Saturday, March 28, 2026

गोरखपूरमध्ये सरकारी जमिनीवरील अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर कारवाई

Share

गोरखपूर (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे प्रशासनाने अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत एका अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर फिरवला आहे. आवास विकास कॉलनीजवळील गोडधोइया पुलाशेजारी सरकारी भूमीवर उभारलेला हजरत बाबा जाफर अली शाह ‘मासूम’ हा दर्गा २६ मार्च रोजी पूर्णपणे हटवण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील नाल्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात संबंधित दर्गा हा मोठा अडथळा ठरत होता. सरकारी जागेवरील हे अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केली.

कारवाईची माहिती मिळताच परिसरातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. सुरुवातीला जमावाकडून या कारवाईला काही प्रमाणात विरोध करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आणि प्रशासनाने आपली कणखर भूमिका कायम ठेवल्याने विरोध करणाऱ्यांचा निभाव लागला नाही. त्यानंतर जमावाने शांतता राखली आणि प्रशासनाने आपले काम पूर्ण केले.

या कारवाईच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उत्तर प्रदेश सरकारकडून सध्या सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असून, गोरखपूरमधील ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख