Thursday, September 17, 2026

‘विश्वकर्मा जयंती’: निर्मितीचा उत्सव, राष्ट्रनिर्माणाचा संकल्प

Share

भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना ही अत्यंत व्यापक, उदार आणि मानवकल्याणाचा विचार करणारी आहे. येथे ‘कुटुंब’ म्हणजे केवळ एकाच रक्ताच्या नात्याने बांधलेले व्यक्तींचे वर्तुळ नाही; तर त्या घरात राबणारा मजूर, आश्रित आणि संपूर्ण समाज हा त्या कुटुंबाचाच एक भाग मानला गेला आहे. निसर्गातील मनुष्य, प्राणी आणि वनस्पती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही संस्कृती मानवी श्रमाचा आणि निर्मितीचा गौरव करण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. याच समृद्ध आणि गौरवशाली परंपरेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे भगवान विश्वकर्मा जयंती, जी अनादी काळापासून या भूमीत ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून साजरी होत आली आहे.

भारतीय ग्रामव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या ‘बारा बलुतेदार’ पद्धतीने देशाच्या अर्थकारणाला आणि संस्कृतीला समृद्ध केले. सुतार, लोहार, कुंभार, सोनार, विणकर अशा अष्टपैलू कारागिरांनी आपल्या कौशल्याच्या बळावर समाजाच्या गरजा भागवत नवनिर्माणाचा ध्यास घेतला. हे सर्व कष्टकरी आणि तंत्रज्ञ भगवान विश्वकर्मा यांना आपले दैवत व पूर्वज मानतात. रामायण, महाभारत, स्कंदपुराण आणि वेदांमध्ये उल्लेख असलेले भगवान विश्वकर्मा हे केवळ एका विशिष्ट पौराणिक व्यक्तिमत्त्वापुरते मर्यादित नाहीत; तर ते स्थापत्य, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि कलाकुसरीच्या अथांग कौशल्याचे राष्ट्रव्यापी प्रतीक आहेत. द्वारका, इंद्रप्रस्थ, लंका यांसारख्या भव्य नगरांचे निर्माण असो वा रामसेतू आणि पुष्पक विमानाची रचना असो, विश्वकर्मा ही संकल्पना मानवी कल्पकता आणि श्रमाच्या सर्वोच्च शिखराचे प्रतिनिधित्व करते.

मात्र, विश्वकर्मा पूजनाचे महत्त्व केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसून, त्यात ‘समाजहितासाठी त्याग’ हा उदात्त संदेश दडलेला आहे. वृत्रासुराच्या विनाशासाठी दधिची ऋषींच्या अस्थींपासून ‘वज्र’ बनवून आपल्याच पुत्राचा अंत पाहणारे विश्वकर्मा हे सिद्ध करतात की, राष्ट्राच्या व समाजाच्या कल्याणापुढे वैयक्तिक हित दुय्यम आहे. हाच त्याग आणि समर्पणाचा भाव भारतीय कामगारांचा मूळ आत्मा आहे.

आज आपण स्वातंत्र्याच्या ‘अमृतकालात’ वाटचाल करत आहोत. अशा वेळी वैचारिक आणि ऐतिहासिक गुलामीच्या खुणा पुसून टाकणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ठरते. १ मे हा दिवस परकीय आणि साम्यवादी प्रभावातून लादला गेलेला असून, तो प्रामुख्याने वर्गसंघर्ष आणि नकारात्मकतेला प्रोत्साहन देतो. त्याउलट, हजारो वर्षांची परंपरा असणारा १७ सप्टेंबर (विश्वकर्मा जयंती) हा दिवस संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा, निर्मात्याचा सन्मान करणारा आणि सकारात्मकतेची प्रेरणा देणारा खरा ‘राष्ट्रीय श्रमिक दिवस’ आहे. देशातील अनेक राज्ये आणि ‘भारतीय मजदूर संघ’ गेली ६७ वर्षे हा दिवस श्रमिक दिन म्हणून साजरा करत आहेत. महाराष्ट्र शासनानेही सर्व सरकारी कामगार कार्यालयांमध्ये या दिवशी विश्वकर्मा पूजनाचा घेतलेला निर्णय हा याच वैचारिक स्वातंत्र्याचा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

निर्मितीचा ध्यास, कौशल्याचा गौरव आणि समाजहिताचा त्याग शिकवणाऱ्या भगवान विश्वकर्मा यांच्या विचारांवर चालणे हीच खऱ्या अर्थाने विकसित भारताच्या निर्मितीची पूर्वअट आहे!

अन्य लेख

संबंधित लेख