नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त “हिंद-दी-चादर” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम नाट्य, गीत आणि नृत्य यांचा संगम असलेला एक प्रभावी सांस्कृतिक आविष्कार असणार आहे. सुमारे ६० कलावंतांच्या संचातून सादर होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान आणि धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेल्या महान योगदानाची कलात्मक मांडणी केली जाणार आहे.
सिख परंपरेत गुरु तेग बहादुर साहिबजी यांना “हिंद-दी-चादर” म्हणजेच हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल असे संबोधले जाते. त्यांच्या शौर्यगाथेचे आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये नाट्यरूप सादरीकरण, प्रभावी संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग प्रेक्षकांसमोर उभे केले जाणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ मनोरंजनात्मक नसून इतिहास, संस्कृती आणि प्रेरणा यांचा संगम ठरणार आहे.
हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम साहित्य मंदिर सभागृह, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.