Friday, June 19, 2026

शिवसेना- विझून गेलेल्या अंगाराची कथा!

Share

शिवसेना आणि फूट हे समीकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन राहिलेले नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या चार महत्त्वाच्या नेत्यांनी शिवसेनेवर मोठे घाव घातले आहेत. पक्षाबाहेर पडलेल्या गणेश नाईक यांच्यासारख्या महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांचीही यादी छोटी नाही. पण ज्या दिवशी हा ऐतिहासिक पक्ष स्थापनेची साठ वर्षे पुरी करत आहे; त्याच दिवशी पुन्हा एकदा लोकसभेतील सहा खासदार फुटल्याची बातमी यावी आणि या पक्षाच्या डोक्यावर पुन्हा एकदा विधानसभेतील आमदारांपासून मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांपर्यंतच्या फुटीची टांगती तलवार असावी, यासारखा दैवदुर्विलास दुसरा नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा प्रचंड माहोल आणि पुण्याई, मराठी माणसाची न्यायप्रिय जिगर आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे झंझावाती नेतृत्व पाठीशी असताना, या पक्षाला संयुक्त महाराष्ट्राचे सोने करता आले असते. दक्षिणेतील काही राजकीय पक्षांनी राष्ट्रीय राजकीय प्रवाहाशी फटकून राहायची भूमिका घेतली असली तरी त्यांनी आपापल्या राज्यातल्या नागरिकांसाठी हिताच्या अनेक गोष्टी करण्यात कसूर सोडली नाही. तसे शिवसेनेने केले का, हा प्रश्न आज अनुचित ठरणार नाही. आज साठ वर्षांनंतर मागे वळून पाहताना एकच प्रश्न पडतो की ती मूळ शिवसेना नेमकी कुठे भरकटली? की ज्या अजेंड्यासाठी या ‘वाघा’चा जन्म झाला, तो अजेंडाच आता सत्तेच्या बाजारात गहाण पडला आहे?

साठोत्तरी समाजकारण आणि शिवसेनेचा जन्म

शिवसेनेच्या स्थापनेचे आणि विस्ताराचे मूळ महाराष्ट्राच्या साठोत्तरी (१९६० नंतरच्या) विशिष्ट सामाजिक-आर्थिक स्थितीत दडलेले आहे. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र झाला खरा, पण ज्या मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले, त्या मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही बिगर-मराठी भांडवलदारांच्याच हातात होत्या. द्वैभाषिक राज्याची रचना संपून मराठी भाषकांचे राज्य आले तरी मुंबईतील पांढरपेशा नोकऱ्यांमध्ये, दक्षिण भारतीय आणि इतर प्रांतांतील लोकांचा टक्का मोठा होता. त्याचवेळी, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून रोजगारासाठी मुंबईत येणाऱ्या मराठी तरुणांचा लढा सुरू झाला होता. सन १९६० च्या दशकात मुंबईत आणि आसपास मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले. त्याचप्रमाणे, मुंबईतील वित्तीय व इतर सरकारी संस्थांचा पसाराही खूप वाढला. परंतु या सगळ्या ठिकाणी स्थानिक मराठी तरुणाला डावलले जात असल्याची तीव्र भावना निर्माण झाली होती. तत्कालीन काँग्रेस सरकारने या भावनिक आणि आर्थिक असंतोषाकडे साफ दुर्लक्ष केले. नेमक्या याच साठोत्तरी सामाजिक पोकळीत आणि मराठी माणसाच्या अस्वस्थतेतून १९६६ मध्ये द्रष्टे कलावंत असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. हा केवळ एका राजकीय पक्षाचा उदय नव्हता, तर तो मुंबईतील स्थानिक मराठी माणसाच्या ‘अस्तित्वाचा आणि अस्मितेचा हुंकार’ होता.

पहिल्या पिढीची तपश्चर्या आणि कर्तृत्वाचा वारसा

आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील वैचारिक आणि संघटनात्मक पोकळी समजून घ्यायची असेल, तर पहिल्या पिढीतील नेत्यांनी केलेल्या कामाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणे अपरिहार्य ठरते. शिवसेना ही केवळ बाळासाहेबांच्या भाषणांवर वाढली किंवा मोठी झालेली नाही. शिवसेनेच्या विस्तारामागे तसेच वाढत्या प्रभावामागे दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणि सुधीर जोशी यांच्यासारख्या निष्ठावान आणि अभ्यासू सहकाऱ्यांच्या कष्टाची जोड होती. सुधीर जोशी यांनी ‘स्थानीय लोकाधिकार समिती’च्या माध्यमातून मराठी तरुणांच्या हाताला काम देण्याचे जे अवाढव्य कार्य केले, तो शिवसेनेचा सुवर्णकाळ होता. बँका, आयुर्विमा महामंडळ, एअर इंडिया यांसारख्या पांढरपेशा क्षेत्रांत मराठी टक्का सन्मानाने वाढविण्याचे काम शिवसेनेने केले. मनोहर जोशी यांनी पक्षाला संसदीय राजकारणाची शिस्त आणि सुसंस्कृतपणा दिला. सुधीर जोशी यांनी शिवसेनेचे पहिले महापौर होऊन मुंबई महापालिकेच्या कामात शिवसेनेचा दरारा निर्माण केला. त्यांना स्थानिक तसेच इतरही प्रश्नांची उत्तम जाण ठेवली. प्रमोद नवलकर यांनी आपल्या लेखणीतून आणि ‘भटकंती’ करून मुंबईच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि गुन्हेगारी जगतावर बोट ठेवत शिवसेनेला मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घरात पोहचवले. ही पहिली पिढी वैचारिकदृष्ट्या पक्की होती. अभ्यासू होती. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्यात शिवसैनिक आणि जनता यांच्याशी थेट नाळ जोडण्याची अफाट क्षमता होती. आज त्या तोडीचे, तितक्याच निष्ठेचे आणि अभ्यासू बकूब असणारे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे शिल्लक आहे का, हाच खरा प्रश्न आहे.

‘भूमिपुत्र’ ते ‘हिंदुत्व’ : विस्ताराचा आलेख

शिवसेनेच्या विस्ताराचे टप्पे पाहिले तर साठोत्तरी राजकारण आणि समाजकारणातील बदल स्पष्ट जाणवतात. सुरुवातीला मुंबईत दबदबा असणाऱ्या कम्युनिस्टांचा पाडाव करण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला हाताशी धरले. मुंबईतील डाव्यांच्या कामगार संघटना मोडीत काढण्यासाठी शिवसेनेचा उघड उघड वापर झाला. शिवसेना लढाऊ होतीच. शिवाय, तिच्याकडे म्हणता म्हणता कट्टर, महाराष्ट्रप्रेमी, निष्ठावान आणि अतिशय प्रामाणिक अशा हजारो शिवसैनिकांची फळी निर्माण झाली. हे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक अद्धुत असे घटित होते. पुढे या ताकदीचे प्रतिबिंब राजकारणात पडले आणि शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत बस्तान बसवले हळू हळू ठाणे, कल्याण या मुंबईनजीकच्या पट्ट्यात विस्तार केला. ठाण्यात तर मुंबईच्या आधी शिवसेनेचा महापौर झाला होता.

राजकीय पक्ष म्हणून शिवसेना वाढू लागली. विधिमंडळात पोहाचली. मात्र, केवळ ‘मराठी अस्मिते’च्या मुद्द्यावर मुंबईबाहेर, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात विस्तार होण्याला बऱ्याच मर्यादा होत्या. कारण ग्रामीण महाराष्ट्रातला लढा दक्षिण किंवा इतरही कुणा भारतीयांविरुद्ध नव्हताच. तिथे मराठा लॉबी आणि सहकारी संस्थांचे राजकारण मजबूत होते. यावर तोडगा म्हणून १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात शिवसेनेने आपल्या ‘भूमिपुत्र’ या संकल्पनेला ‘हिंदुत्वा’चा जबरदस्त तडका दिला. १९८७ ची विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक हा या प्रवासातील मैलाचा दगड ठरला. हिंदुत्वाच्या या कार्डामुळे शिवसेनेला ग्रामीण महाराष्ट्रातील ओबीसी आणि बहुजन समाजाला स्वतःकडे खेचता आले. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेने शिवसेनेला मुंबईच्या परिघाबाहेर काढून थेट सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत पोहचवले आणि यातूनच मग १९९५ मध्ये युतीचे सरकार सत्तेवर आले. महाराष्ट्रातला खऱ्या अर्थाने पहिला काँग्रेसेतर मुख्यमंत्री शिवसेनेने दिला आहे. सन १९७८ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाले खरे, पण ते काही काँग्रेसच्या परिवाराच्या बाहेरचे नव्हते.

गिरणी कामगारांचा संघर्ष : शिवसेनेची ऐतिहासिक गफलत

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वांत मोठे अपयश कोणते असेल, तर ते म्हणजे गिरणी कामगारांच्या जीवन-मरणाच्या संघर्षात शिवसेनेने घेतलेली सोयीची, संशयास्पद आणि बोटचेपी भूमिका. मुंबईचे हृदय असलेल्या गिरणगावात लाखो मराठी कामगार घाम गाळत होते. त्यांच्या श्रमांवर मुंबईचा रूबाब टिकून होता. दत्ता सामंत यांच्या  ऐतिहासिक आणि आजही अधिकृतपणे न संपलेल्या गिरणी संपानंतर जेव्हा हा कामगार अक्षरश: देशोधडीला लागला, तेव्हा शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू शकली नाही. शिवसेनेला आपली ताकद वापरून कामगार नेते आणि गिरणीमालक यांना तडजोडीच्या टेबलावर आणणे शक्य होते. हा सगळा मराठी माणूस दत्ता सामंत यांच्या पाठीशी असला तरी डाव्यांची ताकद संपल्यावर तो बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभा राहात होता. मात्र, सगळ्यांनी मिळून गिरणी कामगाराच्या पदरात फक्त निखारे टाकले. आजही ही शोकांतिका अनेक रूपांनी मुंबईवर आदळते आहे. गिरणी कामगारांचे पुनर्वसन आजही झालेले नाही. त्यात शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले. बीडीडी चाळींचा विकास झाला. मात्र, मुंबईतील गिरणी कामगारांना देशोधडीला लावण्यात ज्यांचे ज्यांचे पाप आहे; त्यात शिवसेनाही अग्रभागी आहे, हे विसरता येत नाही.

डाव्या कामगार संघटनांचा प्रभाव मोडीत काढण्याच्या नादात शिवसेनेने गिरणी कामगारांच्या मूळ प्रश्नांकडेच दुर्लक्ष केले. दत्ता सामंत यांच्या झंझावातासमोर शिवसेनेची ‘भारतीय कामगार सेना’ हतबल ठरली. पुढे जेव्हा गिरण्यांच्या जमिनींचे व्यवहार सुरू झाले, तेव्हा मराठी कामगाराला तिथे हक्काचे घर आणि रोजगार मिळवून देण्याऐवजी, गिरण्यांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याच्या प्रक्रियेलाच अप्रत्यक्ष खतपाणी घातले गेले. जो कामगार शिवसेनेचा मुख्य कणा होता, तोच गिरणी कामगार मुंबईतून हद्दपार झाला आणि शिवसेना मात्र केवळ मूकदर्शक बनून राहिली. हा मराठी माणसाचा विश्वासघात होता, ज्याची किंमत आज मुंबईतील मराठी टक्का घसरण्यात मोजावी लागत आहे.

समाजसेवक शिवसैनिक कुठे गेला?

एक काळ असा होता की, मुंबईतील सामान्य माणसासाठी ‘शिवसैनिक’ हाच शेवटचा आशेचा किरण होता. मध्यरात्री कुणाचे बाळ आजारी असो, रेशन दुकानावरील धान्य गायब असो की पाण्याचा प्रश्न असो शाखाप्रमुख आणि शिवसैनिक २४ तास उपलब्ध असायचा. ती शिवसेनेची खरी ताकद होती. शिवसेना ही नेत्यांमुळे मोठी झाली नाही, तर स्वतःचे रक्त आटवून पक्षासाठी धावणाऱ्या त्या अनाम शिवसैनिकाच्या त्यागावर उभी राहिली होती.

आज ते चित्र पार बदलले आहे. कॉर्पोरेट संस्कृती, गाड्यांचे ताफे आणि सत्तेच्या सुबत्तेत वावरणारे आजचे नेतृत्व जमिनीवरच्या कार्यकर्त्यापासून तुटलेले आहे. कार्यकर्त्याचे रूपांतर केवळ नेत्यांच्या रॅलीत गर्दी करणाऱ्या आणि सोशल मीडियावर ट्रोलिंग करणाऱ्या ‘फूटसोल्जर’मध्ये झाले आहे. २४ तास धावणारा तो प्रामाणिक समाजसेवक आज सत्तेच्या साठमारीत कुठे गायब झाला, याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे.

पाच फुटींचा इतिहास : विस्कटलेली घडी

शिवसेना आजवर पाचवेळा फुटली. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आता पुन्हा खासदारांचा नवा गट. प्रत्येक फुटीच्या वेळी ‘गद्दार’ आणि ‘खोके’ या शब्दांची फेकाफेक करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला. पण विचार करायला हवा की, एकाच पक्षात इतक्या मोठ्या प्रमाणावर वारंवार बंडखोरी का होते? याचे राजकीय मूल्यमापन केले तर स्पष्ट दिसते की, पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीचा अभाव आणि केवळ एकाच कुटुंबाभोवती फिरणारे राजकारण याला कारणीभूत आहे. बाळासाहेबांच्या काळातही आदेशशाही होती, पण तिथे कार्यकर्त्याला मायेची ऊब आणि नेतृत्वाचा दरारा असे दोन्ही जाणवायचे. आजच्या नेतृत्वात ना तो दरारा उरला आहे, ना ती मायेची पाखर. त्यामुळेच सत्तेची थोडीही हवा बदलली की, खासदार आणि आमदार आपले घर बदलण्यास उत्सुक असतात. उद्या मुंबई महापालिकेचे नगरसेवकही फुटले, तर नवल वाटायला नको.

सोन्याची पालिका आणि विकासाचा बट्ट्याबोळ

गेली अनेक दशके मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेची कामधेनू राहिली होती. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेची सत्ता हातात असूनही शिवसेनेने मुंबईला काय दिले? दर पावसाळ्यात तुंबणारी मुंबई, खड्ड्यांचे साम्राज्य, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आणि पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, हेच मुंबईकरांच्या नशिबी आले. महापालिकेच्या अफाट बजेटचा वापर जर मुंबईच्या पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यासाठी आणि मराठी माणसाला मुंबईत टिकवण्यासाठी केला असता, तर आज मुंबईचे चित्र वेगळे असते. पण महापालिका म्हणजे केवळ कंत्राटदार, टक्केवारी आणि नेत्यांची घरे भरणारे साधन बनली. मुंबईवरचा ताबा हाच शिवसेनेच्या अस्तित्वाचा आधार होता, पण तोही आता गेला आहे.

साठी बुद्धिनाशाची की आत्मपरीक्षणाची?

आज साठ वर्षे पूर्ण करताना मूळ शिवसेनेचा वाघ गलितगात्र झाला आहे. खासदार जाताहेत, आमदार डळमळीत आहेत आणि जनाधार घसरत चालला आहे. हा केवळ एका पक्षाचा पराभव नाही, तर मराठी माणसाच्या एकेकाळच्या स्वप्नाचाही हा चक्काचूर आहे. साठोत्तरी कालखंडातील धगधगत्या वास्तवातून जन्मलेल्या या पक्षाने सत्तेच्या सारीपाटावर स्वतःचे सर्वस्व गमावले आहे. शिवसेनेला जर या गर्तेतून बाहेर पडायचे असेल, तर पुन्हा एकदा मूळ अजेंड्याकडे वळावे लागेल. सहानुभूतीचे राजकारण फार काळ चालत नाही, कर्तृत्वाचे राजकारण करावे लागते. अन्यथा, साठी बुद्धी नाशाची ठरून हा पक्ष इतिहासाच्या पानांवर केवळ एक ‘काँग्रेस-भाजपमधील अंतर्गत तडजोडीचा खेळ’ म्हणून नोंदवला जाईल. वाघाचा केवळ मुखवटा लावून गुरगुरणे बंद करून, पुन्हा एकदा जमिनीवर उतरावे लागेल. अन्यथा, आमचीच शिवसेना खरी… असे म्हणत म्हणत केवळ इतिहासाच्या पानांमध्ये मिटून जावे लागेल.

अन्य लेख

संबंधित लेख