वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन, कौशल्य विकास, शिक्षणासह विविध क्षेत्रांत सहकार्य
मुंबई आणि सिडनी ही अनुक्रमे भारत आणि ऑस्ट्रेलियाची वित्तीय व व्यावसायिक प्रवेशद्वारे आहेत. त्यामुळे न्यू साउथ वेल्समधील वित्तीय संस्था, व्यावसायिक सेवा कंपन्या, पायाभूत सुविधा गुंतवणूकदार आणि सुपरॲन्युएशन फंडांनी महाराष्ट्राला भारतातील गुंतवणुकीचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून पाहावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्रातील वाहतूक पायाभूत सुविधा, औद्योगिक कॉरिडॉर, नागरी विकास, अक्षय ऊर्जा आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञान, उत्पादन आणि ऊर्जा संक्रमण या क्षेत्रातही मोठ्या सहकार्याची क्षमता आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सक्षम परिसंस्था उभारत आहे. न्यू साउथ वेल्सकडील खाण तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे, स्वच्छ ऊर्जा आणि नवोन्मेषातील अनुभवाच्या माध्यमातून बॅटरी उत्पादन, हरित हायड्रोजन, अक्षय ऊर्जा व ऊर्जा साठवणूक क्षेत्रात संयुक्त प्रकल्प विकसित करता येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कौशल्य विकासाच्या क्षेत्रात न्यू साउथ वेल्सच्या टेक्निकल ॲण्ड फर्दर एज्युकेशन आणि महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था व कौशल्य विकास संस्थांमध्ये संयुक्त अभ्यासक्रम, प्रशिक्षक प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण आणि उद्योगाशी संलग्न प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्याची संधी आहे. तसेच न्यू साउथ वेल्समधील विद्यापीठांनी नवी मुंबईजवळील आंतरराष्ट्रीय शिक्षण नगरीत सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. न्यू साउथ वेल्सचे दुष्काळ व्यवस्थापन, शेती आणि जलसंधारणाचा अनुभव मराठवाडा व विदर्भासाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये भागीदारी वाढविण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.