वाकड : “सर्वसमावेशक आणि न्यायपूर्ण भारतासाठी हिंदू एकता अनिवार्य असून, आपण सर्वांनी जातीपातीचे भेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. संघटित हिंदू एकतेतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहू शकतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे यांनी केले. वाकड येथील शोनेस्ट टॉवर राम मंदिर परिसरात सकल हिंदू समाज आणि हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित ‘विराट हिंदू संमेलना’त ते बोलत होते.
गुढीपाडव्याचे औचित्य साधून वाकडमधील विविध भागांतून भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. या सर्व शोभायात्रांचे राम मंदिर येथे एकत्रीकरण झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि वारकरी मंडळांच्या पारंपरिक नृत्याने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. ज्ञानदेव पेरनाळकर यांनी सादर केलेल्या गणेशवंदनेने उपस्थितांची मने जिंकली.

या सोहळ्याला चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. तसेच, भाजपाचे विद्यमान नगरसेवक श्रुती वाकडकर, कुणाल वाव्हळकर, राहुल कलाटे, विनायक गायकवाड आणि स्नेहा कलाटे यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद बाळासाहेब कुटे यांनी भूषवले, तर उपाध्यक्षपदी शिवाजी ढेबे उपस्थित होते.
संमेलनादरम्यान लहान मुलांनी ‘राम स्तुती’ आणि ‘तराणा’ सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. हेमंत हरहरे यांनी आपल्या भाषणात कुटुंब संस्था आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यावरही भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबोली मांडे आणि वाल्मिक मांडवडे यांनी केले. या संमेलनास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि परिसरातील सुमारे २ हजार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.