प्रस्तावना
९ ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘जागतिक आदिवासी दिन’ (जागतिक जनजातीय दिन) म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिनाच्या निमित्ताने भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पटावर जनजातीय समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक ओळखीचा पुनर्विचार करणे आणि पसरवल्या जाणाऱ्या एका भ्रामक नरेटिव्हचा छेद घेणे अत्यंत आवश्यक ठरते. भारत ही हिंदू परंपरांनी आणि विविधतेने नटलेली एक प्राचीन भूमी आहे. या भूमीच्या मातीत, अरण्यात, पर्वतांत आणि दऱ्याखोऱ्यांत शतकानुशतके निवास करणारा जनजातीय (वनवासी) समाज हा केवळ या देशाचा निसर्गपुत्र नसून, भारतीय संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माचा सर्वात मजबूत पाया आहे.
परंतु, अलीकडच्या काळात काही वसाहतवादी विचारांच्या आणि विघटनकारी शक्तींकडून जनजातीय बांधवांच्या धार्मिक ओळखीबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जनजातीय बांधवांनी ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारलेला नाही, ते मुळात ‘हिंदू’ नाहीतच, असा एक अपप्रचार पसरवला जात आहे. मात्र, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वैधानिक तथ्यांची पडताळणी केली असता हा अपप्रचार पूर्णपणे फोल आणि वस्तुस्थितीचा अपभ्रंश करणारा ठरतो.
धार्मिक श्रद्धा आणि कुलदैवतांचे अधिष्ठान
हिंदू जीवनपद्धती ही केवळ पुस्तकात किंवा ग्रंथांमध्ये मर्यादित नसून, ती या देशातील निसर्गरूप जीवनशैलीतून साकार झाली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील भिल्ल, गोंड, वारली, ठाकूर, कातकरी, कोरकू, कोलाम, धनगर, गोवारी आणि वंजारी यांसारख्या विविध जनजातींच्या दैनंदिन जगण्याचा व धार्मिक श्रद्धांचा अभ्यास केला, तर त्यांच्यात हिंदू संस्कृतीचेच अधिष्ठान स्पष्टपणे दिसून येते.
जनजातीय समाजात निसर्गाच्या पूजनासोबतच शैव, शाक्त आणि वैष्णव संप्रदायातील दैवतांची अगाध श्रद्धेने पूजा केली जाते. शंभू महादेव (भोळा बाबा), काली माता, देवी दंतेश्वरी, एकवीरा देवी आणि तुळजाभवानी ही जनजातींची कुलदैवते आहेत. प्रत्येक पाड्याच्या वेशीवर मारुती (हनुमान), खंडोबा, भैरव आणि बिरोबा यांची स्थापना आढळते. गोवारी आणि धनगर समाजातील श्रीकृष्णाची पूजा, खंडोबाचा गोंधळ-जागर आणि वाघोबा, नागदेवता तसेच अन्नपूर्णेचे रूप मानल्या जाणाऱ्या कंसारी मातेचे पूजन हे हिंदू परंपरेतील निसर्गपूजेशी पूर्णपणे सुसंगत आहे.
सण, उत्सव आणि संस्कारांची परंपरा
सण आणि उत्सवांचा विचार केला तर जनजातींचे मुख्य सण हे हिंदू पंचांग आणि कृषी संस्कृतीशी घट्ट जोडलेले आहेत. अग्नीची पूजा करणारा होळी हा जनजातींचा सर्वात मोठा उत्सव आहे. याशिवाय दसऱ्याला शस्त्रांची पूजा करणे व आपट्याची पाने सोने म्हणून वाटणे, दिवाळीत दाराला आंब्याचे तोरण बांधणे, नागपंचमीला सर्पपूजन करणे आणि पोल्याला गाई-बैलांची पूजा करणे या सर्व पद्धती हिंदू धर्मसंस्कृतीचेच दर्शन घडवतात. गुढीपाडवा, नवरात्र, वटपौर्णिमा आणि महाशिवरात्री यांसारखे सणही सर्व पाड्यांवर उत्साहाने साजरे केले जातात.
विवाह विधींमध्ये अग्नी आणि निसर्गाला साक्षी मानून फेरे घेणे, हळद लावणे, तांदळाच्या अक्षता वापरणे आणि अंत्यसंस्कारानंतर दहावा-बारावा पाळून पूर्वजांचे श्राद्ध वा पितृतर्पण करणे या सर्व गोष्टी हिंदू परंपरेतील षोडश संस्कारांचेच जिवंत प्रतिबिंब आहेत.
महाकाव्यांचे संस्कार आणि लोकसाहित्यातील नाते
रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचे संस्कार जनजातीय जीवनात आणि लोकसाहित्यात अत्यंत खोलवर रुजलेले आहेत. प्रभू श्रीरामांच्या १४ वर्षांच्या वनवासाच्या काळात जनजातीय समाज हाच त्यांचा मुख्य आधार होता. शृंगवेरपूरचा निषादराज गुह, भक्तीने बोरे भरवणारी माता शबरी, आणि धर्मायुद्धात साथ देणारे सुग्रीव व हनुमान हे वनवासी संस्कृतीचेच प्रतीक होते. महाभारतात निषाद, शबर आणि किरातांचा उल्लेख आदराने आला आहे.
कोलाम आणि कोरकू जमातींमध्ये ‘भीम’ या पात्राला देवाचे स्थान दिलेले असून कोरकू समाजात शिवरूप मानल्या जाणाऱ्या ‘मेघनाथ स्तंभाची’ पूजा केली जाते. जनजातींच्या मौखिक साहित्यात, जात्यावरील ओव्यांमध्ये आणि लोकगीतांमध्ये सीतामाईचा वनवास, कर्णाची कथा आणि पांडवांचा अरण्यवास आजही अत्यंत आत्मीयतेने गायला जातो.
घटनात्मक व कायदेशीर वास्तव
घटनात्मक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता, भारतीय संविधानात किंवा कोणत्याही कायद्यात जनजातीय हे ‘गैर-हिंदू’ आहेत असा कोणताही उल्लेख नाही. न्यायालयांचे विविध निर्णय आणि कायदे जनजातीय समुदायातील विवाह आणि कौटुंबिक बाबींवर त्यांच्या पारंपरिक रूढी-परंपरांना संरक्षण देतात.
हे कायदेशीर संरक्षण त्यांना ‘हिंदू धारेबाहेर’ काढण्यासाठी नसून त्यांच्या वैविध्यपूर्ण स्थानिक परंपरांचे जतन करण्यासाठी आहे. समान नागरिक संहितेतून दिलेली सूट ही त्यांच्या सांस्कृतिक स्वायत्ततेचा आदर आहे, धर्मभिन्नतेचा पुरावा नव्हे. हिंदू धर्म हा एकाच साच्यात बांधलेला धर्म नसून, तो अनेक उपासना पद्धतींचा विशाल संगम आहे. त्यामुळे जनजातींच्या रूढी-परंपरा या हिंदू धर्माच्या विविधतेतील एकतेचेच बळकटीकरण करतात.
निष्कर्ष
थोडक्यात सांगायचे तर, ज्यांचे उपास्य देव शिव, शक्ती, श्रीकृष्ण, हनुमान आणि खंडोबा आहेत; ज्यांचे सण होळी, दसरा, दिवाळी आणि पोळ्यासारखे कृषी-संस्कृतीशी जोडलेले आहेत; ज्यांच्या जीवनविधींमध्ये अग्नीसाक्ष विवाह व पितृतर्पण समाविष्ट आहे; आणि ज्यांच्या हृदयात श्रीराम, सीतामाई व पांडव जिवंत आहेत, त्या निसर्गपुत्र जनजातींना हिंदू संस्कृतीपासून वेगळे करताच येऊ शकत नाही. ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जनजातीय समाज हा केवळ हिंदूच नाही, तर तो या हिंदू संस्कृतीच्या वृक्षाची सुंदर शाखा, रक्षक आणि अखंड वाहणारा जिवंत स्रोत आहे.