जग सध्या विविध प्रकारच्या विखंडनाच्या परिस्थितीतून जात असताना, सर्वांना एकत्र आणणाऱ्या व्यासपीठांची गरज अधिक वाढली आहे. राजकीय आणि आर्थिक संवादासोबतच संस्कृती, विचार आणि सामाजिक मूल्यांची देवाणघेवाण झाल्यासच जागतिक एकता अधिक बळकट होऊ शकते. भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारातून आंतरराष्ट्रीय सहकार्याला नवी दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई येथे आयोजित ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 एडिशन च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या समावेशकता, नीतीमत्ता आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला.
भारताच्या प्राचीन परंपरेत जगाला एका कुटुंबाप्रमाणे पाहण्याचा दृष्टिकोन असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, प्राचीन काळात जागतिक व्यापारात भारताचा मोठा वाटा होता. भारताने केवळ वस्तूंची निर्यात केली नाही, तर जगाला उदात्त विचारांचीही देणगी दिली. बौद्ध धर्माचा जगभर झालेला प्रसार हे त्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
BRICS आणि BRICS Plus यांसारखी व्यासपीठे ग्लोबल साउथच्या आकांक्षांना आवाज देत आहेत. बहुध्रुवीयता आणि विविधता ही निसर्गाची देणगी असून, या विविधतेचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी देशांमधील सहकार्य आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईच्या वैशिष्ट्यांवर भाष्य करताना फडणवीस यांनी मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक, मनोरंजन आणि फिनटेक राजधानी असल्याचे सांगितले. विविध संस्कृतींना सामावून घेणाऱ्या मुंबईत भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ही प्रतिबिंबित होते. त्यामुळे ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’च्या आयोजनासाठी मुंबई हे आदर्श ठिकाण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत आर्थिक सहकार्यासोबतच कला, क्रीडा, संगीत आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील आदानप्रदानावर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्याची नवी दिशा जगासमोर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी ब्राझीलचे मुंबईतील महावाणिज्यदूत जोस माउरो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेटिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किन जिए, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत जी. ई. लाबाने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.