नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. एआय चा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केली.
नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पँक्ट समिट -२०२६ मधील ‘एआय इन अँग्रिकल्चर’ या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती होती. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी भारत सरकार, जागतिक संशोधन संस्था, गुंतवणूकदार यांच्याशी महाराष्ट्र सरकार सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सध्या जगभरात शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षिततेवर ताण आला आहे. अनिश्चित वातावरण, घसरणारी पाणी पातळी, जमिनीचा खालावणारा दर्जा, पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक मार्केटमधील अनिश्चितता यांचा या आव्हानांमध्ये समावेश आहे. अशा परिस्थितीत आर्टीफिशीअल इंटेलिजन्स महत्वाची भूमिका पार पाडू शकते, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील अनेक देशांसाठी कृषी विषय केवळ आर्थिक विषयाशी नि्गडीत नाही. कृषी विषय अन्न सुरक्षितता, सामाजिक सुरक्षितता, आर्थिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. यामुळे भारताने याबाबत फार पूर्वीच विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या इंडिया एआय मिशनमध्ये कृषी क्षेत्राचा प्रामुख्याने विचार केला आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, सेवापुरवठा, समावेशकता यांचा विचार केला गेला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, भारतातील सुमारे निम्मी लोकसंख्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. पण यापैकी फार कमी लोकांना बदलते हवामान, शेतीसाठी आवश्यक असणारे निविष्ठाचे दर, शेतमालाचे बाजारभाव, वित्तपुरवठा याबाबत माहिती उपलब्ध आहे. सध्याच्या व्यवस्थेला गतीने माहिती पुरवण्यात आणि आवश्यक माहिती देण्यात काही मर्यादा आहेत. यावर आर्टीफिशीअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने मात करू शकतो. आर्टीफिशीअल इंटेलिजन्स शेतीसाठी आवश्यक असणारी बँकवर्ड आणि फाँरवर्ड लिंकेजची माहिती देऊ शकते. यामध्ये वातावरणातील बदल, जलसिंचन, खतपुरवठा, बाजारभावातील फेरबदल आणि पुरवठा साखळी याबाबत माहिती देऊ शकते.
आर्टीफिशीअल इंटेलिजन्स जादूची कांडी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी एआय माडेल विश्वासार्ह डेटा, सुशासन आणि लोकांशी असलेले उत्तरदायित्व यावर आधारित असायला हवे. विश्वासाशिवाय शेतीशी निगडीत विविध सेवा आपण देऊ शकणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने महाॲग्री एआय धोरण स्वीकारले आहे. हे धोरण सर्वांसाठी खुले आणि परस्पर समन्वय साधणारे आहे. या धोरणावर आधारित विकसित केलेला मोबाईल प्लँटफाँर्म बहुभाषांमध्ये वैयक्तिक सल्ला देतो, बाजारपेठेतील घडामोडींची माहिती देतो, वातावरणातील बदलाबाबत सूचना देतो आणि अनेक शासकीय योजनांबाबत सल्ला देतो. या सेवेला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, ही बाब शेतकरी आर्टिफिशीअल इंटेलिजन्ससाठी सज्ज आहेत, स्पष्ट करते. आर्टीफिशीअल इंटेलिजन्सवर आधारित टेस्ट, इंटीग्रेशन आणि क्राँप सँप विकसित करणे आमचे ध्येय आहे. शेतीशी निगडीत सर्व डेटाचे एकत्रीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या डेटाच्या आधारे शेती आणि शेतकऱ्यांचा विकासासाठी काम झाले पाहिजे.