मुंबई पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सुरू केलेली धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद असली तरी भोईवाडा पोलिसांनी दादरमध्ये केलेल्या ताज्या कारवाईने एका अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वास्तवावर प्रकाश टाकला आहे. काही महिन्यांपूर्वीच कायदेशीर प्रक्रियेद्वारे मायदेशी परत पाठवलेले बांगलादेशी नागरिक पुन्हा तितक्याच सहजतेने भारतात घुसखोरी करून मुंबईत वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. ही घटना केवळ एका दाम्पत्याच्या अटकेपुरती मर्यादित नसून ती देशाच्या सीमा सुरक्षा यंत्रणेला, अंतर्गत सुरक्षेला पर्यायाने संपूर्ण कायदेशीर व्यवस्थेला दिलेले एक उघड आव्हान आहे.
मुंबई पोलिसांची कार्यतत्परता ..
मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरापासून बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात मुंबई पोलिसांनी २०२५ मध्ये १२०० पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांना शोधून काढत १,०५८ जणांना मायदेशी धाडले. सन २०२६मध्येही ही मोहीम तशीच सुरू असून २००पेक्षा अधिक घुसखोरांची आत्तापर्यंत धरपकड करण्यात आली आहे.
बांगलादेशींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असताना भोईवाडा पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाला काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या कक्षाचे पथक दादर पूर्व परिसरात गस्त घालत होते. यावेळी एक महिला आणि एक पुरुष संशयास्पदरित्या फिरताना आढळले. पोलिसांना पाहून दोघांनी त्यांना टाळण्याचा प्रयत्न केल्याने संशय अधिक बळावला. पोलिसांच्या पथकाने दोघांना अडवले आणि त्यांच्याकडे कारण विचारले असता, ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या नागरिकत्याबाबत विचारणा करून पुरावे मागितले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या दोघांनी लिटन मुल्ला आणि पपी बेगम अशी नावे सांगून बांगलादेशी नागरिक असल्याचे मान्य केले. त्यांच्याकडील ओळखपत्रे बांगलादेशातील असल्याचे पोलिसांनी म्हटले.
ही कामगिरी पोलिसांच्या सतर्कतेची पावती नक्कीच आहे पण या प्रकरणाचा सर्वात चिंताजनक भाग म्हणजे, या दोघांची जुलै २०२५ मध्येच कायदेशीर कारवाई करून बांगलादेशात Deportation करण्यात आले होते. अवघ्या काही महिन्यांतच हे दाम्पत्य पुन्हा भारतात आणि तेही थेट मुंबईच्या मध्यवर्ती भागात हजर झाले. हा प्रकार म्हणजे भारतीय कायद्याची आणि सुरक्षा यंत्रणांची उघड थट्टा आहे. घुसखोर भारतात येतात त्यांना पकडले जाते, करदात्यांच्या पैशाने त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सन्मानाने सीमेपार सोडले जाते आणि ते पुन्हा त्याच वाटेने भारतात परत येतात हा चक्रव्यूह कधी संपणार?
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि हे शहर नेहमीच आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या जिहादी समाजकंटकांच्या निशाण्यावर राहिले आहे. अशा अत्यंत संवेदनशील शहरामध्ये बेकायदेशीर नागरिक कोणत्याही तपासणीशिवाय, ओळख लपवून वर्षानुवर्षे राहत असतील, तर तो अंतर्गत सुरक्षेला लागलेला सर्वात मोठा सुरुंग आहे. भोईवाडा पोलिसांच्या ‘दहशतवादविरोधी कक्षाने’ही कारवाई केली आहे, यावरूनच या समस्येचे गांभीर्य स्पष्ट होते. हे घुसखोर केवळ आर्थिक कारणांसाठी आले आहेत की त्यांचा वापर देशविरोधी कृत्यांसाठी केला जात आहे, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. जर हे लोक बनावट कागदपत्रांच्या आधारे स्थानिक लोकसंख्येत मिसळून गेले, तर भविष्यात कोणत्याही मोठ्या गुन्ह्याचा किंवा घातपाताचा छडा लावणे पोलिसांसाठी अशक्य होऊन बसणार आहे.
घुसखोरांना केवळ सीमेपार हाकलून चालणार नाही तर त्यांच्या पायात कायद्याची अशी बेडी ठोकली पाहिजे की पुन्हा भारताच्या हद्दीत पाऊल ठेवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. जर आपण आताच कठोर पावले उचलली नाहीत तर ही बेकायदा लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येचा समतोल बिघडवून अंतर्गत यादवी अथवा सुरक्षेचे मोठे संकट आपल्यासमोर निर्माण होईल.या घुसखोरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता थेट कारवाई करण्याची वेळ आली आहे.
– हिमांशू शुक्ला