Thursday, August 27, 2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून नेपाळला मदत

Share

नेपाळच्या उत्तर सीमावर्ती भागात काल आलेल्या भीषण पुरामुळे प्रचंड जन-धन हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर संघ परिवारातील प्रमुख संस्थांनी नेपाळमधील पीडितांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करत मदतीचा हात पुढे केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदतीचे आवाहन

नेपाळमध्ये बुधवारी सकाळी आलेल्या पुरामुळे रसुवा, धाडिंग, नुवाकोट, चितवन आणि पूर्व नवलपरासी हे जिल्हे गंभीररीत्या प्रभावित झाले असून हजारो नागरिकांना या आपत्तीचा फटका बसला आहे.

या दुर्घटनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे शोक व्यक्त केला. “पुरातील सर्व मृतकांच्या नातेवाईकांप्रती, पीडितांप्रती आणि जखमींप्रती संघ खोल संवेदना प्रकट करत आहे. या आपत्तीत पीडितांना मदत करण्यासाठी संघ तत्पर असून सर्वतोपरी सहाय्य करण्याचा प्रयत्न करेल,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, या अप्रत्याशित संकटसमयी सर्वांनी शक्य ती मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विश्व हिंदू परिषदेकडून मदत निधी आणि साहित्याची घोषणा

तिबेट-नेपाळ सीमेवरील आपत्तीमुळे रसुवा येथील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरातील जीवित व वित्तहानीबद्दल विश्व हिंदू परिषदेने (विहंप) तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर ओढवलेल्या संकटावरही परिषदेने चिंता व्यक्त केली.

विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री बजरंग बागडा यांनी सांगितले की, परिषद आणि संपूर्ण हिंदू समाज या कठीण प्रसंगी नेपाळमधील नागरिक व पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अधिकृत मदतीव्यतिरिक्त, भारतीय समाजाच्या माध्यमातून विहंप मदत साहित्य आणि निधी संकलित करणार आहे. हे संकलित केलेले साहित्य आणि निधी बाधित क्षेत्रातील पीडितांपर्यंत थेट पोहोचवला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

अन्य लेख

संबंधित लेख