अयोध्या : देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्या दौऱ्यावर असताना प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भावपूर्ण पूजा-अर्चना करत आरतीमध्ये सहभाग घेतला आणि देशवासियांच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दौऱ्याचे विशेष आकर्षण म्हणजे, राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या राम दरबारात ‘श्रीराम यंत्रा’ची विधिवत स्थापना करण्यात आली.
राम दरबारात स्थापित करण्यात आलेले हे श्रीराम यंत्र अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तामिळनाडूतील कांचीपुरम येथील मठात हे यंत्र तयार करण्यात आले असून, तिथून ते आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे नेण्यात आले होते. सुमारे १० दिवसांच्या भव्य रथयात्रेनंतर हे यंत्र अयोध्येत पोहोचले. १५० किलो वजनाच्या या भव्य यंत्रावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. ज्योतिषाचार्य रघुनाथ दास शास्त्री यांच्या मते, हे यंत्र एक विशेष वैदिक भूमितीय रचना असून मंत्र आणि आकृत्यांच्या माध्यमातून यात प्रभू श्रीराम आणि इतर देवतांची दिव्य ऊर्जा सामावलेली असते.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, “राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिरावर ध्वजारोहण होणे हे आपल्या इतिहासातील सुवर्णक्षण आहेत. श्रीराम यंत्राची स्थापना करण्याची संधी मिळणे, ही माझ्यावर झालेली प्रभू श्रीरामांचीच कृपा आहे.” रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरचा राष्ट्रपतींचा हा दुसरा अयोध्या दौरा आहे. यापूर्वी १ मे २०२४ रोजी त्यांनी हनुमानगढी आणि राम मंदिरात पूजा केली होती.
राष्ट्रपतींच्या या दौऱ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरीत जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरातील प्रमुख रस्ते, मंदिरे आणि महत्त्वाच्या ठिकाणी स्वागतपर बॅनर आणि रोषणाई करण्यात आली होती. कडक सुरक्षा व्यवस्थेत हा सोहळा पार पडला. राष्ट्रपतींनी मंदिर परिसराची पाहणी करून तेथील स्थापत्यशैलीचेही कौतुक केले.