Saturday, March 7, 2026

२०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’; महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधींचा निधी

Share

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाला नवी गती देणारा ७.६९ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. २०२६-२७ हे वर्ष ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. हा अर्थसंकल्प प्रगतीशील विकास, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार मुख्य स्तंभांवर आधारित असून राज्याला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले आहे.

प्रमुख घोषणा आणि सामाजिक उपक्रम
महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने मोठी तरतूद केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले २०० वी जयंती : ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा फुले यांची २०० वी जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून विविध सामाजिक उपक्रमांसाठी विशेष समितीची स्थापना केली जाईल.

सावित्रीबाई फुले स्मारक : नायगाव (जि. सातारा) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.

चवदार तळे सत्याग्रह शताब्दी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सुविधांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.

संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट : गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमीला जोडणारे ‘तीर्थक्षेत्र सर्किट’ विकसित केले जाईल. तसेच ‘संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान’ राबवले जाणार आहे.

AI विलेज (कृत्रिम बुद्धिमत्ता) : ७५ गावांमध्ये नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी AI च्या सहाय्याने पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

नवरगाव (रामटेक) चित्रनगरी : राज्यातील तिसरी चित्रनगरी रामटेक येथे विकसित केली जाणार आहे.

साहित्य आणि चित्रपट : महाकवी कालिदास यांच्या साहित्याची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जाईल.

मंदिर विकास : पंढरपूर मंदिर विकास आराखडा, ५ ज्योतिर्लिंग विकास कामे आणि देहू येथील जगदगुरु तुकाराम महाराज जन्मस्थानाचे जतन करण्यासाठी निधी दिला जाईल. तसेच महानुभाव पंथीय धार्मिक स्थळांचा विकास केला जाईल.

“हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून तो विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप आहे. आम्ही तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा संगम घडवून आणत आहोत,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या ऐतिहासिक अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख