गडचिरोली : जिल्ह्याला माओवादाच्या छायेतून मुक्त करण्याच्या प्रवासात सुरक्षा दलांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची 44 स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केल्याने जिल्ह्यातील माओवादाविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन करत ही कारवाई केवळ भौतिक संरचना हटवण्यापुरती नसून, अनेक वर्षे जनतेच्या मनात घर केलेल्या भीतीवर लोकशाहीने मिळवलेला निर्णायक विजय असल्याचे नमूद केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, माओवाद्यांकडून दुर्गम आणि अतिदुर्गम भागात ही स्मारके उभारली गेली होती, ज्यांचा उद्देश स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे आणि आपले अस्तित्व दाखवणे हा होता. मात्र, शासनाच्या सातत्यपूर्ण आणि ठाम माओवादविरोधी धोरणामुळे गडचिरोलीतील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. सुरक्षा कारवाया, आत्मसमर्पण धोरण, विकास प्रकल्प आणि स्थानिक जनतेचा विश्वास यामुळे जिल्ह्यातील वातावरण सकारात्मक दिशेने बदलत आहे.
या संयुक्त मोहिमेत गडचिरोली पोलीस दल, सी-60 कमांडो, सीआरपीएफ आणि विशेष पथकांच्या संयुक्त मोहिमेत सुमारे 800 जवानांनी नियोजनबद्ध शोध आणि तपासणी मोहीम राबवली. बीडीडीएस पथकाच्या तपासणीनंतर विविध जंगल परिसरातील ही 44 स्मारके नेस्तनाबूत केली. एटापल्ली, हेडरी, भामरागड, जिमलगट्टा, धानोरा आणि पेंढरी उपविभागांतील ही कारवाई विशेषतः संवेदनशील भागात पार पडली.
जिथे पूर्वी दहशतीचे प्रतीक उभे होते, तिथे आता प्रशासनावरील विश्वास आणि विकासाची आशा निर्माण झाली आहे. ही कारवाई गडचिरोलीतील बदलत्या वास्तवाचे प्रतीक आहे. भीतीपासून विश्वासाकडे, हिंसेपासून विकासाकडे होणाऱ्या संक्रमणाचा हा निर्णायक टप्पा ठरत असल्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे.