Tuesday, September 22, 2026

गणपती तुझे नाव चांगले – धूम्रवर्ण

Share

प्रस्तावना

यंदाच्या वर्षी येणाऱ्या या अनोख्या १२ दिवसीय गणेशोत्सवानिमित्तर १२ दिवस रोज एकेक नाव आणि त्यामागील रोचक कथा आपण  ‘गणपती तुझे नाव चांगले’ या नाम मालेत पाहणार आहोत. आज गणरायाच्या वेगळ्या अशा ‘धूम्रवर्ण’ या रूपाचे आणि नामाचे चिंतन करूया.

अग्नीच्या ज्वाळा जेव्हा शांत होतात आणि पेटलेले लाकूड जळून कोळसा होते, तेव्हा आकाशात पसरणारा तो राखाडी धूर. धूर ही अग्नीच्या अस्तित्वाची अखेरची साक्ष असते आणि विनाशाची उरलेली निशाणी असते. याच धुराचा धूसर, गूढ रंग आपल्या अंगावर लपेटून जेव्हा विघ्नहर्ता गणपती प्रकट झाला, तेव्हा त्या रूपाला नाव मिळाले—‘धूम्रवर्ण’.

धूम्रवर्णचा शा‍ब्दिक अर्थ

संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने पाहता, ‘धूम्र’ म्हणजे धूर किंवा राखाडी-धूसर रंग आणि ‘वर्ण’ म्हणजे रंग अथवा कांती. ज्याचे तेज भडक सोन्यासारखे पिवळे नाही, किंवा चंद्रासारखे शीतल पांढरे नाही, तर जळणाऱ्या अहंकाराच्या धुरासारखे करडे आणि संहारक आहे, तो देव म्हणजे ‘धूम्रवर्ण’. मुद्गल पुराणात गणेशाच्या ज्या अष्ट अवतारांचे वर्णन आले आहे, त्यातील हा आठवा आणि अत्यंत गूढ असा अवतार मानला जातो. पुराणात या रूपाचे मर्म सांगणारा एक अत्यंत सुंदर श्लोक आढळतो:

धूम्रवर्णावतारश्चाभिमानासुरनाशकः ।

आखुवाहन एवासौ शिवात्मा तु स उच्यते ॥

या श्लोकाचा मूळ रोख एका अत्यंत नाट्यमय आणि डोळ्यांत अंजन घालणाऱ्या पौराणिक कथेकडे आहे.

सृष्टीच्या सुरुवातीला ब्रह्मदेवाने सूर्यदेवाला विश्वातील सर्व कर्मांचे नियमन करणारे ‘कर्माध्यक्ष’ हे अत्यंत प्रतिष्ठेचे पद बहाल केले. संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारा, ऋतूंचे चक्र चालवणारा आणि जिवांना जीवन देणारा सूर्यदेव या पदावर आरूढ झाला. परंतु, अधिकार आणि सामर्थ्य जिथे येते, तिथे गर्वाची सावली नकळत मागे लागतेच. प्रत्यक्ष तेजोनिधी सूर्यालाही स्वतःच्या कर्तृत्वाचा सूक्ष्म अभिमान झाला. “माझ्याशिवाय हे विश्व चालूच शकत नाही, मीच याचा खरा चालक आहे,” ही अहंकाराची ठिणगी त्याच्या मनात पडली.

त्याच अहंकारी आणि उन्मत्त क्षणी सूर्याला एक शिंक आली. त्या शिंकेच्या वाऱ्यातून एका अत्यंत विक्राळ आणि काळ्याकुट्ट छायेचा जन्म झाला. तो सामान्य असुर नव्हता; प्रत्यक्ष सूर्याच्या अहंकाराचे ते जिवंत रूप होते, म्हणून त्याचे नाव ठेवले गेले—‘अहंतासुर’ किंवा ‘अभिमानासुर’.

अभिमानासुराने दैत्यगुरू शुक्राचार्यांचे शिष्यत्व पत्करले, कठोर तपश्चर्या केली आणि अपार वरदाने मिळवली. ज्याच्या मुळातच ‘मी’पणाचा अहंकार होता, तो वरदान मिळाल्यावर अधिकच बेभान झाला. त्याने तिन्ही लोकांवर आक्रमण केले, स्वर्गातील इंद्रपद बळकावले आणि पृथ्वीवरील धर्म, यज्ञ व सत्कर्मे नष्ट केली. प्रत्यक्ष सूर्यदेवालाही त्याने पराभूत केले, कारण पित्यापेक्षा मुलाचा अहंकार अधिक मातब्बर ठरला होता. विश्वात सर्वत्र अधर्माचे साम्राज्य पसरले आणि देव हतबल होऊन अरण्यात लपून बसले.

शेवटी सर्व देवांनी आणि पराभूत सूर्याने गणरायाचा धावा केला. तेव्हा विश्वातील उन्मत्त अहंकाराचा निचरा करण्यासाठी गणपतीने एक अत्यंत विलक्षण रूप धारण केले. त्यांचा वर्ण भडक नव्हता, तर अग्नीतून उठणाऱ्या धुरासारखा काजळलेला राखाडी होता. हातात तीक्ष्ण परशू आणि डोळ्यांत संयमी संहाराची प्रखरता घेऊन ‘धूम्रवर्ण’ अवताराने रणांगणात प्रवेश केला. काही ग्रंथांत त्यांचे वाहन आखू (मूषक) सांगितले आहे, तर काही लोककथांत ते काजळलेल्या निळ्या अश्वावर आरूढ झालेले दिसतात.

अहंतासुराला वाटले होते की तो या धूसर वर्णाच्या रूपाला क्षणात नष्ट करेल. परंतु, धूम्रवर्णाने आपल्या दिव्य अस्त्र आणि विवेकबुद्धीच्या बळावर अहंतासुराच्या शक्तीचे तुकडे केले. गर्वाचे साम्राज्य कितीही मोठे असले, तरी सत्याच्या एका झटक्यापुढे ते टिकू शकत नाही. अखेर आपला पराभव निश्चित पाहून अहंतासुर नतमस्तक झाला आणि त्याने गणेशाच्या चरणी शरणागती पत्करली. धूम्रवर्णाने त्याचा अहंकार नष्ट करून त्याला आपल्या अधिपत्याखाली घेतले आणि विश्वाला गर्वाच्या विळख्यातून मुक्त केले.

धूम्रवर्ण रूपाचा तात्विक अर्थ

सूर्य हा साक्षात ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. जर ज्ञानाच्या आणि प्रकाशाच्या देवतेला स्वतःच्या चांगुलपणाचा आणि पदाचा गर्व होऊ शकतो, तर सामान्य मानवाची कथा काय? माणसाला जेव्हा जेव्हा आपल्या कर्तृत्वाचा, संपत्तीचा, सौंदर्याचा किंवा ज्ञानाचा अहंकार होतो, तेव्हा त्याच्या नकळत त्याच्या आत एक ‘अहंतासुर’ जन्म घेत असतो. हा अभिमान आधी माणसाची स्वतःची विवेकबुद्धी खाऊन टाकतो आणि नंतर त्याच्या भोवतालच्या जगाला वेठीस धरतो.

हा अहंभाव जेव्हा ज्ञानाच्या अग्नीमध्ये जळते तेव्हा मागे आपल्यापाशी उरलेली शिकवण म्हणजे ‘धूम्रवर्ण’.

धूम्रवर्णाय नमः|

धूम्रवर्णाचा वैराग्याचा रंग आहे. तो काळाही नाही आणि पांढराही नाही; तो जीवनातील सर्व द्वंद्वे जळून गेल्यावर उरलेली शांतता आहे.

धूम्रवर्ण हे केवळ देवाचे नाव नसून, माणसाच्या अंतर्मनातील अहंकाराला जाळून टाकणारी एक आंतरिक चेतना आहे. जोपर्यंत आपण आपल्या आतल्या अभिमानासुराला मारत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनातील संघर्षाचा धूर शमणार नाही, हाच संदेश धूम्रवर्ण या नावात सामावलेला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख