आजच्या बदलत्या जागतिक आणि सामाजिक समीकरणांमध्ये जेव्हा आपण एकात्मतेच्या आणि राष्ट्रीय अस्मितेच्या गप्पा मारतो, तेव्हा साडेतीनशे वर्षांपूर्वी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला एका नव्या ऊर्जेने प्रेरणा देतो. इतिहास केवळ पुस्तकात बंद करून ठेवण्यासाठी नसतो, तर तो वर्तमानातून भविष्याकडे वाटचाल करताना दीपस्तंभाप्रमाणे काम करतो. यंदा येत्या २७ जूनला तिथीने- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला साजरा होणारा ‘हिंदू साम्राज्य दिवस उत्सव’ म्हणजे केवळ एका ऐतिहासिक घटनेची आवर्तने नव्हेत, तर आजच्या विखुरलेल्या समाजात स्वाभिमानाची आणि स्वत्वाची नवी चेतना जागवणारा धगधगता विचार आहे. सध्याच्या काळात स्वतःची ओळख टिकवून ठेवण्यासाठी आणि वैचारिक-सांस्कृतिक गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी शिवरायांच्या या ‘सार्वभौमत्वाच्या’ सिद्धांताची आज देशाला सर्वात जास्त गरज आहे.
रायगडचा तो अभूतपूर्व सोहळा आणि राजनैतिक अपरिहार्यता
१७ व्या शतकाचा कालखंड डोळ्यांसमोर आणला तर दिसते की, भारतीय उपखंडातील प्रचंड मोठ्या भूभागावर परकीय आणि विध्वंसक सत्तांचे राजकीय वर्चस्व होते. अशा अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक काळात छत्रपति शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दुर्गम कुशीत ‘हिंदवी स्वराज्य’ उभे केले. परंतु, इतिहासकारांच्या भाषेत सांगायचे तर केवळ युद्धे जिंकणे आणि किल्ले काबीज करणे पुरेसे नव्हते. समकालीन जागतिक आणि प्रादेशिक राजकारणात अधिकृत, सार्वभौम राजा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी विधिवत राज्याभिषेक करून घेणे ही काळाची फार मोठी गरज होती. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (६ जून) १६७४ रोजी रायगडावर झालेला हा सोहळा केवळ एका राजाचे राज्यरोहण नव्हते, तर ती भारतीय राजकीय, लष्करी आणि सांस्कृतिक परंपरांच्या पुनरुत्थानाची जणू नांदीच होती!
प्रशासकीय गुलामीला छेद: पारंपरिक कालगणनेचा पुरस्कार
या राज्याभिषेक प्रक्रियेतील एक अत्यंत क्रांतिकारक पाऊल कोणते असेल, तर ते म्हणजे परकीय मानसिकतेचा उदो उदो सोडून स्वतःचे स्वतंत्र ‘शिवशक’ सुरू करणे! राज्याभिषेकापूर्वी स्वराज्याच्या शासकीय दप्तरात ‘सुहूर सन’ (शाहूर सन) या अरबी भाषेवर आधारित सौर-हिजरी कालगणनेचा प्रचंड पगडा होता. पत्रांच्या शेवटी वर्षांची गणना करताना ‘अलफ’ (१०००) किंवा ‘मया’ (१००) असे अरबी शब्द सर्रास वापरले जात. तारखेसाठी ‘छ’ हे संकेताक्षर लिहून मुघल धर्तीवरील महिने नोंदवले जात. पाश्चात्त्य ग्रॅगोरियन कॅलेंडर तर अजून इथे पाय रोवून उभेही नव्हते. शिवरायांनी या प्रशासकीय गुलामगिरीवर थेट प्रहार केला. त्यांनी काशीचे प्रकांड पंडित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक हिंदू पंचांगाचा शासकीय पातळीवर स्वीकार केला.
भारतीय पंचांग पद्धती ही केवळ धार्मिक नसून, सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवर आधारित एक अत्यंत अचूक ‘चांद्र-सौर’ कालगणना आहे. शिवरायांनी परकीय चिन्हे आणि प्रथा उखडून टाकत स्वतःचा ‘राज्याभिषेक शक’ सुरू केला. यामुळे केवळ कागदावरील तारखा बदलल्या नाहीत, तर स्वराज्यातील रयतेला स्वतःच्या संस्कृतीचा अधिकृत प्रशासकीय अनुभव घेता आला. इतिहासकार सर जदुनाथ सरकार, रियासतकार गो. स. सरदेसाई आणि सेतू माधवराव पगडी यांनी शिवरायांच्या या निर्णयाला स्वराज्याला वैधानिक आणि राष्ट्रीय ओळख मिळवून देणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानले आहे.
लष्करी चातुर्य आणि भौगोलिक धोरणांचा मेळ
शिवरायांचे लष्करी आणि भौगोलिक नियोजन किती अचूक होते, हे राज्याभिषेकाच्या तिथीवरून स्पष्ट होते. ज्येष्ठ महिन्याचा उत्तरार्ध म्हणजे महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची चाहूल. पावसाळ्यात सह्याद्रीचे घाट, दऱ्याखोऱ्यांमधील रस्ते निसरडे आणि दुर्गम बनतात. मुघलांच्या अफाट सैन्याला आणि अवजड तोफखान्याला अशा हवामानात रायगडावर चालून येणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाण्यासारखे होते! या नैसर्गिक भौगोलिक कवचाचा चतुर विचार करूनच ही तिथी निवडली गेली असे विख्यात इतिहासकार निनाद बेडेकर यांनी प्रतिपादित केले. त्यातच हा काळ कृषी चक्राशी सुसंगत होता, ज्यामुळे बळिराजाच्या पेरण्यांच्या कामात कोणताही अडथळा न येता हा डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा थाटामाटात पार पडला.
‘होन’ आणि ‘शिवराई’: आर्थिक स्वत्व
शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ, सैन्यासाठीची कडक नियमावली, जलव्यवस्थापन आणि स्वदेशी भाषेच्या संवर्धनासाठी तयार केलेला ‘राज्यव्यवहारकोश’ हे आजही सुशासनाचे सर्वोत्तम मापदंड आहेत.
महाराजांच्या या आर्थिक आणि राजनैतिक स्वायत्ततेची प्रचिती राज्याभिषेकावेळीच आली. सोहळ्यास उपस्थित असलेला ब्रिटिश वकील हेन्री ऑक्झिंडेन याने जेव्हा स्वराज्यात ब्रिटिश नाणी चालवण्याची उर्मट मागणी केली, तेव्हा छत्रपतींनी ती एका फटक्यात फेटाळून लावली! त्यांनी स्वतःचे स्वतंत्र चलन—’होन’ आणि ‘शिवराई’ बाजारात आणून स्वराज्याचे आर्थिक स्वत्व आणि सार्वभौमत्व अबाधित राखले. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे- हा तर केवळ एका विशिष्ट भूप्रदेशासाठीचा लढा नव्हता, तर तो संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक रक्षणाचा भक्कम पाया होता.
वर्तमानकाळातील गरज
आज साडेतीनशे वर्षांनंतरही आपण जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा शिवराज्याभिषेकाचा अभ्यास आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचे तिथीनुसार स्मरण करणे का गरजेचे आहे? कारण आजचा समाज पुन्हा एकदा पाश्चात्त्य आणि परकीय मानसिकतेच्या गर्तेत अडकत चालला आहे. स्वतःच्या भाषेचा, परंपरांचा, स्वतःच्या कालगणनेचा सार्थ अभिमान बाळगून उभे राहिलेले हे हिंदवी स्वराज्य आजही आधुनिक भारताच्या राष्ट्र-उभारणीच्या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रभावी, व्यावहारिक आणि जिवंत मार्गदर्शक सूत्र ठरते. शिवरायांच्या या विचारांचे केवळ स्मरण न करता त्यांचा आदर्श कृतीत उतरवणे, हीच आजच्या काळातील खरी ‘हिंदु अस्मिता’ आहे!
– मैत्रेयी गोडसे