मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील कार्यक्रमात केलेल्या भाषणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले असून, “ज्यांना निमंत्रण मिळाले नाही, त्यांना वाईट वाटतेय आणि त्यातूनच ही टीका होत आहे,” असा खोचक टोला लगावला आहे.
मुंबईत झालेल्या संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मराठी आणि हिंदी भाषेच्या वापराबाबत आपले मत मांडले होते. यावर राज ठाकरे यांनी समाजमाध्यमातून आक्षेप घेत संघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.
राज ठाकरेंच्या टीकेबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ज्या लोकांना निमंत्रण मिळाले नाही, त्यांना त्याचं वाईट वाटतंय. म्हणूनच ज्यांना निमंत्रण मिळालं, त्यांच्यावर ते आता टीका करत आहेत. याला दुसरं काहीही म्हणता येणार नाही, ही सरळ सरळ पोटदुखी आहे.”
संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने लोकांच्या मनातले प्रश्न दूर व्हावेत आणि संघाबद्दलची स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी विविध क्षेत्रांतील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले होते. “उद्योजक, कलाकार आणि विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांना बोलावण्यामागचा उद्देश संवाद साधणे हा होता. मात्र, जे या प्रक्रियेचा भाग नाहीत, तेच आता वावड्या उठवत आहेत,” असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
एरवी भाजप आणि मनसे यांच्यात अनेक मुद्द्यांवर सामंजस्य पाहायला मिळते. मात्र, थेट संघाच्या कार्यक्रमावरून आणि सरसंघचालकांच्या भाषणावरून फडणवीस आणि ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याने याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.