Tuesday, June 23, 2026

लाजलो खरेच आम्ही, ऐकता अशी मराठी…  

Share

१९८० च्या दशकातली गोष्ट. पंतप्रधान राजीव गांधी होते. संसदेचे अधिवेशन सुरू होते. लोकसभेत विरोधी बाकांवर बसलेल्या प्रा. मधू दंडवते यांनी आपल्या भाषणात एक इंग्रजी वाक्प्रचार वापरला. पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना, “तुम्ही ज्या अर्थाने हा वाक्प्रचार वापरता आहात, त्याचा अर्थ तो नाही,” असे सांगितले. त्यावर दंडवते यांनी, “मी योग्य अर्थाचा वाक्प्रचार वापरला आहे. तुम्हाला शंका असेल तर तुम्ही डिक्शनरी बघा,” असे सुनावले. थोड्या वेळाने जेवणाची सुट्टी झाली.

जेवणाच्या सुट्टीनंतर राजीव गांधी सभागृहात आले. त्यावेळी दंडवते आपल्या जागेवर येऊन बसलेले होते. राजीव गांधी त्यांच्या आसनाजवळ आले आणि दिलगिरीच्या सुरात म्हणाले, “मी ऑक्सफर्ड डिक्शनरी बघितली. आपण वापरलेल्या इंग्रजी वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला अभिप्रेत असलेलाच आहे. माझ्या समजण्यात चूक झाली.”

मधू दंडवते अर्थपूर्ण हसले आणि म्हणाले, “मला डिक्शनरी बघण्याचीदेखील आवश्यकता वाटली नाही, कारण मी माझं इंग्रजी कॉलेजमधल्या प्राध्यापकांकडून शिकलो आहे, एअर होस्टेसिसकडून नाही.” वास्तविक मधू दंडवते हे भौतिकशास्त्राचे (Physics) प्राध्यापक. परंतु त्यांचे इंग्रजीवरचे प्रभुत्व बघून आपल्याला अभिमान वाटतो. एका मराठी राजकीय नेत्याचे इंग्रजीवर एवढे प्रभुत्व असेल, तर मग मराठीवर किती असेल, याची कल्पना करून बघा.

काल महाराष्ट्राच्या विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आशा भोसले यांच्या निधनाचा पाच मिनिटांचा लिहून दिलेला शोकप्रस्ताव वाचताना २६ चुका केल्या, अशी बातमी आली आहे. म्हणून उत्सुकतेने त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ ऐकला आणि हसावे की रडावे, तेच कळेना. आशाताईंचे वडील हे मास्टर दीनानाथ मंगेशकर होते. “मास्टर”ना “पंडित” करण्याची आणि दीनानाथ यांना “दीनदयाळ” करण्याची चूक गंभीर अशीच म्हणावी लागेल. कारण राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही भाषेत भाषण केले असते, तरी “मास्टर दीनानाथ मंगेशकर” हे विशेष नाम असल्यामुळे बदलले गेले नसते.

अलौकिकला “आवलौकिक”, असामान्याला “असमान्य” आणि दुर्दम्याला “दुर्दमय” म्हणणे. अशा एकूण ११ शब्दांचे चुकीचे उच्चारण करून त्यांनी अक्षरशः मराठीचे “मालवणी वस्त्रहरण” केले. याला Slip of Tongue देखील म्हणता येणार नाही. उलट राहुल नार्वेकरांच्या ‘जिभेने स्लीपर’ घातली होती, असेच वाटत होते.

“मराठी ललाटीचे वैभव” म्हणताना त्यांनी “ललाटीचे” का म्हटले, हे कोडे कोणालाच उलगडले नाही. तसेच “उडत्या गाण्यातील खट्याळपणा”मधील “चालीच्या” शब्दाला चालते केले.  “संगीताचा वारसा घेऊन…” ऐवजी “संगीताच्या वारसा घेऊन” आणि “दिलेले योगदान” ऐवजी “दिलेली योगदान” म्हणत अशा एकूण सहा चुकीच्या वाक्यरचना करून नार्वेकरांनी मराठीच्या व्याकरणात अमूल्य योगदान दिले आहे.

विरहगीतातील, मधाळ, यथोचित असे साधे-साधे शब्द वाचताना नार्वेकर नऊ वेळा अडखळले. खरं तर मराठी मातृभाषा असलेल्या राहुल नार्वेकरांनी यात अडखळण्यासारखे काय होते? तेही लिहून दिलेले. मात्र त्यावेळी मराठी लाजली आणि सभागृहाबाहेर पळाली, असेच महाराष्ट्राच्या जनतेला जाणवले.

व्याकरण, लिंगभेद, विभक्तीप्रत्यय या सगळ्याची वाट लावणारे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मूळ गाव गोव्यातील नार्वे नसून युरोपातील स्कँडिनेव्हियन देश ‘नॉर्वे’ असावे. ते नार्वेकर नसून ‘नॉर्वेकर’ असावेत, असेच कालच्या त्यांच्या एकूण “अभिजात” मराठीवरून महाराष्ट्राच्या जनतेचा समज झाला, तर कोणीही नवल वाटून घेऊ नये.

अन्य लेख

संबंधित लेख