भाईंदर (ठाणे) : “जगातील प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिल्यास महिला हाच विकासाचे दुसरे चाक असल्याचे स्पष्ट होते. महिलांना संधी, शिक्षण आणि आर्थिक सहभाग मिळाल्याशिवाय राष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाईंदर येथे आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम: ग्रामीण महिला नेतृत्व परिषद २०२६’ मध्ये ते मुख्य उपस्थित म्हणून बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच भारतातील पहिल्या महिला विधिमंडळ सदस्य डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या सदस्यत्वाची शताब्दी पूर्ण होत असल्याबद्दल त्यांचे विशेष स्मरण केले. बालविवाह प्रतिबंध आणि देवदासी प्रथा संपुष्टात आणण्यासाठी रेड्डी यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
लखपती दीदींचा संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नारीशक्ती-केंद्रित धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे टप्पे मांडले:
लखपती दीदी: केवळ दीड वर्षांत ३७ लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. यावर्षी हा आकडा ५० लाखांपर्यंत नेण्याचा सरकारचा संकल्प आहे.
राजकीय आरक्षण: २०२९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रथमच ३३ टक्के महिला खासदार निवडून येतील, ज्यामुळे भारताची लोकशाही अधिक सशक्त होईल.
नेतृत्वातील बदल: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आता सक्षमपणे काम करत आहेत. येत्या काळात ‘सरपंच पती’ ही संकल्पना इतिहासजमा होईल आणि महिला स्वतःचे नेतृत्व सिद्ध करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्थव्यवस्थेची भरारी
२०१४ पासून राबवलेल्या महिला सक्षमीकरण योजनांमुळे भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ४ थ्या क्रमांकावर पोहोचली असून, लवकरच ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या परिषदेला मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, पद्मश्री पोपटराव पवार आणि विविध क्षेत्रांतील महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.