Saturday, March 21, 2026

लोअर परळ येथे १९ ते २६ मार्च दरम्यान ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन

Share

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने ‘महासंस्कृती’ अभियानांतर्गत राज्याच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी लोअर परळ येथे ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. १९ मार्चपासून सुरू झालेला हा महोत्सव २६ मार्च २०२६ पर्यंत चालणार असून, मुंबईकरांना दररोज सायंकाळी सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला मिळत आहे.

हा महोत्सव दररोज सायंकाळी ७:३० वाजता लोअर परळ ब्रिजखाली, कोकण वैभव समोर, ना. म. जोशी मार्ग (मुंबई-१३) येथे पार पडत आहे. मोकळ्या जागेत होणाऱ्या या कार्यक्रमामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनाही महाराष्ट्राच्या समृद्ध कलेचे दर्शन घडत आहे.

या महोत्सवात संगीत, नृत्य, लोककला आणि पारंपरिक कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कलागुणांना मुंबईच्या केंद्रस्थानी व्यासपीठ मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाचे स्थानिक समन्वय शेलारमामा फाऊंडेशन आणि कुलस्वामिनी श्री भैरी भवानी चैत्र नवरात्रोत्सव यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आकाराला आला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालयाने याचे नियोजन केले आहे.

“मुंबई आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कलाकार आणि रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कलाकारांना प्रोत्साहन द्यावे,” असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे. लोअर परळ सारख्या गजबजलेल्या भागात होणाऱ्या या महोत्सवामुळे शहराच्या धावपळीच्या जीवनात सांस्कृतिक चैतन्य निर्माण झाले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख