रायगड : आपत्तीच्या काळात कोकणातील नागरिकांचे संरक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे तातडीने स्थलांतर सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पा’अंतर्गत रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्री आणि श्रीवर्धन मतदारसंघ असलेल्या आदिती तटकरे यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत अधिकाऱ्यांना गावांच्या परिसरात किंवा शाळांच्या आवारात बहुउद्देशीय निवारा केंद्रे उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही केंद्रे केवळ आपत्तीच्या काळातच वापरली जाणार नाहीत, तर स्थानिक नागरिकांना नियमितपणे उपयोगी पडतील, अशा पद्धतीने त्यांची उभारणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, अलिबाग, पेण, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. आतापर्यंत १०३.५ किलोमीटर उच्चदाब वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मनुष्यबळात वाढ करून निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यासोबतच समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यापासून संरक्षण करणाऱ्या समुद्रकाठच्या बंधाऱ्यांचे आणि खारपाटणांचे मजबुतीकरण करण्याच्या कामालाही पावसाळ्यानंतर वेग देण्याचे निर्देश देण्यात आले. ही कामे गुणवत्तापूर्ण आणि जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
कोकणातील नागरिकांची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, आपत्तीपूर्व तयारी, सुरक्षित स्थलांतर आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.