उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश आतंकवादविरोधी पथक (ATS), गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन मुसलमान तरुणांना अटक केली आहे. अजीम राणा आणि आझाद राजपूत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, ते भारतातील संवेदनशील धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणांची माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
अन्वेषण यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींकडून दिल्लीतील रमेश नगर मेट्रो स्थानक आणि अनेक प्राचीन मंदिरांची छायाचित्रे तसेच व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. ही ठिकाणे अत्यंत संवेदनशील असल्याने, तिथे घातपाती कारवाया करण्याचा मोठा कट रचला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी अधिक तपास सुरू केला आहे.
अटक करण्यात आलेल्यांपैकी अजीम हा हापूडचा रहिवासी असून त्याच्या वडिलांचे नाव सलीम आहे. तर दुसरा आरोपी आझाद मेरठचा असून त्याच्या वडिलांचे नाव नौशाद आहे. हे दोघेही सीमेपलीकडील आपल्या म्होरक्यांच्या संपर्कात होते आणि डिजिटल माध्यमांतून संवेदनशील माहिती पाठवत होते.
या कारवाईनंतर सोशल मीडियावर काही गटांकडून हे दोन्ही आरोपी हिंदू असल्याचा खोटा दावा करून दिशाभूल करणारा प्रचार केला जात आहे. मात्र, पोलिसांनी अधिकृत माहिती देऊन ही अफवा खोडून काढली आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये आणि तपासात अडथळा येऊ नये यासाठी नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सध्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू असून त्यांच्या नेटवर्कमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा शोध यंत्रणा घेत आहेत.