बांगलादेशात ऑगस्ट २०२४ च्या राजकीय उलथापालथीनंतर अल्पसंख्याक हिंदू समाजावर सातत्याने अत्याचार होत आहेत. बांगलादेशातील हिंदूंच्या हक्कांसाठी लढणारे व चितगावमधल्या पुंडरीक धामचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास प्रभू हे अनेक दिवस तुरुंगात आहेत. त्यांच्या आईचे वुद्धापकाळामुळे निधन झाल्यानंतर, केवळ त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना स्थानिक प्रशासनाने अवघ्या पाच तासांचा जामीन दिला. आईच्या मृत्यूपूर्वी त्यांना भेटू दिले गेले नाही. अवघ्या पाच तासांच्या मुदतीत पोलीस बंदोबस्तात त्यांनी आईचे अंतिम दर्शन घेतले आणि पुंडरीक धाम मंदिरात जाऊन तेथील श्रीराधा-कृष्णाच्या मूर्तींच्या चरणी अश्रू ढाळत नतमस्तक झाले. त्यांना पुन्हा तुरुंगात नेण्यापूर्वीचा हा प्रसंग केवळ एका मुलाचा शोक नव्हता, तर संपूर्ण बांगलादेशी हिंदू समाजाच्या असहायतेचे आणि वेदनेचे प्रतीक ठरला.
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांक
बांगलादेशाच्या निर्मितीपासूनच तेथील मुस्लिम समाजाकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे हिंदू लोकसंख्येचा टक्का सातत्याने घटत आला आहे. १९७१ मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या सुमारे २०% च्या आसपास होती, जी आता घटून केवळ ७ ते ८% च्या आसपास उरली आहे. या बदलामागे हिंसाचार, सक्तीचे धर्मान्तर, स्थानिक मुस्लिमांकडून मालमत्ता हडपणे आणि सततची भीती हे मुख्य कारण आहे.
बांगलादेशात दुर्गापूजा, नवरात्र किंवा सामान्य दिवसांतही हिंदू मंदिरांवर, देवालयांवर आणि मूर्तींवर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडतात. हिंदू अल्पसंख्याकांच्या जमिनी बळकावणे, त्यांची घरे आणि दुकाने पेटवून देणे किंवा त्यांना भीती दाखवून देश सोडण्यास भाग पाडणे हे प्रकार वारंवार समोर येतात.
हिंसाचार करणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर तेथील स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात नाही, ज्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण सतत वाढत आहे. ढाका विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. अबुल बरकत यांच्या संशोधनानुसार ‘एनेमी प्रॉपर्टी ॲक्ट’ (Enemy Property Act / Vested Property Act) मुळे हिंदूंच्या मालमत्तेवर झालेला परिणाम:
- बाधित कुटुंबे: बांगलादेशातील सुमारे १० लाख हिंदू कुटुंबे (एकूण हिंदू कुटुंबांपैकी सुमारे ४०%) या कायद्यामुळे प्रभावित झाले.
- जमिनीचे नुकसान: सुमारे २० लाख एकर जमीन हिंदूंनी गमावली, जी बांग्लादेशातील एकूण हिंदू-मालकीच्या जमिनीच्या ४५% इतकी आहे.
- स्थलांतर दर: त्यांच्या अभ्यासानुसार १९६४ ते २०१३ या कालावधीत दररोज सरासरी ६३२ हिंदूंनी बांग्लादेशातून पलायन केले.
चिन्मय कृष्ण दास प्रभू यांचा संघर्ष
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या या अत्याचाराविरोधात शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवण्यासाठी ‘बांगलादेश सम्मिलित सनातन जागरण जोत’ आणि ‘सनातन जागरण मंच’ची स्थापना झाली. चिन्मय कृष्ण दास प्रभू यांनी या चळवळीचे नेतृत्व करत चितगाव आणि रंगपूर येथे विशाल मोर्चे काढले.
हिंदू समाजासाठी त्यांनी आठ प्रमुख मागण्या लावून धरल्या होत्या:
- अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी विशेष कायदा आणि न्यायाधीकरणाची स्थापना.
- अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाची स्थापना.
- हिंदू देवस्थान मालमत्ता संरक्षण कायद्याची अंमलबजावणी.
- दुर्गापूजेसाठी बहुदिवसीय शासकीय सुट्टी.
या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या चिन्मय कृष्ण दास यांच्यावर राष्ट्रद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, ज्यामुळे बांगलादेशातील कायद्याच्या अंमलबजावणीवर आणि अल्पसंख्याकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारताचे तेथील हिंदूंविषयी संवेदना
बांग्लादेशातील या घडामोडींवर भारतातील केंद्र सरकारने अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे.
- भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर आणि त्यांना जामीन नाकारण्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शांततापूर्ण मागण्या करणाऱ्या धार्मिक नेत्यांना डांबून ठेवून हिंसाचार करणाऱ्यांना मोकळे सोडण्याच्या प्रकाराचा भारताने निषेध केला आहे.
- ढाका येथील अंतरिम सरकारकडे भारताने बांगलादेशातील हिंदू, त्यांची मंदिरे आणि मालमत्तांच्या सुरक्षेची ग्वाही देण्याची सातत्याने मागणी केली आहे.
- जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांपुढे बांग्लादेशातील हिंदूंच्या मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा मांडण्यासाठी भारतीय नेतृत्व आणि राजनैतिक यंत्रणा सक्रिय आहे.
चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना आईच्या अंत्यसंस्कारासाठी मिळालेला अवघ्या काही तासांचा परोल आणि त्यांनी मंदिरातील देवतेच्या चरणी टेकवलेले मस्तक हे बांगलादेशातील हिंदूंच्या न्यायासाठी सुरू असलेल्या संघर्षाचे करुण चित्र मांडते. शेजारील देशातील हिंदूंच्या अस्तित्वाचा आणि मानवाधिकाराचा हा प्रश्न केवळ एका समुदायापुरता मर्यादित नसून संपूर्ण जागतिक शांततेसाठी संवेदनशील विषय बनला आहे. भारत सरकार आणि जागतिक समुदायाने या विषयावर अधिक ठाम पावले उचलणे ही काळाची गरज आहे.
बांगला देशातील एकूण ८ विभागांमधील हिंदू लोकसंख्या (२०२२ जनगणना)
| विभाग (Division) | एकूण लोकसंख्या | हिंदू लोकसंख्या | टक्केवारी (%) |
| सिलहट (Sylhet) | १,१०,३४,९५२ | १४,९१,३१५ | १३.५१% |
| रंगपूर (Rangpur) | १,७६,१०,९५५ | २२,९०,४५० | १३.०१% |
| खुलना (Khulna) | १,७४,१५,९२४ | २०,०७,५०२ | ११.५३% |
| बरिसाल (Barisal) | ९१,००,१०४ | ७,५०,१७७ | ८.२४% |
| चितगाव (Chittagong) | ३,३२,०२,३५७ | २१,९६,९४७ | ६.६१% |
| ढाका (Dhaka) | ४,४२,१५,७५९ | २७,६६,८७४ | ६.२६% |
| राजशाही (Rajshahi) | २,०३,५३,११६ | ११,५९,१९७ | ५.७०% |
| मयमनसिंग (Mymensingh) | १,२२,२५,४४९ | ४,८१,७४२ | ३.९४% |