Thursday, November 28, 2024

मविआला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल

Share

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनिल देशमुख यांना संबंधित प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं आहे. त्यामुळे मविआसाठी हा मोठा धक्का आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर आहे. सीबीआयने या प्रकरणी आता अनिल देशमुख यांनादेखील आरोपी बनवलं आहे. याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि इतर आरोपी होते. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात जबाब दिला होता.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख गृहमंत्री असतांना भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. गिरीश महाजन यांच्यावर त्यावेळी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पण हा गुन्हा जळगावात दाखल व्हावा यासाठी अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी तत्कालीन जळगावचे एसपी प्रवीण मुंढे यांना सातत्याने फोन केला होता. अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी एसपींवर दबाव टाकला होता, असा जबाब स्वत: प्रवीण मुंढे यांनी सीबीआयकडे दिला होता.

मविआ सरकार काळात गिरीश महाजन यांना या गुन्ह्यात अडकवण्यासाठी ट्रॅप करण्यात आलं होतं, असा देखील खुलासा झाला होता. विधानसभेच्या काळात अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित तीन स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ दाखवले होते. देवेंद्र फडणीस यांनी संबंधित स्टिंग ऑपरेशनचा पेनड्राईव्ह सभागृहात सादर केला होता. त्यानंतर चव्हाण यांना अटक करण्यात आली. आटा अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे असं दिसतंय.

अन्य लेख

संबंधित लेख