Monday, June 29, 2026

शिवगर्जना झाली नसती तर…?

Share

देवगिरीचा अस्त ते शिवसूर्याचा उदय

महाराष्ट्राचा इतिहास हा निव्वळ कोरड्या सनावळ्यांचा लेखाजोख नाही; तो तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत, गडकोटांच्या पाषाणांवर आणि मायभूमीच्या रक्ताळलेल्या छाताडावर कोरलेला एक धगधगता रणसंग्राम आहे! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि लष्करी भाग्याचा सूर्य ज्या दिवशी ढळला, तो घातवार होता इ.स. १२९४ चा. देवगिरीच्या दुर्गम तटावर यादवकुळभूषण राजे रामदेवराय (रामचंद्र देव) यांचा पराभव झाला आणि केवळ एका राजवंशाचा अस्त झाला नाही, तर अवघ्या दख्खन पठारावरील स्वतंत्र हिंदु सार्वभौमत्वाचा पायाच निखळून पडला. अल्लाउद्दीन खिलजीच्या क्रूर, वेगवान घोडदळाने देवगिरीचे वैभव धुळीस मिळवले आणि पावन भूमी राजकीय अराजकता, सांस्कृतिक दडपशाही आणि भाषिक गुलामीच्या काळोखात बुडून गेली.

यादव साम्राज्याचा हा पाडाव म्हणजे केवळ सत्तेचे हस्तांतरण नव्हते, तर तो मराठी अस्मितेवर झालेला मोठा आघात होता. ज्या पवित्र मातीत राजे रामदेवरायांच्या छत्रछायेखाली संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘ज्ञानेश्वरी’सारख्या अलौकिक ग्रंथाची रचना केली, जिथे मराठी भाषेने अमृताशी पैजा जिंकण्याचे भाग्य अनुभवले; तीच संतांची भूमी पुढील साडेतीनशे वर्षे परकीय आक्रमकांच्या घोड्यांच्या टापांखाली चिरडली गेली. आदिलशाही, निजामशाही आणि मोगलाईच्या क्रूर दडपशाहीने रयतेचे जगणे सुसह्य ठेवले नाही. आया-बहिणींची अब्रू आणि देव-देश-धर्माचे अस्तित्व पणाला लागले होते. देवगिरीच्या पतनापासून सुरू झालेला हा प्रवास म्हणजेच छत्रपति शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकापूर्वी सलग सुमारे ३५० वर्षांच्या प्रदीर्घ, वेदनामय पारतंत्र्याचा सर्वात गडद अध्याय होता.

पण सह्याद्रीचा पाषाण कधी पूर्णपणे हतबल होत नसतो! अशा या भीषण अंधकारात, जेव्हा चहूबाजूंनी निराशेचे सुळके वर आले होते, तेव्हा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून एक दैदिप्यमान निखारा पेटून उठला. तब्बल साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधारयुगाचा छातीचा कोट करून अंत करण्यासाठी राजे शिवछत्रपती प्रकटले. त्यांनी विखुरलेल्या, स्वाभिमान विसरलेल्या आणि लाचार झालेल्या रयतेला एकत्र केले. त्यांनी केवळ एका राज्याची सीमा आखली नाही, तर हतबल झालेल्या रयतेच्या मनात ‘स्वत्व’ आणि ‘राष्ट्रीय चेतनेची’ मशाल पेटवून ‘हिंदवी स्वराज्याचा’ अलौकिक आविष्कार घडवला.

दास्यत्वाचा इशारा

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतमाता स्वतंत्र झाली खरी, पण या स्वातंत्र्याच्या मंगल कलशाला फाळणीचे रक्तरंजित ग्रहण लागले आणि देशाच्या उरावर पाकिस्तान नावाचे कायमस्वरूपी संकट उभे राहिले. देवगिरीच्या पाडावापासून सुरू झालेल्या ६५० वर्षांच्या प्रदीर्घ सांस्कृतिक संघर्षाचा थेट संबंध भारताच्या आधुनिक फाळणीशी जोडताना, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अत्यंत मार्मिक विधान केले होते. पुण्याच्या ‘शिवसृष्टी’च्या पवित्र सोहळ्यात या विधानाचा पुनरुच्चार करताना श्री यशवंतराव चव्हाण यांनी म्हणले होते: “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची बॉर्डर शोधायला दूर जावे लागले नसते. पाकिस्तानची बॉर्डर तुमच्या आमच्या घरापर्यंत आली असती.”

जर आपल्या शिवबाने आदिलशाही आणि मोगल साम्राज्याचे प्रचंड लष्करी बलाढ्यत्व आपल्या छातीने आणि गनिमी काव्याने मोडून काढले नसते, तर संपूर्ण दख्खन आणि दक्षिण भारत पूर्णतः इस्लामी सत्तेच्या अमलाखाली गेला असता. या विस्तीर्ण भूभागातील मूळ संस्कृती, लोकसंख्या आणि येथील देवळे केवळ इतिहासजमा झाली असती. महाराजांच्या अफाट पराक्रमामुळेच दख्खनमधील सनातन सांस्कृतिक वारसा जिवंत राहिला. जर शिवरायांचे हे स्वराज्य उभे राहिले नसते, तर १९४७ च्या फाळणीच्या वेळी केवळ पंजाब किंवा बंगालची फाळणी झाली नसती, तर अवघा मध्य आणि दक्षिण भारत देखील मुस्लिम बहुसंख्याकतेच्या आधारावर पाकिस्तानच्या उरात विलीन झाला असता आणि पाकिस्तानची सीमा थेट महाराष्ट्रातील आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊन धडकली असती!

“शिवाजी महाराज नसते तर…?”

या कल्पित आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या इतिहासाचा विचार करताना, मध्ययुगीन कवी आणि आधुनिक इतिहासकारांच्या डोळ्यांतून जे वास्तव समोर येते, ते अंगावर काटा आणणारे आहे:

महाकवि भूषण यांची वीरवाणी

शिवछत्रपतींचे समकालीन, ब्रजभाषेचे राजे महाकवी भूषण यांनी औरंगजेबाच्या धार्मिक आक्रमकतेचे आणि क्रूरतेचे वर्णन करताना शिवरायांच्या अस्तित्वाचे महत्त्व एकाच छंदात अजरामर करून ठेवले आहे:

“कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई,
शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी॥”
“काशी कर्बला होती मथुरा मदीना होती,
शिवाजी न होतो तो सुन्नत होती सब की ॥”

औरंगजेबाने उत्तर भारतात काशी विश्वनाथ, मथुरा आणि प्रयाग येथील प्राचीन देवळे पाडून तिथे मशिदी उभारल्या, हिंदूंचे सक्तीने धर्मांतरण केले. कवी भूषण गर्जना करून सांगतात की, जर सह्याद्रीचा हा सिंह दिल्लीच्या तख्तावर चालून गेला नसता, तर संपूर्ण देशातील संस्कृतीचे समूळ उच्चाटन झाले असते. महाराजांनी या ज्वलंत काव्याचा सन्मान केला, कारण हे स्वराज्य निव्वळ मातीचा तुकडा मिळवण्यासाठी नव्हते, तर ते या देशाच्या आत्म्याचे, संस्कृतीचे आणि राष्ट्रीय अस्मितेचे रक्षण करणारे ईश्वरी अधिष्ठान होते!

आग्र्याहून सुटकेचा दैवी चमत्कार

प्रख्यात इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी स्पष्ट केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ होता. जर त्या दिवशी आग्राच्या अंधारकोठडीतून तो शिवसूर्य निसटला नसता, तर मोगलांचा एकछत्री अंमल संपूर्ण भारतावर कायम झाला असता. महाराजांच्या त्या एका धाडसी सुटकेमुळे औरंगजेबाची संपूर्ण दख्खन मोहीम सह्याद्रीच्या चिखलात रुतली आणि तिथूनच मोगल साम्राज्याच्या विघटनाचे मरणघंटे वाजायला सुरुवात झाली.

जीवन-मरण संघर्ष

थोर इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी शिवचरित्राचे मर्म सांगताना लिहिले आहे की, “शिवरायांचा आणि मराठ्यांचा इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या जीवन-मरणाचा संघर्ष होता”. महाराजांनी केवळ लढाया जिंकल्या नाहीत, तर जात-पात आणि सरंजामशाहीच्या दलदलीत अडकलेल्या अठरापगड जातींच्या समाजाला ‘मावळा’ हे एकच नाव देऊन एका राष्ट्रीय ध्येयासाठी एकत्र आणले आणि जगातील सर्वात कल्याणकारी, न्यायी राज्यपद्धती निर्माण केली.

आरमारी शून्यत्व आणि सागराचे क्रंदन

लषकरी रणनीतीचा विचार केला तर शिवाजी राजे यांनी ‘आरमार’ उभारून पोर्तुगीज, इंग्रज आणि जंजिऱ्याचा सिद्धी या सागरी लांडग्यांना कोकणच्या किनाऱ्यावरच रोखून धरले. ‘ज्यांचे आरमार त्याचा समुद्र’ हा मंत्र ओळखून जर शिवरायांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग यांसारखे जलदुर्ग सागराच्या छाताडावर उभे केले नसते, तर भारताचा पश्चिम किनारा ब्रिटिशांनी आणि पोर्तुगीजांनी दीडशे वर्षे आधीच गिळंकृत केला असता आणि स्वातंत्र्याचा सूर्य कधी उगवलाच नसता.

इतिहास पुसून टाकण्याचे प्रयत्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अमूल्य लिखित इतिहास आणि प्रशासकीय पुरावे पुसून टाकण्यासाठी परकीय सत्तांनी, विशेषतः इंग्रजांनी जाणीवपूर्वक लष्करी आक्रमणे आणि दस्तऐवज दहन केले. इ.स. १८१८ मधील रायगडच्या वेढ्यात इंग्रजांच्या तोफमारामुळे लागलेल्या आगीत स्वराज्याचा मुख्य ‘दप्तरखाना’ अकरा दिवस जळत राहिला, ज्यामुळे अनेक वर्षांच्या ऐतिहासिक सनदा आणि गुप्त खलिते नष्ट झाले. याशिवाय सिंधुदुर्ग, रेडी किल्ला आणि साताऱ्याच्या चिटणीस वाड्यातील ऐतिहासिक दप्तरेही ब्रिटिशांनी नष्ट केली.

परकीय आक्रमकांनी, विशेषतः इंग्रजांनी शिवकालीन दप्तरे आणि ऐतिहासिक नोंदी जाळण्यामागे निव्वळ लष्करी विजय मिळवणे हा उद्देश नव्हता, तर त्यामागे एक अत्यंत खोल आणि कुटिल राजकीय मनसुबा होता. इंग्रजांना ठाऊक होते की, कोणत्याही समाजाला दीर्घकाळ गुलाम ठेवायचे असेल, तर आधी त्याचा गौरवशाली इतिहास पुसून टाकावा लागतो. शिवरायांच्या पराक्रमाची आणि सुशासनाची कागदपत्रे जिवंत राहिली, तर मराठी माणूस पुन्हा कधीही बंड करून उठू शकतो, ही भीती इंग्रजांना होती. शिवकालीन आज्ञापत्र, छत्रपतींचे गुप्त खलिते आणि राजकीय धोरणे ही पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरू नयेत आणि त्यातून क्रांतीचे स्फुल्लिंग पेटू नये, हाच दप्तरखाना जाळण्यामागील मुख्य लष्करी हेतू होता. इंग्रजांना या देशाचा ‘सांस्कृतिक शिरच्छेद’ करायचा होता. दप्तरे जाळून त्यांना भारताला इतिहासहीन बनवायचे होते, जेणेकरून गुलामगिरीची मानसिक शृंखला कधीच तुटू नये. परंतु, कागदपत्रे जळाली तरी सह्याद्रीची कणखरता आणि लोकमानसातील शिवराय ते जाळू शकले नाहीत.

शिवछत्रपतींचा अखिल भारतीय आणि राष्ट्रीय वारसा

शिवाजी महाराजांचे कार्य केवळ सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांपुरते किंवा मावळ प्रांतापुरते मर्यादित नव्हते; ते तर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या संपूर्ण सांस्कृतिक भूगोलाचे रक्षण करणारे राष्ट्रीय महाकाव्य होते. तामिळनाडूच्या मातीत जन्माला आलेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कोल्हापूरच्या पवित्र भूमीत बोलताना अत्यंत टोकदारपणे आणि कृतज्ञतेने मांडले होते की, “छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर माझे नाव आज सी. पी. राधाकृष्णन ऐवजी दुसरेच काहीतरी असते!”

माझ्या राजाने आपल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडूतील वेल्लोर, तंजावर आणि जिंजी (सेनजी) पर्यंत लष्करी घोडदौड करून दक्षिण भारतात परकीय आक्रमकांचे मनसुबे धूळीस मिळवले होते. यामुळेच दक्षिण भारतातील भव्य मंदिरे, तिथली भाषा आणि संस्कृती सुरक्षित राहिली. ते केवळ एका राज्याचे राजे नव्हते, तर ते संपूर्ण ‘भारतमातेचे भाग्यविधाते’ होते!

सह्याद्रीची चिरंतन गर्जना

इतिहासाचा हा धगधगता पट आणि कल्पित इतिहासाची ही भीषण रूपरेषा समोर ठेवली की एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होते; जर छत्रपती शिवाजी महाराज नावाचे वादळ या मातीत जन्माला आले नसते, तर आज आपण आपली संस्कृती, आपली देवळे, आपली भाषा आणि आपली राष्ट्रीय अस्मिता घेऊन ताठ मानेने जिवंत उभे राहू शकलो नसतो. शिवराय नसते तर आजचा हा ‘अखंड भारत’ केवळ एका कल्पनेत आणि इतिहासाच्या पानातच उरला असता. म्हणूनच, शिवछत्रपती हे केवळ भूतकाळातील एक पराक्रमी राजे नव्हेत, तर ते या राष्ट्राच्या चिरंतन अस्तित्वाचा, अखंडतेचा आणि भविष्याचा सर्वात भक्कम, अजिंक्य पाया आहेत! सह्याद्रीच्या कणाकणातून आजही एकच हुंकार येतो आहे ‘शिवबा’ होते, म्हणून ‘आपण’ आहोत!

– मैत्रेयी गोडसे

अन्य लेख

संबंधित लेख