महाराष्ट्राची वारकरी परंपरा ही हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा नसून समता, सेवा आणि जगाच्या कल्याणाचा संदेश देणारी परंपरा आहे. दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. या प्रवासात त्यांच्या पायांना होणारा त्रास, उन्हाचा तडाखा, थकवा आणि आरोग्याच्या अडचणी लक्षात घेऊन वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये ‘चरण सेवा’ हा उपक्रम विशेष चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या सेवेला केवळ प्रशासनाचा भाग न मानता ती सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांच्या पायांची स्वच्छता, जखमांवर उपचार, औषधी लेप, प्राथमिक आरोग्यसेवा आणि आवश्यक वैद्यकीय मदत अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची संकल्पना पुढे आली. वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
‘चरण सेवा’ ही केवळ पाय धुण्याची किंवा उपचार करण्याची कृती नाही, तर वारकऱ्यांप्रती कृतज्ञता आणि सेवाभाव व्यक्त करण्याचे प्रतीक आहे. संत परंपरेने शिकविलेल्या “सेवा हीच खरी भक्ती” या विचाराचे आधुनिक प्रशासनातील रूप म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात वारी व्यवस्थापनात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावरील रस्त्यांची सुधारणा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय पथके, आपत्कालीन सेवा, शौचालयांची उभारणी, नियंत्रण कक्ष आणि डिजिटल समन्वय अशा अनेक उपाययोजनांवर भर देण्यात आला. त्यामुळे लाखो वारकऱ्यांना अधिक सुरक्षित आणि सुलभ वातावरणात वारी करता यावी, हा शासनाचा प्रयत्न दिसून येतो.
आज महाराष्ट्राची वारी जगभरातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक यात्रांपैकी एक मानली जाते. अशा यात्रेत वारकऱ्यांना सन्मानाने, सुरक्षितपणे आणि आरोग्यदायी वातावरणात सेवा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. ‘चरण सेवा’ ही त्याच भावनेतून राबविण्यात आलेली संकल्पना असून, तिच्यामागील केंद्रबिंदू हा वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य देणे हाच आहे.
– अरूण कराड