देशातल्या कोणत्याही शिक्षण संस्थेत होणाऱ्या आत्महत्या ही काळजीची बाब असते. नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अलीकडच्या काळातील मृत्यूने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर, पालकांच्या अपेक्षांवर आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) अधिकृत आकडेवारीनुसार, देशात २०२० मध्ये १०,३३५ विद्यार्थी आत्महत्यांची नोंद झाली होती. केवळ एका वर्षात, म्हणजेच २०२१ मध्ये, हा आकड १३ हजारांच्या वर पोहोचला. हा वाढता आलेख केवळ चिंता वाढवणारा नसून, तो एका व्यापक राष्ट्रीय समस्येकडे निर्देश करतो. या गंभीर पार्श्वभूमीवर, प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सरकारला आणि प्रशासनाला ‘सायकॉलॉजिकल ऑटोप्सी’ म्हणजेच ‘ मरणोत्तर मानसिक विश्लेषणाची’ पद्धत अवलंबण्याची सखोल आणि अतिशय महत्त्वाची सूचना केली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा सरधोपट अर्थ न लावता किंवा कोणताही निष्कर्ष न काढता त्याच्या मृत्युपूर्व वर्तनाची सखोल शास्त्रीय आणि मनोवैज्ञानिक चिकित्सा म्हणजे ऑटोप्सी. अशा आटोप्सीचे अनेक फायदे असतात. त्यातला एक म्हणजे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या निर्णयामागची खरीखुरी कारणे तपासून पाहता येतात. दुसरा फायदा म्हणजे, असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, याची काळजी या प्रक्रियेतून घेता येते.
सामान्यतः समाजात असा एक ठाम समज असतो की, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमागे परीक्षेतील ताण, अभ्यासाचे ओझे किंवा परीक्षेत आलेले अपयश हेच प्रमुख कारण असते. परंतु, प्रत्यक्ष आकडेवारी या समजुतीपेक्षा वेगळेच आणि अधिक गुंतागुंतीचे वास्तव आपल्यासमोर मांडत असते. २०२१ मधील १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांचे सखोल विश्लेषण केल्यास असे दिसते की, केवळ ८.६ टक्के आत्महत्या या परीक्षेतील अपयशामुळे झाल्या आहेत. याउलट, कौटुंबिक समस्यांमुळे सर्वाधिक, म्हणजे २७.७ टक्के विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले होते. यापाठोपाठ आजारपणामुळे २२ टक्के, तर प्रेमप्रकरणांमधून १४.९ टक्के आत्महत्या झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी एका महत्त्वाच्या सत्यावर प्रकाश टाकते. मुख्य म्हणजे, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या कारणमीमांसा केवळ अभ्यास, परीक्षेतले गुण किंवा अपयश यांच्यापुरती मर्यादित ठेवली तर आपल्याला सत्य कधीच समजणार नाही. आत्महत्यांची ही कारणे अधिक व्यापक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून समजून घेणे गरजेचे असते. मनाचे आरोग्य सांभाळणारे वैद्यकीय तज्ज्ञ याकडे लक्ष वेधतात आणि आत्महत्यांची खरी कारणे तपासण्याचा आग्रह धरतात. पुष्कळदा कौटुंबिक कलह, संवादाचा अभाव आणि भावनिक गुंतागुंत या गोष्टी कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर आघात करत असतात. आत्महत्येची ढोबळ कारणे पुढे केली जातात, तेव्हा या गुंतागुंतीकडे दुर्लक्ष होते. आपण सगळेच सत्यापासून दूर राहतो आणि मुख्य म्हणजे एकदा शिक्का मारला की सत्य जाणण्याच्या प्रक्रियेतूनही बाहेर पडतो.
‘सायकॉलॉजिकल ऑटोप्सी’ (मानसिक विश्लेषण) म्हणजे काय? ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सुचवलेली ‘सायकॉलॉजिकल ऑटोप्सी’ ही संकल्पना आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक स्थितीचा अतिशय शास्त्रीय आणि पद्धतशीर वेध घेते. एखाद्या विद्यार्थ्याने स्वतःचे जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे समजून घेण्यासाठी त्याच्या आयुष्यातील शेवटच्या टप्प्यावरील परिस्थितीची शास्त्रशुद्ध पुनर्रचना करणे, म्हणजेच सायकॉलॉजिकल ऑटोप्सी होय. भारतीय सशस्त्र दलांमध्ये आणि जगभरात अनेक प्रगत देशांमध्ये अशा प्रकारच्या विश्लेषणाचा प्रभावी वापर केला जातो. डॉ. शेट्टी यांनी २०२१ मध्ये महाराष्ट्र सरकारला विशेष पत्र लिहून राज्यात या पद्धतीचा अवलंब करण्याची आग्रही मागणी केली होती. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश केवळ मृत्यूचे कारण शोधून फाइल बंद करणे हा नसून, अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी आवश्यक असणारे प्रतिबंधात्मक घटक ओळखणे आणि समाजाच्या स्तरावर योग्य त्या उपाय करणे हा आहे. मुंबई आयआयटीमध्ये घडलेल्या प्रसंगामुळे डॉ. शेट्टी यांच्या सूचनेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
असे मरणोत्तर मनोविश्लेषण किंवा ऑटोप्सी करताना कमालीची संवेदनशीलता बाळगावी लागते. माहितीचे दुवे जोडावे लागतात. एरवी महत्त्वाची न वाटणारी तपशिलांची जंत्री काळजीपूर्वक तपासावी लागते. या माहितीला अनेक वैज्ञानिक निकष लावावे लागतात. आताच्या आधुनिक युगात या अभ्यासाच्या प्रक्रियेत प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या डिजिटल अस्तित्वाचा, म्हणजेच सोशल मीडियावरील वावराचे आणि पोस्ट्सचे बारकाईने विश्लेषण केले जाते. त्यासोबतच, फोन कॉलचे पॅटर्न तपासणे, त्याने शेवटच्या काही दिवसांत कोणाशी आणि काय संवाद साधला याचा सखोल अभ्यास करणे, त्याच्या मित्र-मैत्रिणींशी, शिक्षकांशी आणि कुटुंबातील सदस्यांशी सविस्तर संवाद साधणे या बाबींचा समावेश असतो. विद्यार्थ्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे होते, त्याच्या दैनंदिन वर्तनात काही अचानक बदल झाले होते का, तो एकलकोंडा झाला होता का, आणि वर्गातील त्याची उपस्थिती कशी होती, या सर्व गोष्टींचा मागोवा यामध्ये घेतला जातो. या सर्व माहितीचे संकलन करून एका निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचता येते, ज्यामुळे शिक्षण व्यवस्था आणि प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे तयार करू शकते. घटना घडल्यानंतर लगेच काही निष्कर्ष काढण्यापेक्षा ही प्रक्रिया अधिक वेळ घेणारी असली तरी ती वैज्ञानिक तसेच जास्तीत जास्त माहिती व पुराव्यांचे विश्लेषण करणारी असते.
या संदर्भात लीलावती रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भरत शहा यांनी एका वेगळ्या पैलूवर लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, उच्च शिक्षणाच्या नामांकित संस्था या अनेकदा विद्यार्थ्यांसाठी ‘अकॅडमिक प्रेशर कुकर’ बनतात. जे विद्यार्थी त्यांच्या शालेय जीवनात किंवा मूळ गावी अभ्यासात सतत अव्वल राहिलेले असतात, त्यांना या उच्च संस्थांमध्ये आल्यावर स्वतःइतक्याच किंवा अधिक गुणवान विद्यार्थ्यांशी सतत स्पर्धा करावी लागते. अचानक मिळणारी ही कठीण स्पर्धा आणि सतत पुढे राहण्याचा दबाव त्यांच्यासाठी पचवणे जड जाते. या तीव्र स्पर्धेतून येणारा ताण अनेकदा असह्य होतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आकांक्षा त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षांशी घट्ट जोडलेल्या असतात. पालकांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचे ओझे ते वागवत असतात. त्यामुळे, अपयशाची कोणतीही लहानशी घटना त्यांच्या मानसिकतेवर खोलवर आघात करू शकते आणि त्यांना नैराश्याच्या गर्तेत ढकलू शकते.
डॉ. शेट्टी यांच्या मते, विद्यार्थ्यांच्या गैरवर्तणुकीकडे किंवा त्यांच्या समस्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची आता वेळ आली आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी परीक्षेत कमी गुण मिळवतो किंवा बेशिस्त वागतो, तेव्हा त्याला कठोर शिक्षा करण्याऐवजी किंवा सर्वांसमोर अपमानित करण्याऐवजी, त्याला मानसिक आधाराची दिशा दाखवणे आवश्यक आहे. अपमानित केल्याने विद्यार्थ्यांचा मानसिक ताण अधिक वाढतो, त्यांचा आत्मसन्मान दुखावला जातो आणि ते टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त होऊ शकतात. शिक्षकांनी आणि पालकांनी आपला दृष्टिकोन बदलून मानसिक आरोग्याच्या चौकटीतून विद्यार्थ्यांच्या समस्या हाताळायला हव्यात. आता या समस्येवर केवळ चर्चा करून चालणार नाही, तर ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.
सायकॉलॉजिकल ऑटोप्सी ही संकल्पना या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी आणि भविष्यातील धोके ओळखण्यासाठी अतिशय प्रभावी साधन ठरू शकते. आजारपण, कौटुंबिक कलह, एकाकीपणा आणि स्पर्धेचा जीवघेणा ताण या सर्व बाजूंनी विचार करून जर आपण योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या, तर भविष्यात अनेक जीव आपल्याला वाचवता येतील. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार समजून घेणे, त्याच्या अपयशातही त्याला खंबीर मानसिक आधार देणे आणि यशाची सगळी परिभाषा बदलणे, आवश्यक आहे. एखाद्या शिक्षणसंस्थेत एखादी आत्महत्या झाली की लगेच निष्कर्ष काढून, कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून किंवा नुसती आंदालने करून कायमचे व ठोस उत्तर मिळणार नाही. त्यासाठी, अशा आत्महत्यांची कारणे विज्ञानाची मदत घेऊन शोधून काढणे आणि दूर करण्यासाठी सुविहित योजना आखणे आवश्यक असते. मरणोत्तर मनोविश्लेषण म्हणजेच ऑटोप्सीची संकल्पना स्वीकारली तर आपण समाज म्हणून दोन पावले पुढे टाकू. नाही तर, आत्महत्या झाल्या की तात्पुरता गदारोळ होईल, त्यांचे राजकारण होईल. मात्र, मूळ समस्येला हात घातलाच जाणार नाही. असे होता कामा नये!