Wednesday, June 10, 2026

चैतन्यशील परंपरेचे सुभग दर्शन

Share

आळंदी आणि देहू येथून लवकरच श्री ज्ञानदेव महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेने वाट चालू लागतील. त्याचवेळी, महाराष्ट्राच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या मार्गक्रमण करू लागतील. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीचे सर्वात मोठे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरीची वारी हेच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात एकत्र येतात. ही परंपरा केवळ एक धार्मिक यात्रा नसून तो समता, बंधुता आणि भक्तीचा एक अनुपमेय संगम आहे. वारीच्या या परंपरेला प्राचीन इतिहास असला, तरी तिला खऱ्या अर्थाने संघटित स्वरूप संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत यांच्या काळापासून लाभले. पुढे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी इ.स. १६८५ मध्ये देहू आणि आळंदी येथून संतांच्या पादुका पालखीत ठेवून नेण्याची पद्धत सुरू केली, जी आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते.

महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतून अनेक पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. यामध्ये प्रामुख्याने आळंदीहून निघणारी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहू येथून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी या दोन प्रमुख पालख्या मानल्या जातात. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात चालणाऱ्या या सोहळ्यांशिवाय नाशिकच्या त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी, पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी, सासवडहून संत सोपानदेव महाराजांची पालखी, मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाईंची पालखी आणि विदर्भातील शेगाव येथून निघणारी संत गजानन महाराजांची पालखी या महत्त्वाच्या पालख्या आहेत. या व्यतिरिक्त संत नामदेव महाराज, संत चोखामेळा, संत सावता माळी आणि संत गोरोबा काका यांच्याही पालख्या आपापल्या क्षेत्रातून पंढरीकडे निघतात. या पालख्यांसोबत विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविक टाळ-मृदंगाच्या गजरात सहभागी होतात.

अशी वारी ज्या पंढरीला जाते, त्या पंढरीचे वर्णन काय करावे? ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी…’ असे संतवचनच आहे. अशा या पंढरीचे सुभग दर्शन छायाचित्रे आणि त्यांना साजेसा मजकूर असा मेळ जमवून घडविण्याचा घाट अनेक प्रतिभावंतांनी घातला. त्यातूनच ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा अतिशय सुबक, देखणा आणि उत्कृष्ट छायाचित्रांना तितक्याच उत्कट लेखनाची महिरप असणारा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. याचे लेखन ख्यातमान कवी-अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे यांनी केले आहे. कला दिग्दर्शन गोपी कुकडे या प्रतिभावान कलावंतांनी केले आहे आणि हा प्रकल्प विनोद पवार यांनी मार्गी लावला आहे. वैष्णवांसाठी पंढरीचे म्हणजे आपल्या पंढरपूरचे मोल हे प्रत्यक्ष वैकुंठापेक्षाही अधिक आहे. ‘न लगे मुक्ती आणि संपदा, संतसंग देई सदा..’ अशी आस असणाऱ्या वारकऱ्यांना दरवर्षी अनेकदा पंढरीची ओढ लागते. ही पंढरी आहे तरी कशी, तिथे मंदिरे कोणती आहेत, या पंढरीची लोकसंस्कृती काय सांगते आणि चंद्रभागेच्या वाळवंटात काय काय विस्मय घडतात, हे सारे या ग्रंथातून फार उत्तम प्रतिबिंबित झाले आहे.

पंढरपूरचे समग्र दर्शन चित्रांमधून आणि शब्दांमधून घडविणारा असा हा महाग्रंथ या आधीच कसा बरे प्रकाशित झाला नसावा, असा प्रश्न प्रत्येक पानावरची छायाचित्रे पाहताना पडतो. मात्र, उशीर झाला असला तरी या ग्रंथाने मोठे सांस्कृतिक काम करून ठेवले आहे, यात शंका नाही. पंढरपुरातील बांधकामे, मंदिरे, प्राचीन अवशेष, मूर्ती, निसर्ग, नदी, शिल्पे, मंडप, वारकऱ्यांची विविध रूपे, तिथली बाजारपेठ, देवस्थानाच्या निमित्ताने उभे राहिलेले व्यवसाय आणि उद्योग… अशा साऱ्यांचे चित्रांकन योगेश परब, राहुल गोडसे, महेश लोणकर, गणेश दाभोळकर.. यांच्या चमूने केले आहे. ते इतके सुरेख आहे की, यातल्या काही छायाचित्रांवर वेगळे लेखच होऊ शकतील. उत्तम छायाचित्रे अनेकदा शब्दांच्या पलीकडचे असे खूप काही सांगत असतात. त्याचा प्रत्यय या ग्रंथात पानोपानी येतो. पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाई यांच्या मूर्ती वर्षभरात वेगवेगळ्या सण आणि उत्सवांच्या निमित्ताने विविध प्रकारे सजविल्या, नटविल्या जातात. दरवेळचा त्यांचा पोषाख आणि आभूषणे वेगळी असतात. त्या साऱ्यांचे दर्शन एका चित्रमालिकेतून घडते. ती पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.

चित्रे पाहता पाहता आपण अरुणाताईंनी लिहिलेला पंढरीचा इतिहास, पंढरीचे सांस्कृतिक महत्त्व आणि विठ्ठल या देवतेचे महाराष्ट्रासहित इतरत्र स्थान.. हे वाचतो आणि ती एक शब्दयात्राच घडते. ‘देवराया कोठे गेला, भक्तहृदयी लपला..’ या प्रकरणात चौदाव्या शतकापासून दक्षिण भारतात झालेल्या मुस्लिम आक्रमणांचा पंढरपूर मंदिरावर झालेला परिणाम नोंदविण्यात आला आहे. अफझलखानाने स्वारी केली तेव्हा विठ्ठलमूर्ती सुखरूप राहावी, यासाठी ती सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्यात आली. अफझलखानाच्या आधीही पंढरपूर आणि मंदिराला काही उपद्रव झाला असणार. पण त्याच्या नेमक्या नोंदी सापडत नाहीत. मात्र, या साऱ्या इतिहासाच्या काळात विठ्ठलाला एकूण १२ वेळा आपली जागा सोडून सुरक्षित राहण्यासाठी कुठे ना कुठे आश्रय घ्यावा लागला. केवळ अफझलखानच नव्हे तर मिर्झाराजे जयसिंह आणि दिलेरखान महाराष्ट्रावर चालून आले, तेव्हाही विठ्ठलाला आपले मंदिर सोडून इतरत्र आश्रय घ्यावा लागला होता. महाराष्ट्रात तळ ठोकून बसलेला औरंगजेब सन १७०७ मध्ये मरण पावला आणि त्यानंतर परिस्थिती थोडीशी सुधारली. पंढरपूरचा आणि विठ्ठलाचा हा इतिहास आज सारे विसरून गेले आहेत. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती पहिले शाहू महाराज यांनी विठ्ठलाच्या संरक्षणासाठी सशस्त्र सैनिकांचे खास पथक तैनात केले होते. ही सारी कथा वाचताना अनेक प्रश्न मनात येतात. आपलाच देश, आपलाच देव आणि त्याच्यावरच आक्रमणापायी कुठेतरी आश्रय घेण्याची किंवा लपून बसण्याची येणारी वेळ!

समर्थ रामदासस्वामी पंढरपुरात आले होते तेव्हा त्यांनी विठ्ठलाकडे पाहून

‘येथे कां रे उभा श्रीरामा| मनमोहन मेघश्यामा

चाप बाण काय केलें । कर कटावरी ठेविले 

कां बा धरिला अबोला । दिसे वेष पालटला 

काय जाली अयोध्यापुरी । येथे बसविली पंढरी

शरयूगंगा काय केली । कैची भीमा मेळविली

किल्किलाट वानरांचे ।थवे न दिसती तयांचे

दिसे हनुमंत एकला । हा कां सैन्यांतुनी फूटला

काय जाली सीता सती । येथे बहुत जन दिसती

रामदासीं सद् भाव जाणा । राम जाला पंढरीराणा’

अशी आर्त विनवणी केली होती. इतकेच नाही तर या विठ्ठलदर्शनाच्या निमित्ताने रामदास स्वामींनी तेथे विठ्ठल मंदिरातच दास मारूतीची प्रतिष्ठापना केली होती. एरवी पंढरपुरात देवदर्शन घेताना लक्षात न येणारा हा दास मारूती या ग्रंथात नेटके दर्शन देतो. हे विठ्ठलाचे मंदिर सर्वांसाठी खुले करण्याचे ऐतिहासिक कार्य साने गुरुजी यांनी केले आहे. पंढरपूरच्या इतिहासातील तो एक अविस्मरणीय अध्याय आहे. त्याचप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंढरपुरात स्थापन केलेले ‘संत गाडगे महाराज चोखामेळा विद्यार्थी वसतिगृह’ हे आजही मोलाचे काम करीत आहे. या वसतिगृहाचे छायाचित्रही इतिहासाचे स्मरण करून देते.

विविध अभ्यासकांना विठ्ठल कसा दिसला, याचा वेधक आढावा घेणारे एक प्रकरण या ग्रंथात आहे. त्याचाच एक स्वतंत्र ग्रंथ होऊ शकतो. या पुस्तकाच्या अखेरच्या भागात अनेक संतांच्या गोष्टी रसाळपणे सांगितल्या आहेत. सोबतची चित्रेही फार लोभस आहेत. ग्रंथाच्या अगदी अखेरीस येते ती वारी. ‘पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत…’ असे म्हणणारे असंख्यवारकरी आणि त्यांचा प्रवास आपल्याला दिसतो. त्यांचा भावकोमल उत्साह, रिंगण, असंख्य वारकऱ्यांचे दिसणारे एकच चित्र.. असे अनेक क्षण अंतर्मुख आणि आनंदी करतात.

या ग्रंथाच्या निमित्ताने एक मोठे सांस्कृतिक कार्य पार पडले आहे. याबद्दल या साऱ्या चमूला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच होतील. हा ग्रंथ गावोगावी आणि घरोघरी जायला हवा. तो एक अनमोल ठेवाच आहे…

अन्य लेख

संबंधित लेख