Wednesday, June 10, 2026

ग्रंथसमीक्षा: शतकातील दलित विचार

Share

ग्रंथाचे नाव: शतकातील दलित विचार
लेखक/संपादक: प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे
प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे
पृष्ठ संख्या: ४६४
प्रथम आवृत्ती : १५ जुलै २००१

डॉ. लिंबाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “मुक्ती कोन पथे?” या भाषणातून पुस्तकाची केंद्रीय भूमिका मांडली आहे. मराठीतील दलित साहित्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक लढ्यातून निर्माण झालेला स्वतंत्र प्रवाह आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी स्वतंत्र साहित्याची निर्मिती करावी लागते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला शिवराम जानबा कांबळे, किसन फागू बंदसोडे यांच्यापासून सुरू झालेला विचार बाबासाहेबांच्या महाडच्या सत्याग्रहाने आणि काळाराम मंदिर प्रवेशाने एका मोठ्या वादळात रूपांतरित झाला, याचा आलेख पुस्तकात आढळतो.

लेखकाच्या मते, दलित साहित्याने मराठी भाषेला नवीन शब्द, नवीन संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘माणूस’ दिला. जो समाज आजवर केवळ मैला वाहणारा, गावकुसाबाहेर राहणारा, उपेक्षित होता, तो साहित्याचा नायक, नवोन्मेष बनला. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित साहित्याच्या अनुषंगाने स्वतंत्र अस्तित्वाची ओळख होती.

उद्घाटकीय भाषणे

या पुस्तकाची  वैचारिक धाटणी समजून घेण्यासाठी दोन प्रमुख उद्घाटकीय भाषणांचा संदर्भ सुरुवातीला दिला आहे. पहिले भाषण आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आणि दुसरे आहे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे.

पहिले अण्णाभाऊ साठे यांचे विचार हे थेट जमिनीवरील संघर्षातून, कारखान्यातील कामगारांच्या घामातून आणि उपेक्षितांच्या वेदनेतून आलेले आहेत. तर दुसरीकडे, पु. ल. देशपांडे हे मराठी प्रस्थापित साहित्यातील एक अत्यंत आदराचे आणि लोकप्रिय नाव. पु. ल. हे मध्यमवर्गीय जाणिवांचे प्रतिनिधित्व करत असले, तरी त्यांची दृष्टी अत्यंत व्यापक आणि मानवी मूल्यांचा आदर करणारी होती. जेव्हा पु. ल. देशपांडे दलित साहित्याच्या मंचावरून किंवा त्या संदर्भात बोलतात, तेव्हा ती प्रस्थापित साहित्याने केलेली एक प्रकारे कबुली असते.

पु. ल. यांनी दलित साहित्याचे काही पदर उघडले आहेत प्रथमतः त्यांनी बाबासाहेबांच्या व्याख्येत धम्म म्हणजे काय? हे मांडले समाज शब्दाची व्याख्या आणि जन्म सिद्ध अधिकारा अंतर्गत येणाऱ्या समजुतींचा प्रघात इथे आहे. 

वेदनेकडून सकारात्मकतेकडे आणि नवनिर्माणाकडे

मराठीतील ख्यातनाम कादंबरीकार आणि पत्रकार अरुण साधू यांनी दलित साहित्याला आणि चळवळीला एक अत्यंत महत्त्वाची दिशा दाखवली आहे. अरुण साधूंचे म्हणणे होते की, दलित साहित्यात वेदनेचा सूर असणे स्वाभाविक आणि ऐतिहासिकदृष्ट्या गरजेचे होते. परंतु, आता एकाच जागी थांबून चालणार नाही. दलित साहित्याने आता केवळ ‘दलित’ या मर्यादित चौकटीत न राहता, किंवा केवळ वेदनेचे भांडवल न करता, एक सकारात्मक आणि व्यापक भूमिका अंगीकारायला हवी.

सकारात्मकतेचा अर्थ काय?

सकारात्मक भूमिका घेण्याचा अर्थ प्रस्थापित व्यवस्थेशी तडजोड करणे मुळीच नाही. त्याचा अर्थ असा आहे की, विद्रोहाच्या आणि विध्वंसाच्या पुढचे पाऊल म्हणजे ‘नवनिर्माण’ होय. आपल्याला जुनी, विषमतेवर आधारित व्यवस्था मोडीत काढायची आहे, पण ती पाडल्यानंतर तिथे कोणती नवी व्यवस्था उभी करायची, याचे प्रारूप साहित्याने दिले पाहिजे.

दलित साहित्याने आता आत्मविश्वासाने पुढे जाऊन जगातील सर्व शोषित, उपेक्षित आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व केले पाहिजे. वेदनेचे रूपांतर सामर्थ्यात करणे, हाच तो सकारात्मक मार्ग आहे. साहित्याने आता केवळ भूतकाळातील जखमांवर बोट न ठेवता, भविष्यातील समतावादी समाजाचे स्वप्न आणि ते सत्य उतरवण्याचा मार्ग दाखवला पाहिजे, हा अरुण साधूंचा विचार दलित साहित्याला अधिक प्रगल्भ करणारा आहे.

दलित साहित्य: अनेक प्रवाह 

दलित साहित्याची व्याख्या किंवा त्याची व्याप्ती ही एकांगी नाही. ते केवळ एका जातीपुरते किंवा एका विशिष्ट विचारसरणीपुरते मर्यादित नाही. दलित साहित्याला अनेक पदर आहेत आणि इथे बहुजनांच्या साहित्याला एकत्रित पाने बघता येऊ शकेल. या विविध प्रवाहांचा  अभ्यास केल्यास साहित्याची व्याख्या किती व्यापक होऊ शकते, याचा बोध होतो.

दलित साहित्याचे विविध पदर 

विद्रोह व विध्वंस, आत्मकथा, दारिद्र्य, बुद्ध ,  प्राकृत साहित्य, ग्रामिण साहित्य,  स्त्रीमुक्ती, कामगार,  कलाप्रकार, भटके विमुक्त व आदिवासी

जुन्या, अमानुष आणि विषमतेवर आधारित मूल्यांचा पूर्णपणे विध्वंस करणे आणि मानवी हक्कांचा पुरस्कार करणारा विद्रोह करणे, हा या साहित्याचा मुख्य उद्देश आहे. मराठी साहित्याला दलित साहित्याने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे ‘आत्मकथा’ होय. लक्ष्मण माने यांचे ‘उपरा’, दया पवार यांचे ‘बलुतं’, शरणकुमार लिंबाळे यांचे ‘अक्करमाशी’, शांताबाई कांबळे यांची  ‘माज्या जल्माची चित्तरकथा’—या आत्मकथांनी समाजमनाला हादरवून सोडले. दारिद्र्याचे, भुकेचे आणि अपमानाचे जे जीवघेणे वास्तव या आत्मकथांमधून आले, त्याने साहित्याचे सौंदर्यशास्त्रच बदलून टाकले.

दलित साहित्याला वैचारिक अधिष्ठान दिले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि त्यांनी घेतलेल्या भगवान बुद्धांच्या धम्माच्या दीक्षेने. बुद्धांचा करुणा, प्रज्ञा आणि समतेचा विचार हा या साहित्याचा पाया आहे. इथे प्रस्थापित समाजाविषयी सुडाची भावनेला जागा नाही. तसेच, ‘प्राकृत’ जनांबरोबर  (लोकांची मूळ भाषा आणि संस्कृती) समाज रचनेचा शोध घेणे, हे या साहित्याचे उद्दिष्ट आहे. दलित साहित्याचा थेट संबंध ग्रामीण साहित्याशी येतो. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांचे शोषण आणि दलितांचे शोषण यात कमालीचे साम्य आहे. तसेच, दलित साहित्याने स्त्रीमुक्ती चळवळीला एक नवा आयाम दिला. प्रस्थापित स्त्रीमुक्ती ही मुख्यत्वे शहरांमधील मध्यमवर्गीय स्त्रियांच्या प्रश्नांभोवती फिरत होती. परंतु, दलित स्त्रीमुक्तीने जात, वर्ग आणि लिंगभेद  या तिहेरी शोषणाचा बळी असलेल्या ग्रामीण आणि दलित स्त्रियांचा आवाज बुलंद केला.

औद्योगिक शहरांमधील कामगार चळवळींचा दलित साहित्याशी जवळचा संबंध राहिलेला आहे. नारायण सुर्वे यांच्यासारख्या कवींनी कामगारांचे जगणे कवितेत आणले. साहित्यासोबतच चित्रकला, नाट्य, संगीत या सर्वच कलाप्रकारांमध्ये प्रतिरोधाचा नवा सूर उमटू लागला. लक्ष्मण गायकवाड यांनी ज्या समाजाला राहण्यासाठी घर नाही, स्वतःची जमीन नाही अशा भटक्या विमुक्तांचे जगणे आणि जंगलात राहूनही जल-जंगल-जमिनीपासून वंचित राहिलेल्या आदिवासींचे प्रश्न दलित साहित्याच्या व्यापक व्याख्येत अंतर्भूत झाले.

जेव्हा आपण या सर्व प्रवाहांना एकत्र करतो, तेव्हा साहित्याची पारंपरिक व्याख्या अपुरी पडते. साहित्य म्हणजे केवळ शब्दरचना नसून, ती मानवी अस्तित्वाची आणि हक्कांची अनेक दृष्टीकोनातून केलेली मीमांसा आहे, हे स्पष्ट होते.

मराठी भाषा जिवंत ठेवणारे सगळ्यात मोठे ‘दीपस्तंभ’  

प्रदीर्घ काळ नागरी मराठी भाषेलाच ‘प्रमाण भाषा’ मानले गेले. परंतु, वऱ्हाडी, अहिराणी, मालवणी, कोल्हापुरी, झाडीबोली, आणि दलितांच्या, भटक्यांच्या विविध बोलीभाषा जेव्हा साहित्यात आल्या, तेव्हा नवीन उच्चार आणि शब्द आले. ही महाराष्ट्राची मराठी मनाची मायबोली होती. जेव्हा बहुजन आणि वंचित समाजातील मुले पहिलीच पिढी म्हणून शिकून पुढे आली (नवशिक्षण), तेव्हा त्यांनी आपल्यासोबत आपल्या घरची, वस्तीची भाषा साहित्यात आणली. शिक्षणाने त्यांना विचार करण्याची क्षमता दिली, तर त्यांच्या बोलीभाषेने त्यांना अभिव्यक्त होण्याचे बळ दिले. 

कोणतीही भाषा ही नियमांच्या पुस्तकात जिवंत राहत नाही. ती जिवंत राहते लोकांच्या रोजच्या व्यवहारात, त्यांच्या सुख-दुःखात आणि त्यांच्या भावनांमध्ये. ग्रामीण आणि दलित बोलीभाषांनी मराठीला तिच्या मूळ मातीशी जोडून ठेवले. जर या बोलीभाषा साहित्यात आल्या नसत्या, तर मराठी भाषा केवळ उच्चभ्रूंचे दिवाणखाने आणि शासकीय कार्यालयांपुरती मर्यादित राहून कोरडी पडली असती. म्हणूनच, या सगळ्या बोलीभाषा हेच मराठी भाषा जिवंत ठेवणारे सगळ्यात मोठे ‘दीपस्तंभ’ आहेत, हे विधान त्रिकालाबाधित सत्य आहे.

अन्य लेख

संबंधित लेख