लातूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘हिरकणी हाट – २०२५-२६’ या भव्य जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचा शुभारंभ आज, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता होणार आहे.
लातूरमधील औसा रोड येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे हे प्रदर्शन २१ ते २६ मार्च या कालावधीत भरवण्यात आले आहे. नागरिकांसाठी हे प्रदर्शन दररोज सकाळी १०:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत खुले राहील.
या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, घरगुती मसाले, कपडे आणि इतर दर्जेदार उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. खवय्यांसाठी येथे ‘गावरान खाद्य महोत्सव’ असून, अस्सल ग्रामीण चवीचे पदार्थ चाखण्याची संधी लातूरकरांना मिळणार आहे.
केवळ खरेदीच नव्हे तर मनोरंजनासाठीही येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज संध्याकाळी ६:३० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राची लोककला, पोवाडा आणि इतर कलाप्रकारांचे सादरीकरण होणार असून, यामुळे प्रदर्शनाची रंगत अधिकच वाढणार आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आणि महिला कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी लातूरकर नागरिकांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासन आणि ‘उमेद’ अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे.