मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर शनिवारी (७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव तारणहार ठरला, तर गोलंदाजांनी अमेरिकन फलंदाजीचा कणा मोडला.
सूर्याचा वानखेडेवर धमाका (धावसंख्या: १६१/९)
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर ईशान किशन (२०) आणि तिलक वर्मा (२५) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अमेरिकेच्या शॅडली वान शल्कविक (४/२५) याने एकाच षटकात तीन धक्के देत भारतीय टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली.
७७ धावांत ६ विकेट गमावलेल्या भारताला कर्णधार सूर्यकुमार यादव याने सावरले.
सूर्याने ४९ चेंडूत नाबाद ८४ धावांची (१० चौकार, ४ षटकार) स्फोटक खेळी करत भारताला १६१ धावांपर्यंत पोहोचवले. अक्षर पटेलने (१४) त्याला मोलाची साथ दिली.
गोलंदाजांची अचूक मारा; अमेरिकेला रोखले (धावसंख्या: १३२/८)
१६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकन संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली होता. मोहम्मद सिराज (३/२९) याने सुरुवातीलाच धक्के दिले.
अमेरिकेच्या मिलिंद कुमार (३४) आणि संजय कृष्णमूर्ती (३७) यांनी मधल्या षटकांत झुंज दिली, पण फिरकीपटू अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी त्यांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही.
निर्धारित २० षटकांत अमेरिका केवळ १३२ धावांपर्यंतच मजल मारू शकली.
या विजयासह भारताने टी-२० विश्वचषक इतिहासात सलग ९ विजय मिळवण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या हजारो चाहत्यांनी टीम इंडियाच्या या कामगिरीचे जल्लोषात स्वागत केले.
पुढील सामने (टीम इंडिया):
१२ फेब्रुवारी: विरुद्ध नामिबिया (दिल्ली)
१५ फेब्रुवारी: विरुद्ध पाकिस्तान (कोलंबो – संभाव्य)
१८ फेब्रुवारी: विरुद्ध नेदरलँड्स (अहमदाबाद)