Saturday, September 12, 2026

१,४०० वर्ष जुना झगडा ‘नमाज-ए-जनाजा’ दोनदा

Share

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी… तो भयंकर सुदैवी ठरला…

जिवंतपणी दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीच्या तुकड्याचा ७/१२ आपल्या नावावर करण्याचा… आपण जमीनदार होण्याचा त्याचा चोरहट्ट अगदी सातासमुद्राच्या पलीकडील गोऱ्या साहेबाने पूर्ण केला…

तसा तो चार बुकं शिकलेला होता… जमिनीच्या तुकड्यासाठी गावकऱ्यांशी भांडताना तो खूप आजारी पडला होता…

आयुष्याच्या अखेरीस का होईना पण… आपल्याच गावकऱ्यांचे मुडदे पाडून तो एका जहागिरीचा जहागिरदार झाला होता… आणि त्याच्या टोळीतील बाकीचे सरदार त्याला त्या टोळीचा फायदे आझम म्हणू लागले…

जहागीरदार म्हणून नसलेल्या मिशीवर ताव देत असतानाच वर्ष सव्वा वर्षात त्याला मृत्यूने गाठले… पण तो रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यासारखा मेला…

त्याला इस्पितळात नेत असताना वाटेत ॲम्बुलन्स बंद पडली… पण त्याच्या टोळीतला एकही सरदार त्याला बघायला देखील आला नाही… जिवंतपणी त्याच्या अंगावर बसलेल्या माशा त्याची बहीण हाकलवत होती…

हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार सुरू करेपर्यंत कयामतच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी त्याने कायमचे डोळे मिटले…

पण मेल्यावर त्याच्या जन्नतच्या प्रवासासाठी दोन वेगवेगळी रॉकेट्स सोडण्यात आली…

पहिले रॉकेट त्याच्या बहिणीच्या हट्टापायी तो ज्या मियां बिरादारीत जन्मला होता… त्या “मेड फॉर मियां” बिरादारीचे  ‘नमाज-ए-जनाजा’ रॉकेट होते…

पण त्याच्या टोळीतील त्याचा उजवा हात… वजीर ए आजम विलायत अली खान हा मियां बिरादारीशी १,४०० वर्षे जुनी दुश्मनी असलेल्या मुन्नी या दुसऱ्या बिरादारीत जन्माला आला होता… त्याच्याच्याने हे “मेड फॉर मियां” रॉकेट फायर करताना होणारा आवाज ऐकवला जात नव्हता… म्हणून तो लाँचिंग पॅडपासून लांब जाऊन उभा राहिला…

“मेड फॉर मियां” रॉकेट फायर झाले…

पण फायदे आझमच्या टोळीतील बहुतांशी दरोडेखोर हे मुन्नी बिरादारीचे असल्यामुळे त्यांना आपला सरदार “मेड फॉर मुन्नी” रॉकेटने जन्नतमध्ये जावा असे वाटत होते…

म्हणून त्यांनी आपल्या वेगळ्या लाँचिंग पॅडवर आपले ‘नमाज-ए-जनाजा’ रॉकेट सजवले… तिथे त्याच्या टोळीतील सगळे दरोडेखोर आणि बाजारबुणगे हजर होते…

यावेळी फायदे आझमची बहिण लांब उभी राहिली… कारण “मेड फॉर मुन्नी” रॉकेट फायर करताना होणारा आवाज तिच्याच्याने ऐकवला जात नव्हता…

आता “मेड फॉर मुन्नी” रॉकेट फायर झाले…

पण तो नेमका कोणत्या रॉकेटमधून जन्नतमध्ये गेला त्याची कोणालाच कल्पना नाही मात्र…

मात्र ज्या रॉकेट मधून तो जन्नतकडे रवाना झाला होता त्यात रॉकेटमध्ये पुण्याईचे इंधन इतके कमी पडले की ते वाटेतच जहन्नुममध्ये कोसळले… असे त्याच्याच टोळीतील जाणकार दरोडेखोर सांगतात…

अन्य लेख

संबंधित लेख