Wednesday, September 16, 2026

गौरी गणपती जवळ आले की दडपण येतं? ३ टिप्स, सणवार करा एन्जॉय

Share

सणवार थकवणारे नाहीत तर आनंद देणारे होतील

गौरी-गणपती म्हटले की घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आनंदात असतात मात्र घरातील स्त्रियांना मात्र दडपण येतं. गौरी गणपतीसाठी महिनाभर आधीपासून सुरू होणारी साफसफाई, सजावटीसाठी लागणारी तयारी, घरातील सामानाच्या याद्या, स्वयंपाक, फराळाचे पदार्थ आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत, प्रसादाचे पदार्थ, आरतीची तयारी या विचारानेही महिला वर्गाला ताण येतो. रोजची घरातली कामं, नोकरी, मुलांचे रुटीन हे असतेच आणि त्यात सणवार म्हटले की बायकांची झोप उडते. 

वय वाढत जातं तसं या सगळ्याचा ताण येतो आणि मग त्याचा शरीरावर आणि मनावर परिणाम व्हायला लागतो. सण साजरे करायचे, कुटुंबातील सगळ्यांसोबत त्याचा आनंदही घ्यायचा तर काही गोष्टींचे आधीपासून योग्य पद्धतीने नियोजन करायला हवे. साफसफाई आणि स्वयंपाकाची कामे करताना खालील गोष्टी लक्षात घेतल्या तर काम तर सोपे होतेच पण आपलीही प्रमाणाबाहेर दमणूक होत नाही. यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी..

१. एकदम सगळी साफसफाई नको – आपल्याला रोजचे रुटीन असताना जेवढी शक्य आहे तेवढीच साफसफाई करावी. गौरी-गणपती येणार म्हणून आमच्याकडे स्वंयपाकघरातील प्रत्येक भांडी घासायला लागतात यांसारख्या जुन्या रुढी काळानुसार बदलायला हव्यात. सगळी साफसफाई एकाच दिवशी किंवा एकावेळी करण्याऐवजी आठवडा-दोन आठवडे आधीपासून साफसफाई केल्यास कामाचा ताण येत नाही. आवश्यक तितकीच आणि आपल्याला झेपेल तेवढीच साफसफाई करावी, सण म्हणून अति केल्याने ऐन सणाचा आनंद आपण घेऊ शकत नाही.

२. मदत घ्यायलाच हवी – बरेचदा साफसफाई, स्वयंपाकघर, सणवार यांचा ताण कुटुंबातील महिला वर्गावर सर्वाधिक येतो. असे होऊ नये यासाठी कुटुंबातील सगळ्यांची मदत अवश्य घ्यायला हवी. नवरा, मुले, कुटुंबातील इतर व्यक्ती यांना त्यांच्या क्षमतेनुसार झेपतील, जमतील तितकी कामे वाटून द्यायला हवीत, त्यामुळे आपला ताण नक्कीच कमी होऊ शकतो. शक्य असेल तर मदतनीसांची मदत घेऊन साफसफाई करावी, त्यामुळे वेळ आणि श्रम नक्कीच वाचतात. हल्ली ऑनलाईनही साफसफाई करुन देणाऱ्या बऱ्याच एजन्सी अगदी सहज उपलब्ध असतात. 

३. आधुनिक उपकरणांचा वापर करावा – आजकाल साफसफाईसाठी व्हॅक्युम क्लिनर, फरशी साफ करण्यासाठी स्वयंचलित रोबोट यांसारख्या उपकरणांचा वापर अवश्य करायला हवा. त्यामुळे काम निश्चितच कमी वेळात आणि कमी कष्टात होते. याशिवायही आणखी काही उपकरणे, यंत्रणा आपल्याला उपलब्ध होऊ शकतात का याचा थोडा आधीपासून विचार केल्यास सणवार हे महिला वर्गासाठी थकवणारे नाही तर आनंद देणारे होतील. 

– सायली जोशी – पटवर्धन

अन्य लेख

संबंधित लेख