कॅलगरी (कॅनडा) : कॅनडातील कॅलगरी येथील ‘फेअरव्ह्यू स्कूल’ने सर्वसमावेशकतेच्या नावाखाली एक अत्यंत वादग्रस्त निर्णय घेतला आहे. रमझान महिन्यात उपवास करणाऱ्या मुसलमान विद्यार्थ्यांना इतरांना जेवताना बघून वाईट वाटू नये, या कारणास्तव शाळा प्रशासनाने चक्क ‘कॅफेटेरिया’मध्ये (भोजनकक्ष) अन्न सेवनावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे उपवास न करणाऱ्या तब्बल ९११ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीत उपाशी राहावे लागत आहे किंवा जेवण्यासाठी दुसरी जागा शोधावी लागत आहे.
लहान मुलांवरही अन्याय
शाळा प्रशासनाने पालकांना पाठवलेल्या अधिकृत ई-मेलमध्ये स्पष्ट केले आहे की, कॅफेटेरियातील भोजन क्षेत्र ‘अन्नमुक्त’ घोषित करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये इयत्ता चौथीतील अवघ्या ९ वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. वास्तविक, इस्लाममध्येही उपवास हे साधारण १३ ते १४ व्या वर्षांनंतर बंधनकारक मानले जातात, मात्र शाळेने लहान मुलांवरही हे निर्बंध लादले आहेत.
इयत्ता ७ वी ते ९ वी मधील विद्यार्थ्यांसाठी पूर्ण एक तासाच्या सुटीत भोजनगृहात खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सध्या कॅनडामध्ये कडाक्याची थंडी असून अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन जेवण करणे किंवा उपाशी राहणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे. सोशल मीडियावर या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, हा इतर विद्यार्थ्यांवर धार्मिक प्रथा लादण्याचा आणि त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.