Monday, September 28, 2026

ज्ञानमय होवो, नवे पर्व आता!

Share

मुंबईचा सांस्कृतिक इतिहास मोठा आहे. तो वैभवशाली आहे. या इतिहासाचा मुकुटमणी म्हणजे ‘दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’. फोर्ट परिसरातील दिमाखदार पायऱ्यांची ती भव्य वास्तू. ती पाहिली की मन थक्क होते. या वास्तूने अनेक शतकांचा मोठा इतिहास पाहिला आहे. प्रगल्भ लोकशाहीत निवडणुका महत्त्वाच्या असतात. त्या केवळ सत्ताबदलाचे साधन नसतात. त्या परिवर्तनाची नवी पहाट आणतात. एशियाटिक सोसायटीच्या ताज्या निवडणुकीचा निकालही याचीच ग्वाही देतो. शनिवारी या संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या पाच सदस्यांची निवडणूक पार पडली. २०२६-२९ या काळासाठी ही निवडणूक होती. यात ‘एशियाटिक टुमारो’ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. त्यांचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले. या प्रक्रियेत २५७ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक २१७ मते मिळवून डॉ. माधवी नरसाळे विजयी झाल्या. त्याखालोखाल सारंग दर्शने (२०६ मते), डॉ. नील हेळेकर (२०१ मते), विकास परांजपे (१९९ मते) आणि अरविंद सिंग (१९४ मते) यांनी विजय नोंदवला. हा केवळ काही व्यक्तींचा विजय नाही. संस्थेला एका नव्या युगात नेण्यासाठी सभासदांनी दाखवलेला तो ठाम विश्वास आहे. नव्याने निवडून आलेल्या सर्व कार्यकारिणीचे मनःपूर्वक स्वागत.

ज्ञानाचा अथांग खजिना

एशियाटिक सोसायटी ही केवळ दक्षिण मुंबईतील देखणी इमारत नाही. ती ज्ञानाची आणि मानव्यविद्यांची ज्ञानपोई आहे. सन १८०४ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. तिने दोन शतकांहून अधिक काळ ज्ञानाचा दिवा तेवत ठेवला. संस्थेत हजारो दुर्मिळ ग्रंथ आहेत. शेकडो वर्षांपूर्वीची हस्तलिखिते जपून ठेवली आहेत. जुनी नाणी आणि ऐतिहासिक नकाशे इथे पाहायला मिळतात. चौदाव्या शतकातील दांतेच्या ‘डिव्हाईन कॉमेडी’ची मूळ प्रत इथेच आहे. ही प्रत जगात दुर्मिळ मानली जाते. नालासोपारा येथे उत्खननात सापडलेले भगवान बुद्धांचे अवशेष इथे सुरक्षित आहेत. संस्कृत, पर्शियन आणि प्राकृत भाषेतील अनेक जुने ग्रंथ इथे आहेत. हा वारसा खरोखरच थक्क करणारा आहे. तो जपण्याचे मोठे शिवधनुष्य नव्या निर्वाचित मंडळींना समर्थपणे पेलावे लागेल.

संशोधन हाच खरा आत्मा

काळाच्या ओघात कोणत्याही जुन्या संस्थेला मरगळ येते. ती स्वाभाविक असते. या मरगळीतून बाहेर पडणे आवश्यक असते. एशियाटिक सोसायटीचा मूळ गाभा प्राच्यविद्या (Indology) आणि संस्कृत संशोधन इतकाच नाही. उलट, मानव्य विद्यांच्या परिघात येणाऱ्या सर्वच विषयांचे संशोधन आणि त्यांचे लेखन तसेच प्रकाशन हाच या संस्थेचा खरा आत्मा आहे. इथे सखोल संशोधन झाले पाहिजे. भारतीय संस्कृती, भाषा, इतिहास, सामाजिक शास्त्रे आणि पुरातत्त्वशास्त्र यावर उत्तम दर्जाचे काम व्हायला हवे. त्यासाठी संस्थेने आता नवनवीन उपक्रम हाती घ्यायचे ठरविले आहे. हे काम वेगाने व्हावे. व्याख्याने, परिसंवाद आणि कार्यशाळा यांचे नियमित आयोजन इथे होत राहावे. तरुण संशोधक आणि अभ्यासक इथे आले पाहिजेत. लोकांची अखंड ये-जा सुरू राहिली पाहिजे. तरच या वास्तूचा आत्मा स्फुरणशील राहील. संस्था हे पुस्तके साठवण्याचे गोडाऊन नाही. ते विचार देणारे ऊर्जाकेंद्र आहे. नवनवीन विचारांची पालवी इथे फुटायला हवी. सर्व प्रकारच्या विचारांचे स्वागतही हवे.

डिजिटल विस्तार आणि आधुनिकता

आजचे युग डिजिटल आहे. या युगात एशियाटिक सोसायटीने अधिक मोठे व्हायला हवे. मोठे होणे म्हणजे केवळ सभासद वाढवणे नव्हे. तर या खजिन्याचा विस्तार जागतिक पातळीवर करणे होय. हा अमूल्य ठेवा केवळ मुंबईपुरता मर्यादित राहू नये. जगभरातील अभ्यासकांना तो सहज उपलब्ध व्हावा. त्यासाठी दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन वेगाने व्हायला हवे. ते शास्त्रोक्त पद्धतीने पुढे जावे. जगाच्या पाठीवर कुठूनही एका क्लिकवर एशियाटिकमधले ज्ञानभांडार खुले व्हायला हवे. भौतिक वास्तूचा वारसा तर आपण जपावाच. सोबत त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. जुने आणि नवे यांचा योग्य मेळ घालावा.

‘वंदे मातरम्’चा अपमान आणि चायवाल्याची चपराक

एशियाटिक सोसायटी हे एक प्रगल्भ बौद्धिक ऊर्जाकेंद्र आहे. पण नुकत्याच झालेल्या २२२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) एक क्लेशदायक प्रकार घडला. सभेची सुरुवात संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रगीत ‘जन गण मन’ने झाली. सभेचा समारोप ‘वंदे मातरम्’ने करण्यात आला. मात्र, ‘वंदे मातरम्’ची दोन कडवी झाल्यानंतर संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि माजी काँग्रेस खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर सभेतून बाहेर पडले. “हा सरकारी कार्यक्रम नव्हता, त्यामुळे सक्ती नव्हती,” असा युक्तिवाद त्यांनी केला. यावर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी कडक शब्दांत टीका केली. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ‘वंदे मातरम्’चा मान राखतात, पण डॉ. मुणगेकर हा मान राखू शकत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या दुर्दैवी घटनेत राजकारण करणाऱ्यांना खरा धडा शिकवला तो वास्तूबाहेरील एका साध्या चहाविक्रेत्याने. सभेतून बाहेर पडल्यावर मुणगेकर चहा पिण्यासाठी गेले. तेव्हा त्या ‘चायवाल्या’ने राष्ट्रगानाचे गायन पूर्ण होईपर्यंत त्यांना चहा देण्यास स्पष्ट नकार दिला. एका बाजूला अज्ञानातून आलेला अहंकार दिसला. दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकाची धगधगती देशभक्ती दिसली. हा विरोधाभास डोळ्यांत भरणारा होता. ज्ञानाच्या या पवित्र मंदिरात असे प्रकार पुन्हा घडू नयेत. याची काळजी नव्या प्रशासनाला घ्यावी लागेल.

अमित शहा यांची भेट

मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एशियाटिक सोसायटीला भेट दिली होती. त्यांनी इथल्या दुर्मिळ ग्रंथांची पाहणी केली. जुन्या हस्तलिखितांची माहिती घेतली. संस्थेच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे त्यांनी मोकळेपणाने कौतुक केले होते. या भेटीमुळे संस्थेच्या राष्ट्रीय महत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. अशा वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्यामुळे वास्तूच्या संवर्धनासाठी मोठे बळ मिळेल, यात शंका नाही. केंद्राकडून निधी मिळवणे सोपे होईल. नव्या कार्यकारिणीने या अनुकूल वातावरणाचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा.

मुक्त संवादाचे बेट

संस्थेचा कारभार आता नव्याने सुरू होत आहे. तो अधिक पारदर्शक, गतिमान आणि सर्वसमावेशक होईल. संस्थेतील गटबाजी आणि राजकारण आता कायमचे संपायला हवे. निवडणुकांचा धुरळा खाली बसला आहे. आता प्रत्यक्ष कामाला लागण्याची वेळ आली आहे. एका प्रगल्भ संस्थेचे सर्वांत मोठे लक्षण कोणते? तर तिथे वाहणारे मोकळे वैचारिक वारे. आजच्या काळात एशियाटिक सोसायटी हे मुक्त संवादाचे बेट बनले पाहिजे. इथे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र यावेत. निकोप वादविवाद व्हावेत. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय इथे विचारांची मांडणी करता आली पाहिजे. हे मोकळे वारेच परंपरा अधिक समृद्ध करतील. एकेकाळी या संस्थेचा मोठा दबदबा होता. इथल्या संशोधनाची जगभर चर्चा होत असे. तो सुवर्णकाळ आता नव्या कारभारातून पुन्हा यायला हवा. मुंबईच्या या ऐतिहासिक वैभवाची कीर्ती पुन्हा एकदा जगभर दुमदुमावी. इथला ज्ञानरूपी प्रकाश दाही दिशांना पसरावा. ही संस्था जगातील एक प्रमुख आणि अग्रगण्य संशोधन केंद्र बनावी. नव्या कार्यकारिणीला या वाटचालीसाठी बळ मिळो. ज्ञानाचा हा वारसा असाच पुढे जात राहो.

अन्य लेख

संबंधित लेख