे ठरते.

आता पुण्यासमोर यजमानपद मिळवण्यापेक्षा त्यासाठी आवश्यक संपूर्ण क्रीडा परिसंस्था उभारण्याचे आव्हान आहे. पुढील सहा वर्षांत पुणे ग्रँड टूरच्या पुढील आवृत्त्या, रस्ते व सायकलिंग पायाभूत सुविधा, खेळाडूंच्या प्रशिक्षणाच्या संधी, तांत्रिक मनुष्यबळ आणि नागरिकांचा सहभाग यावर सातत्याने काम करावे लागणार आहे.

२०३२ची ही स्पर्धा भारतातील रोड सायकलिंगच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार असून, पुण्याला जागतिक सायकलिंग नकाशावर ठळक स्थान मिळवून देणारा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठीही हे यजमानपद आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करण्याची क्षमता सिद्ध करणारे मोठे पाऊल मानले जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख