
सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक राजमाता जिजाऊ स्मारकाच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरविकास विभागाच्या विशेष योजनेअंतर्गत हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी मंत्री प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनील भुसारा आणि शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ यांच्या ऐतिहासिक कार्याला आणि त्यांच्या प्रेरणादायी वारशाला साजेसे स्मारक विकसित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या निधीतून स्मारक परिसराचा विकास, आवश्यक पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ स्मारकाच्या विकासाला या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे.
नगरविकास विभागाच्या एका विशेष योजनेअंतर्गत, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ स्मारकासाठी ५० कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
यापूर्वी २०२४ मध्ये या स्मारकाच्या आणि ‘जिजाऊसृष्टी’च्या कामासाठी ५० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. त्या निधीतून सिंदखेड राजा येथील ‘जिजाऊसृष्टी’चे काम सुरू करण्यात आले होते. या कामांवर आतापर्यंत २७ कोटी रुपये खर्च झाले असून प्रकल्प प्रगतीपथावर आहे. मात्र, शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील स्मारकाचे प्रत्यक्ष काम अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी, आणखी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
या निधीतून राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या स्मारकाचा विकास, तसेच परिसरातील रस्ते आणि नजीकच्या सुविधांचा विकास केला जाईल. स्थानिक नगरपालिकेकडून प्रस्ताव मागवला जाईल आणि पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून कामाला गती दिली जाईल; तसेच हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल.