Friday, July 10, 2026

ख्रिस्तीय अंत्यसंस्कारांचे बदलते वास्तव

Share

मुंबईतील कॅथलिक ख्रिश्चन समाजात अंत्यसंस्कारांच्या पारंपरिक आणि खर्चिक पद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणण्याविषयी अलीकडच्या काळात व्यापक मंथन सुरू झाले आहे. या सामाजिक चर्चेची सुरुवात मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘द एक्झामिनर’ या साप्ताहिक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पत्रामुळे झाली. एका सजग नागरिकाने, जॅनेट डिसूझा यांनी लिहिलेल्या या पत्रात अंत्यसंस्कारांच्या वाढत्या आर्थिक आणि पर्यावरणीय खर्चावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी केवळ नैसर्गिक कफन वापरण्याची शिफारस केली आणि पर्यावरणास पूरक नसलेले कपडे वापरणे टाळण्याचे आवाहन केले. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, ख्रिश्चन कुटुंबांनी ‘टाळता येण्यासारखा भपका’ सोडून साधेपणा स्वीकारणे काळाची गरज आहे. तसेच, मृतदेहाचे सार्वजनिक प्रदर्शन करण्याऐवजी त्याच्या आध्यात्मिक वारशावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘अंतिम आदर व्यक्त करणे’ हा शब्दप्रयोग वापरण्याची महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आली.

व्यावहारिक आव्हानांवर चर्चची भूमिका

या पत्राने समुदायात अंत्यसंस्कारांच्या विधींविषयी एक मोठी चर्चा घडवून आणली. यावर प्रतिक्रिया देताना अंत्यसंस्काराची सेवा पुरवणाऱ्या ‘लोनिका अंडरटेकर्स’चे सुनील कोलासो यांनी स्पष्ट केले की, शवपेटी बनवणारे कंत्राटदार हे केवळ महागड्या अंत्यसंस्कारांचे प्रवर्तक नाहीत, तर ते कुटुंबांना हरित दफन आणि साध्या विधींचे पर्यायही उपलब्ध करून देतात. मात्र, मुंबईतील भौगोलिक परिस्थितीनुसार एक व्यावहारिक मुद्दाही समोर आला आहे. येथील पावसाळ्यात कफन दफन करणे नेहमीच सोपे नसते, कारण पावसामुळे कबरींमध्ये पाणी साचते. अशा परिस्थितीत शवपेटीशिवाय केवळ कफनात मृतदेह दफन करणे कठीण होऊन बसते. चर्च प्रशासनाने यावर भाष्य करताना बॉम्बे आर्चडायोसीसचे प्रवक्ते फादर नायजेल बॅरेट यांनी सांगितले की, प्रशासन कफन दफन पद्धतीला प्रोत्साहन देते, परंतु मृत व्यक्तीच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेचाही आदर राखला जातो. दफनभूमींमधील मर्यादित जागेची समस्या लक्षात घेऊन काही चर्चमध्ये आता कफन दफन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

धार्मिक दृष्टीकोन आणि ऐतिहासिक संदर्भ

ख्रिश्चन धर्माच्या विविध पंथांमध्ये अंत्यसंस्काराच्या पद्धतींवरून वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. कॅथलिक परंपरेत दहन करण्यास संमती असली, तरी दफन हीच पुनरुत्थानाचे प्रतीक म्हणून सर्वोत्तम पद्धत मानली जाते. चर्चच्या नियमांनुसार दहनास परवानगी असली, तरी दहनानंतरची रक्षा पाण्यात किंवा हवेत विसर्जित न करता, ती कलशामध्ये बंद करून दफन करणे आवश्यक आहे. याउलट, ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन आजही शरीराचे दहन करणे हे निसर्गाच्या तत्त्वांच्या विरोधात मानतात. प्रोटेक्टंट पंथाचे ख्रिश्चन मात्र या विषयाकडे अधिक व्यावहारिक दृष्टीने पाहतात आणि साधेपणा लक्षात घेऊन दहनाचा पर्याय स्वीकारतात. बायबलचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, आरंभीच्या ख्रिश्चनांचे आणि स्वतः येशू ख्रिस्ताचे अंत्यसंस्कार अत्यंत साधेपणाने आणि तत्कालीन परंपरेनुसार पार पडले होते.

धर्म आणि पर्यावरण

भारतीय संस्कृती ही केवळ मानवकेंद्री नसून ती निसर्गाची पुरस्कर्ती आहे. येथे झाडे, नद्या, माती आणि संपूर्ण पर्यावरणाला पवित्र मानले गेले आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये, विशेषतः महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि ईशान्य भारतात ख्रिश्चन धर्मात गेलेल्या समाजाने आपल्या या मूळ संस्कृतीशी नाते तोडलेले नाही. गोव्यात मृत पूर्वजांच्या स्मरणार्थ पारंपारिक जेवण देण्याची प्रथा आहे. यामध्ये गरिबांना बोलावून केळीच्या किंवा फणसाच्या पानांवर जेवण वाढले जाते. जेवण शिजवताना मातीच्या कौलाचा तुकडा वापरण्याची प्रथा आहे, जी मानवी शरीराच्या मातीशी असलेल्या अंतिम नात्याची आठवण करून देते. ईशान्येकडील राज्यांमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या जमाती आजही आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर आणि गावाच्या सामायिक जागेतच पारंपारिक आदिवासी पद्धतीने दफन करण्यास प्राधान्य देतात. अनेक ख्रिश्चन कुटुंबांमध्ये अंत्यसंस्कारावेळी पांढरा पोशाख परिधान करणे, मृतदेहावर फुलांचे हार घालणे, स्मृतिदिनी किंवा विशिष्ट दिवसांनंतर सामूहिक भोजनाचे आयोजन करणे या प्रथा स्थानिक भारतीय सांस्कृतिक सातत्याचे जिवंत पुरावे आहेत.

महानगरांतील वास्तव आणि दहनाचा स्वीकार: सकारात्मक राष्ट्रवादाचे उदाहरण

भारतात बऱ्याच काळापासून ख्रिश्चन समाजात दहनाला तीव्र धार्मिक विरोध होता, कारण दहन ही प्रामुख्याने हिंदू धार्मिक प्रथा मानली जात होती. मात्र, अलीकडच्या काळात भारतातील महानगरांमध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही समुदायांमध्ये दहनाची स्वीकारार्हता वेगाने वाढत आहे. मोठ्या लाकडी शवपेट्या आणि रासायनिक जतन प्रक्रिया पर्यावरणाचे नुकसान करतात. या प्रक्रियेत वापरली जाणारी रसायने जमिनीच्या आणि भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतात. मात्र आता ख्रिश्चन समाजात साधेपणा आणि निसर्गपूरक अंत्यसंस्कारांची चर्चा सुरू झाली आहे.

हा बदल एका अत्यंत ‘सकारात्मक राष्ट्रवादाचे’ आणि ‘वैश्विकवादाचे’ उत्तम उदाहरण आहे. राष्ट्रवाद म्हणजे केवळ सीमांचे रक्षण नव्हे, तर देशातील भूमी, जल आणि वायू या संसाधनोंचा सुजाण वापर करणे आणि राष्ट्रीय संकटाच्या वेळी संकुचित धार्मिक भिंती बाजूला ठेवून एकत्र येणे होय. ख्रिश्चन समाजाने देशातील जमिनीची टंचाई आणि पर्यावरणीय संकट ओळखून आपल्या जुन्या परंपरांमध्ये केलेला हा बदल दर्शवतो की, ते भारताच्या राष्ट्रीय हिताशी आणि भूमीशी समरस झाले आहेत. हा बदल वैश्विक विचाराला बळ देणारा आहे.

भविष्यातील आव्हाने

भविष्यात नागरीकरण आणि लोकसंख्या वाढीमुळे दफनभूमींसाठी नवीन जमिनी मिळवणे कठीण होणार आहे. त्यामुळे, मुंबईतील कॅथलिक समाजात सुरू झालेली ही चर्चा केवळ अंत्यसंस्काराच्या पद्धतीपुरती मर्यादित राहिलेली नाही. जेव्हा एखादा समाज आपल्या धार्मिक पद्धतींना मातृभूमीच्या शाश्वत मूल्यांशी आणि पर्यावरणीय गरजांशी सुसंगत बनवतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीत योगदान देत असतो.


ख्रिश्चन समाजाने स्वतःहून साधेपणाकडे, कफन दफन पद्धतीकडे आणि दहनाच्या स्वीकारार्हतेकडे टाकलेली पावले हे दाखवून देतात की, भारतातील सांस्कृतिक एकात्मतेचा प्रवाह किती बलवान आहे. हा बदल धार्मिक कट्टरतेकडून व्यावहारिक वैश्विकतेकडे आणि निसर्गस्नेही राष्ट्रवादाकडे जाणाऱ्या एका प्रगतीशील प्रवासाची नांदी आहे.

– मैत्रेयी गोडसे

अन्य लेख

संबंधित लेख