Monday, March 16, 2026

कुंभपर्वात केवळ हिंदूंचीच दुकाने हवीत, जिहादी घुसखोरी उखडून टाका – मंत्री नितेश राणे

Share

नाशिक : पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. “कुंभपर्वात केवळ हिंदूंनीच आपली दुकाने लावावीत. जर मुसलमानांसह अन्य धर्मीयांनी येथे घुसखोरी करून दुकाने लावली, तर ती उखडून टाका,” असे थेट आवाहन त्यांनी नाशिककरांना केले आहे.

हिंदू समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वधर्मीय व्यापाराला चालना देण्यासाठी नाशिकमध्ये ‘हिंदू हित रक्षा’ संघटनेच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. शनिवारी, १४ मार्च रोजी नाशिक येथे “हिंदूंचा रुपया हिंदूलाच” या संकल्पनेवर आधारित भव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संघटनेने तयार केलेल्या ‘हिंदू व्यावसायिक आणि कारागीर सूची’चा प्रकाशन सोहळा राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री राणे बोलत होते. “हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी कराव्यात, ही काळाची गरज आहे आणि या भूमिकेसाठी माझ्यावर कितीही टीका झाली तरी मी मागे हटणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये अनेकदा दुकानांवर हिंदूंची नावे लावून प्रत्यक्षात अन्य धर्मीय व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना राणे म्हणाले, “बाहेर नाव हिंदूंचे आणि आत ‘अब्दुल’ बसलेला, अशी फसवणूक आता खपवून घेतली जाणार नाही. सिंहस्थ कुंभपर्वावर बारकाईने लक्ष ठेवा. मंत्रालयात आम्ही बसलो आहोत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी सतर्क व्हा.”

याच कार्यक्रमात नितेश राणे यांनी राज्यातील आगामी कायद्यांविषयी मोठी माहिती दिली. “महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात देशातील सर्वात कठोर कायदा राज्यात लागू केला जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली. धर्मांधांकडून वसूल केला जाणारा पैसा देशविघातक कृत्यांसाठी वापरला जातो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

या कार्यक्रमाला नाशिकमधील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख