महाराष्ट्रात बंदी असलेल्या आणि मानवी आरोग्याला अत्यंत घातक असलेल्या पाकिस्तानी ब्युटी क्रीम्सच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पर्दाफाश केला आहे. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विशेष ७२ तासांच्या मोहिमेत नांदेड, पुणे, बीड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे एकाच वेळी छापे टाकून सुमारे ₹९०.४२ लाख रुपयांचा बेकायदेशीर औषधे व सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई ९ जुलैला नांदेडच्या मण्यार गल्लीतील ‘मेसर्स अफराह कलेक्शन’ या दुकानावर करण्यात आली. भारत सरकारने आयातीवर बंदी घातलेली असताना आणि पाकिस्तानात उत्पादित झालेली सौंदर्य प्रसाधने येथे विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी अत्यंत हुशारीने प्रथम एक बनावट ग्राहक पाठवून याची खात्री केली आणि त्यानंतर टाकलेल्या छाप्यात ₹३९.७० लाख किमतीचा साठा जप्त केला. यामध्ये गोरी ब्युटी क्रीम, फेस फ्रेश, उजूबा एक्स्ट्रा व्हाईट या प्रतिबंधित उत्पादनांचा समावेश आहे. या प्रकरणी दुकान मालक मोहम्मद झियाउद्दीन याला ताब्यात घेण्यात आले असून, हा माल मुंबईतील वितरकांकडून रेल्वे किंवा रस्त्याद्वारे मागवल्याचे त्याने कबुल केले आहे.
ब्युटी क्रीममध्ये पाऱ्याचे प्रमाण अधिक
जप्त करण्यात आलेल्या पाकिस्तानी क्रीम्सचे नागपूर व मुंबईच्या प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषण केले असता, त्यामध्ये पारा आणि शिसे या जड धातूंचे प्रमाण सुरक्षित मानकांपेक्षा अत्यंत घातक पातळीवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्वचा तात्पुरती गोरी करण्यासाठी यात पाऱ्याचा वापर केला जातो. मात्र, याच्या प्रदीर्घ वापरामुळे ग्राहकांना ‘नेफ्रोटिक सिंड्रोम’ (मूत्रपिंडाचे गंभीर आजार) जडत असल्याचे समोर आले आहे. तसेच यामुळे मज्जासंस्थेचे आजार आणि वंध्यत्वाचा धोकाही निर्माण होतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या उत्पादनांवर आधीच बंदी घातली आहे.
बीडमध्येही दिशाभूल करणाऱ्या क्रीम्स जप्त
नांदेडच्या कारवाईच्या समांतर बीडमधील ‘मेसर्स मंगलमूर्ती एजन्सीज’वर छापा टाकून विज्ञानाचा कोणताही ठोस पुरावा नसलेले आणि “त्वचा डागमुक्त व गोरी” करण्याचा दावा करणारे ₹३६,००० किमतीचे ‘मेरा रूप शृंगार क्रीम’ जप्त करण्यात आले.
“ग्राहकांनी अशा प्रकारच्या चमत्कारी दाव्यांना आणि गोरेपणाच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच केवळ परवानाधारक व्यापाऱ्यांकडूनच पडताळणी करून सौंदर्य प्रसाधने खरेदी करावीत,” असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सखोल तपास पोलीस आणि सीमाशुल्क विभाग करत आहे.