Sunday, June 14, 2026

बळंभटदादा देवधर : एका खांबावर उभा राहिलेला स्वबोधाचा वारसा

Share

भारतातील मल्लखांब साधकांसाठी १५ जून हा दिवस केवळ एका क्रीडाप्रकाराचा उत्सव नाही. हा दिवस एका स्वबोधी गुरूच्या स्मृतीशी जोडलेला आहे. परिस्थितीसमोर हतबल न होता, निसर्गाचे निरीक्षण, परंपरेचे ज्ञान आणि स्वतःची सर्जनशीलता यांच्या आधारे बळंभटदादा देवधर यांनी प्रशिक्षणाची अशी पद्धत विकसित केली, जी पुढे ‘मल्लखांब’ म्हणून अजरामर झाली.

बळंभटदादा देवधर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोठुरे येथील ब्राह्मण कुटुंबात झाला. सुमारे १७९४-९५ च्या सुमारास त्यांचे कुटुंब पुण्यात आले. तो पेशवाईच्या उत्तरार्धाचा काळ होता. वेद आणि धर्मग्रंथांचे अध्ययन करत असतानाच बळंभटदादांना कुस्ती, व्यायाम आणि शौर्यकलेची विशेष आवड निर्माण झाली.

त्यांनी नामांकित कुस्तीगुरू राघोबा वस्ताद यांच्या तालमीत शिक्षण घेतले. राघोबा वस्ताद हे पेशव्यांच्या दरबारातील ५२ सनदी पहलवानांपैकी एक होते. त्यांचा सादू तेली नावाचा बलाढ्य शिष्य आपल्या सामर्थ्याच्या गर्वामुळे गुरूंनाच आव्हान देऊन बसला. वृद्धत्वामुळे राघोबा वस्तादांना स्वतः झुंज देणे शक्य नव्हते. त्यांनी सादू तेलीला प्रथम बळंभटदादांशी कुस्ती लढण्यास सांगितले. या सामन्यात बळंभटदादांनी सादू तेलीचा पराभव करून आपल्या असामान्य कौशल्याची पहिली झलक दाखवली.

याच काळात हैदराबादच्या निजामाच्या दरबारातील अली आणि गुलाब हे दोन अजिंक्य पैलवान पुण्यात आले आणि त्यांनी पेशव्यांच्या दरबारातील मल्लांना खुले आव्हान दिले. हा केवळ कुस्तीचा सामना नव्हता; तो पेशव्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. आव्हान स्वीकारण्याचे धाडस बळंभटदादांनी दाखवले, परंतु त्यांना माहीत होते की विजयासाठी केवळ ताकद पुरेशी नाही; त्यासाठी वेगळी तयारी आवश्यक आहे.

लोकपरंपरेनुसार, विजयासाठी आशीर्वाद घेण्यासाठी ते नाशिकजवळील वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेले. देवीने स्वप्नात दर्शन देऊन मार्गदर्शन केल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर परिसरातील वानरांच्या चपळ हालचाली, झाडांवरची सहज उड्या, तोल आणि लवचिकता यांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. त्यातूनच त्यांच्या मनात एका अभिनव प्रशिक्षणपद्धतीची कल्पना आकार घेऊ लागली.

एका लाकडी खांबावर शरीराचे संतुलन राखत ताकद, लवचिकता, चपळता आणि नियंत्रण विकसित करण्याचा त्यांनी प्रयोग सुरू केला. पुढे हाच लाकडी खांब ‘मल्लखांब’ म्हणून प्रसिद्ध झाला. काही आख्यायिकांमध्ये स्वयं हनुमानांनी त्यांना या प्रशिक्षणपद्धतीचे मार्गदर्शन केल्याचा उल्लेखही आढळतो.

बळंभटदादांनी मल्लखांबाचा शोध लावला की त्याचे पुनरुज्जीवन केले, याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. कारण मल्लखांबाची परंपरा त्याहूनही प्राचीन असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. मात्र, या कलेला नवे जीवन देऊन ती कुस्तीपटूंच्या प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग बनवण्याचे श्रेय निश्चितपणे बळंभटदादांकडे जाते.

सहा महिन्यांच्या कठोर तयारीनंतर बळंभटदादा आखाड्यात उतरले. अलीविरुद्धच्या सामन्यात त्यांनी फिरकी, हरणफास आणि तबकफास यांसारखे डावपेच वापरले. अखेरीस ‘गळखोड्याचा डाव’ किंवा ‘यमपाश डाव’ लावत त्यांनी अलीचा पराभव केला. आपल्या सहकाऱ्याची झालेली हार पाहून गुलाबने सामना न खेळताच माघार घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते.

याच विजयाच्या स्मरणार्थ १५ जून हा दिवस आज मल्लखांब दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु बळंभटदादांचा खरा वारसा एका विजयानंतर संपत नाही. त्यांनी दाखवून दिले की भारतीय परंपरेत संकटांवर मात करण्यासाठी केवळ शक्ती नव्हे, तर निरीक्षण, नवोन्मेष आणि स्वबोध यांचीही तितकीच आवश्यकता असते. मल्लखांब हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही; तो त्या स्वबोधाचा जिवंत स्तंभ आहे.

या कथेत इतिहास किती आणि आख्यायिका किती, यावर अभ्यासकांमध्ये मतभेद असू शकतात. परंतु या प्रसंगाचा मूळ संदेश निर्विवाद आहे. संकट समोर उभे ठाकल्यावर बळंभट दादांनी परकीय पद्धतींचे अनुकरण केले नाही. त्यांनी आपल्या अनुभवातून, निसर्गातून आणि भारतीय व्यायामपरंपरेतून उत्तर शोधले. आज ज्याला आपण  .

बळंभट दादांचे कार्य पुण्यापुरते मर्यादित राहिले नाही. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर ते बाजीराव द्वितीय यांच्यासोबत उत्तर भारतात गेले. प्रवासादरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी आखाडे आणि व्यायामशाळा उभारल्या. कुस्ती, मल्लखांब, दांडपट्टा, तलवारबाजी यांसारख्या पारंपरिक विद्यांचे प्रशिक्षण त्यांनी दिले. बडोदा, सुरत, उज्जैन, इंदूर, ग्वाल्हेर, झाशी, वाराणसी आणि कानपूरपर्यंत त्यांचा प्रभाव पोहोचल्याचे उल्लेख आढळतात.

त्यांच्या शिष्यांमध्ये विविध समाजघटकांतील युवक होते. टेकजमालसारख्या अनाथ मुलाला आश्रय देऊन त्याला घडविण्याच्या कथा आजही सांगितल्या जातात. यावरून बळंभट दादांसाठी व्यायाम म्हणजे केवळ शरीरसाधना नव्हती; ती व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया होती.

मल्लखांबाची परंपरा पुढे इतकी बळकट झाली की आज ती भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनली आहे. बाराव्या शतकातील ‘मानसोल्लास’मध्ये खांबावरील व्यायामाचे उल्लेख आढळतात; परंतु या परंपरेला नवजीवन देण्याचे श्रेय बळंभट दादा देवधर यांनाच दिले जाते.

आज मल्लखांब भारताबाहेरही पोहोचला आहे. युरोप, अमेरिका आणि जगातील अनेक देशांमध्ये त्याची प्रात्यक्षिके होतात. भारतीय योग, व्यायाम आणि संतुलनशास्त्र यांचा अनोखा संगम म्हणून त्याकडे पाहिले जाते.

मात्र मल्लखांबाची खरी ताकद पदकांमध्ये किंवा विक्रमांमध्ये नाही. त्याची खरी ताकद त्या विचारात आहे ज्यातून त्याचा जन्म झाला. आपल्या संस्कृतीत, परंपरेत आणि ज्ञानात उत्तरे शोधण्याची क्षमता—हा बळंभट दादांचा सर्वात मोठा संदेश आहे.

कदाचित म्हणूनच बळंभट दादा देवधर हे फक्त मल्लखांबाचे जनक नाहीत. ते भारतीय स्वबोधाचे एक सशक्त प्रतीक आहेत. आणि म्हणूनच आजही प्रत्येक मल्लखांबाच्या खांबावर त्यांची परंपरा तितक्याच दिमाखात उभी आहे.

संदर्भ: वायुवेग 

– राजेश कोरडे

अन्य लेख

संबंधित लेख