Wednesday, September 9, 2026

Gen-z अशीही : शिरीषकुमार

Share

९ सप्टेंबर म्हणजे नंदुरबार येथील शिरिषकुमार आणि त्याचे अन्य तीन किशोरवयीन मित्र यांचा बलिदान दिवस. त्यानिमित्ताने आजच्या दिवशी १९४२ मध्ये ‘genz’ म्हणता येईल अशा वयात असणाऱ्या नंदुरबार गांवच्या लहानग्या शिरीषकुमारचे विशेष स्मरण करणे उचित ठरेल. या चौघांचा आदर्श आजच्या तरुणाईनेही समोर ठेवावा आणि देश आणि समाज कल्याणाची वाट धरावी.  

——————————————————————————–

१९४२ !  गांधीजींनी दिलेल्या ‘चले जाव’ या चळवळीने अख्खा देश भारला गेला होता.  गांधीजींनी दिलेल्या या चळवळीच्या हाकेला अख्ख्या भारत भरातून प्रचंड प्रतिसाद मिळत होता. गावागावातून चले जाव चे झेंडे घेऊन, घोषणा देत प्रभातफेऱ्या निघू लागल्या होत्या. आबालवृद्ध या चळवळीत सामील होऊन ब्रिटिशांप्रतीचा आपला असंतोष व्यक्त करत होते.

महाराष्ट्रातील नंदुरबार नावाचे गांव देखील याला अपवाद नव्हते. या लहानशा गावातील १५ -१६ वर्षांचा शाळकरी मुलगा असणार शिरीषकुमार सजगपणे या परिस्थितीकडे पाहत होता. गांधीजींनी दिलेल्या या घोषणेमागचा अर्थ त्याने नेमका समजून घेतला होता. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपणही यात सहभाग घेतला पाहिजे अशी त्याची दृढ धारणा होती. 

नऊ  सप्टेंबरच्या दिवशी, काढलेल्या मिरवणुकीमध्ये तो सहभागी झाला. हातात झेंडे घेऊन जमलेली शाळकरी मुले पाहताच एक पोलिस शिपाई तो झेंडा त्यांच्या हातातून हिसकावून घेण्यासाठी जवळ येऊ लागला. त्याचा उद्देश सफल होऊ नये म्हणून शिरीष ने एक युक्ती केली. त्याने सर्वांना गोलाकार उभे केले. एकाच्या हातात झेंडा दिला. इतक्यात एक पोलीस झेंडा हिसकवायला आला. त्या मुलाने तो दुसऱ्याच्या हातात दिला. पोलीस तेथे गेला तोच, झेंडा तिसऱ्याच्या हातात गेला.  यामुळे पोलीस चिडला आणि तणतणत तेथून निघून गेला. त्यांनंतर या मुलांनी मिरवणूक सुरू केली. कित्येक मुलीदेखील यात सहभागी झाल्या होत्या. पोलिस मुलींवर लाठीमार करण्याची चिन्हे दिसताच, शिरीषने ‘मुलींवर काय गोळ्या झाडता हिम्मत असेल तर माझ्यावर गोळी झाडा’ असे सांगत पुढाकार घेतला, आणि असीम धैर्य दाखवत बंदुकीच्या गोळ्या छातीवर झेलून हौतात्म्य पत्करले. त्याच्या बरोबरच लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्‍यामदास शहा असे त्याचे मित्र देखील धारतीर्थी पडले. हा इतिहास सर्वश्रुत आहे.

वास्तविक शिरीषकुमार एका संपन्न घरातील मुलगा होता. अशा प्रकारच्या कोणत्याही आंदोलनात भाग न घेताही त्याचे आयुष्य सुखाने व्यतीत होत राहिले असते. असे असूनही, आजच्या भाषेत केवळ टीनएजर म्हणजेच एका अर्थी  ‘Gen-z’ असणाऱ्या या कोवळ्या मुलाने आपले आयुष्य, करियर, घर, परिवार या कशाचाही विचार न करता, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले. स्वार्थापलिकडे जात, आपल्या निर्भयतेचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी व्हावा म्हणून जीवाचे बलिदान दिले.

Genz ही संज्ञा सध्या लोकप्रिय आहे. १९९७ ते २०१२ या कालावधीमध्ये जन्माला आलेली पिढी म्हणजेच सुमारे २८ ते १४ या वयोवर्षामधील तरुण मुले म्हणजे genz! अतिशय संवेदनशील, आजूबाजूच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय वातावरणाविषयी सजग असणारी, बेधडक प्रश्न विचारणारी पिढी म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. ते काही अंशी खरे देखील आहे. फक्त या संवेदनशीलतेला आणि बेधडक स्वभावाला मिळणारी दिशा कुठली..? यावरच त्या गुणांची देशाप्रती आणि समाजाप्रती असणारी उपयोगिता अवलंबून असते.  

काळ कितीही बदलत गेला, तरी मानवी मन फारसे बदलत नाही असे म्हणतात. सुमारे ८०-९० वर्षांपूर्वी देशभक्तीची जी भावना तत्कालीन युवा पिढीच्या मनात होती तीच आजही आहे.. असायला हवी. म्हणूनच देश, समाज आणि धर्माप्रती आपली काही बांधिलकी आहे असे मानत, केवळ मतप्रदर्शन करण्याऐवजी सामाजिक कामामध्ये आपले प्रत्यक्ष योगदान देत देत अपेक्षित सुधारणा आणि बदल घडवून आणण्याची इच्छाशक्ती दाखवण्यची अपेक्षा आजही या उसळत्या तरुणाईकडून करता येईल.. फक्त आदर्श शिरीषकुमार सारख्या देशभक्त genz चा असायला हवा!

– मैत्रेयी जोशी

अन्य लेख

संबंधित लेख