अमली पदार्थांच्या बेकायदेशीर तस्करीविरोधात ठाणे पोलीस आयुक्तालयाने चालवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटने एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे १० लाख ३८ हजार ३७० रुपये किमतीचा २० किलो ९९६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. मोहम्मद अफसर मुमताज अन्सारी (वय २२, रा. ईदगाह रोड, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ईदगाह कब्रस्तानसमोर रचला सापळा
भिवंडी शहरात एका तरुणाकडून मोठ्या प्रमाणावर गांज्याची विक्री केली जाणार असल्याची गोपनीय माहिती भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार वसंत चौरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या पथकाने २२ सप्टेंबर रोजी ईदगाह रोडवरील ईदगाह कब्रस्तान समोरील रस्त्यावर मोर्चेबांधणी करत सापळा रचला.
संशयितरीत्या वावरणाऱ्या मोहम्मद अफसर अन्सारी याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे २० किलोपेक्षा जास्त गांजा आढळला. पोलिसांनी तात्काळ हा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने हा गांजा थेट ओडिसातून आणल्याची कबुली दिली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करत आहे.
भिवंडीत आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटवर कारवाईचे सत्र
भिवंडी परिमंडळ २ च्या हद्दीत येणाऱ्या नारपोली, शांतीनगर, भोईवाडा, निजामपूर शहर आणि कोनगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रतिबंधित गांजा, कोडिनयुक्त कप सिरप, गुटखा व ड्रग्ज विक्री करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी सातत्याने कारवाया केल्या आहेत.
यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये गुजरात एटीएसने भिवंडीत कारवाई करत ८०० कोटी रुपये किमतीचा ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. तसेच एप्रिल २०२४ मध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) रहानाळ ग्रामपंचायत हद्दीतील गोदामावर छापा टाकून १७४५ कोटी रुपयांचे ३४९ किलो कोकेन जप्त केले होते. केवळ कारवायांवर न थांबता, भिवंडी पोलिसांनी नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात ‘से टू नो ड्रग्ज’ (Say To No Drugs) या टॅगलाईनखाली विशेष मोहीम राबवून तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अमली पदार्थांच्या या जाळ्याचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.