एकम् सत विप्रा: बहुधा वदन्ति अर्थात सत्य एकच आहे, पण विद्वानांनी ते वेगवेगळ्या प्रकारे मांडले आहे. हा केवळ एक विचार नसून शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीचा जगण्याचा मूलमंत्र आहे. आजचे जग जेव्हा प्रगत तंत्रज्ञान, भौतिक सुबत्ता आणि आर्थिक विकासाच्या शिखरावर पोहोचले आहे; तेव्हाच मानवी मन कमालीचे अस्वस्थ, एकाकी आणि विस्कळीत झाले आहे. आधुनिक पाश्चात्त्य विचारसरणीने जगाला भौतिक प्रगतीची साधने दिली, पण जीवनाचा समग्र दृष्टिकोन देण्यात ती कुठेतरी अपूर्ण ठरली. म्हणूनच जगाला पूर्णत्व देणे हेच भारताचे कार्य आहे. भारताची असलेली प्राचीन मानव पूरक आणि समाज केंद्रित संस्कृतीच ही पूर्णत्वचे कार्य करू शकते. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माननीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारतीय शिक्षण मंडळाच्या परिषदेत मांडलेले विचार समयोचित आहेत.
भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू धर्म केवळ एका भूभागापुरती मर्यादित नसून ती एक जिवंत, सर्वसमावेशक आणि वैश्विक जीवनपद्धती आहे. पाश्चात्त्य जग बऱ्याचदा ‘माझे तेच खरे’ या विचाराने चालते, तर भारतीय संस्कृती ‘जे जे उत्तम आहे, ते माझे’ या अनेकांतवादाच्या आणि समन्वयाच्या तत्त्वावर विश्वास ठेवते. आपण जगाकडे तुकड्या तुकड्यात पाहत नाही; आपण निसर्ग, माणूस, प्राणी आणि ब्रह्मांड या सर्वांना एकाच चैतन्याचा भाग मानतो. म्हणूनच, जेव्हा जग पर्यावरणाचे संकट, मानसिक ताणतणाव आणि युद्धाच्या छायेत होरपळत आहे, तेव्हा भारताचा एकात्मिक दृष्टिकोनच या आव्हानांना पूर्णत्व देऊ शकतो.
भारतीय संस्कृतीची हीच ‘पूर्णत्वाची’ संकल्पना ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजेच संपूर्ण जग हेच एक कुटुंब आहे मानणाऱ्या या संस्कृतीने शेकडो आक्रमणे झेलूनही आपले अस्तित्व आणि औदार्य टिकवून ठेवले आहे. भारतीय संस्कृती आपल्या अध्यात्म, विज्ञान, शिक्षण पद्धती आणि जीवनमूल्यांच्या माध्यमातून जगातील अपूर्णतेला पूर्णत्वात बदलण्याची ताकद ठेवते आणि हेच भारताचे खरे वैश्विक दायित्व आहे.
सर्वसमावेशक संस्कृती
भारतात कुशन, शक, हूण ही आक्रमणकारी आले, त्यानंतर काही शतके राज्य केलेले मुघल आणि इंग्रज आले; तरीही भारतीय संस्कृती नष्ट झाली नाही. उलट आपल्या संस्कृतीची समावेशकता इतकी अफाट आहे की जे आक्रमक म्हणून आले ते याच मातीचे होऊन गेले. ‘कुशन’ वंशाचा राजा कनिष्क याचे उत्तम उदाहरण आहे. आक्रमक वंशाचा असलेला कनिष्क पुढे बौद्ध धर्माचा आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा पाठीराखा बनला. मुघल काळात शहजादा दारा शुकोह याने उपनिषदांचा अभ्यास करून त्यांचा फारसीत अनुवाद केला. अनेक इंग्रज अधिकारी भारताचा नाश करायला आले, पण येथील तंत्र आणि दर्शन शास्त्राचा अभ्यास करून त्याचे प्रशंसक बनले. भारतीय संस्कृतीने कोणावरही तलवार किंवा सक्तीने आपले विचार लादले नाहीत, तर आपल्या उदात्त आणि अथांग जीवनमूल्यांच्या बळावर बाहेरून आलेल्या प्रवाहांना स्वतःमध्ये सामावून घेऊन अधिक समृद्ध केले.
शत्रूचा नव्हे, शत्रुबुद्धीचा विनाश
जगातील अन्य विचारसरणी किंवा संस्कृती या शत्रूचा सर्वनाश करण्याच्या सिद्धान्तावर चालतात. जिथे ‘आम्ही आणि ते’ असा भेद केला जातो, तिथे युद्धाच्या ठिणग्या उडतात. याउलट हिंदू संस्कृती ही जगातील एकमेव अशी संस्कृती आहे, जी सांध्यप्रकाशात दिवा लावताना देखील देवाकडे प्रार्थना करताना ‘शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते…’ म्हणते म्हणजेच इथे शत्रू माणसाला मानले जात नाही, तर माणसाच्या मनात असलेल्या विकृत विचारांना (शत्रुबुद्धीला) शत्रू मानले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम. रावणाला घायाळ केल्यानंतर श्रीराम लक्ष्मणला सांगतात की, रावण हा प्रकांड पंडित आहे, त्याच्या मृत्यूच्या आधी त्याच्या चरणाशी बसून राजनीती आणि ज्ञानाचे धडे घे. महाभारतात युद्धाच्या आधी भगवान श्रीकृष्णांनी शांततेचा शेवटचा प्रयत्न म्हणून ‘शांतिदूत’ बनून कौरवांच्या छावणीत जाणे पसंत केले. ही संस्कृती माणसाचा जीव घेण्यावर नाही, तर हृदयपरिवर्तन करण्यावर विश्वास ठेवते, कारण प्रत्येक जिवात एकच आत्मा वास करतो ही आपली धारणा आहे.
नफा विरुद्ध सृष्टीचे कल्याण
आजचे विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान हे बऱ्याचदा बाजारपेठ आणि कॉर्पोरेट नफा या संकल्पनेवर आधारलेले आहे. या प्रगतीला निसर्गाचे शोषण करून स्वतःची तिजोरी भरायची आहे, ज्याचा परिणाम आज ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटात पाहायला मिळत आहे. याउलट भारतीय संस्कृती समस्त मानवाचा फायदा आणि सृष्टीचे कल्याण पाहते. आपल्याकडे विज्ञानाला अध्यात्माची जोड आहे. पाश्चात्त्य जग झाडांना केवळ ‘लाकूड आणि पैसा’ मानते, तर भारत जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या वाणीतून सांगतो ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.’ आम्ही झाडे, डोंगर, नद्या यांच्यात देव पाहिला, कारण जर निसर्ग टिकला तरच मानव टिकेल, हे आम्हाला ठाऊक होते. भारताची ‘आयुर्वेद’ आणि ‘सेंद्रिय शेती’ ही पारंपरिक पद्धती जमिनीचा कस न घालवता, माणसाला दीर्घायुष्य देणारी आहे. आधुनिक विज्ञान फक्त भौतिक सोयी देते, पण भारतीय विचार हा निसर्गाशी तादात्म्य साधून शाश्वत विकास कसा करावा, याचा परिपूर्ण मार्ग दाखवतो.
अनेकान्ततवाद आणि विचारस्वातंत्र्य
भारतीय संस्कृतीने कधीही एकाच विचाराचा हेका धरला नाही. एकाच वेळी ईश्वर मानणारा आस्तिक आणि देव न मानणारा नास्तिक उदा. चार्वाक दर्शन हे दोन्ही प्रवाह याच मातीत एकत्र वाढले. आदि शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यातील शास्त्रार्थ याचे श्रेष्ठ उदाहरण आहे. या वादात मंडन मिश्र यांच्या पत्नी उभय भारती यांना न्यायाधीश बनवले गेले होते, आणि त्यांनी आपल्या पतीचा पराभव झाल्याचे निष्पक्षपणे घोषित केले. सत्याचा शोध हा वादातून नव्हे तर संवादातून लागतो, हा उच्च विचार भारतीय संस्कृती जगाला देते.
जागतिक संकटात आधुनिक भारताची भूमिका
जेव्हा जगातील बलाढ्य आणि श्रीमंत देश स्वतःच्या स्वार्थासाठी लसींचा साठा करून बसले होते, तेव्हा भारताने स्वतःच्या गरजा सांभाळून जगातील १०० हून अधिक गरीब आणि विकसनशील देशांना कोट्यवधी कोरोना प्रतिबंधक लसींचे मोफत आणि सवलतीच्या दरात वाटप केले. शेजारील देशांपासून ते आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील दुर्गम देशांपर्यंत भारताची ही मदत पोहोचली. ही केवळ औषधांची निर्यात नव्हती, तर ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः’ या भारतीय जीवनमूल्याचे जागतिक प्रकटीकरण होते.
म्हणूनच, जगाला पूर्णत्व फक्त भारतच देऊ शकतो
अपूर्णतेकडून पूर्णतेकडे जाण्याचा हा मार्ग केवळ भौतिक प्रगतीने साध्य होऊ शकत नाही म्हणूनच आजचे जग सर्व काही असूनही एका आंतरिक पोकळीचा सामना करत आहे. पाश्चात्त्य संस्कृतीने जगाला बाह्य जग जिंकण्याचे तंत्रज्ञान दिले, पण अंतर्मन जिंकण्याचे विज्ञान केवळ भारताकडेच आहे. जेव्हा जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे असते, तेव्हा भारत विचारस्वातंत्र्य देतो, भारताची ‘शत्रुबुद्धी विनाशाय’ ही संकल्पना युद्धाऐवजी शांततेचा मार्ग दाखवते, आणि भारताची ‘निसर्गपूजक जीवनशैली’ पर्यावरणाचा समतोल राखायला शिकवते. कोविड महासंकटात भारताने व्हॅक्सीन मैत्रीच्या माध्यमातून जगाला आधी जीवनदान दिले. हाच तो पूर्णत्वाचा दृष्टिकोन आहे जो केवळ स्वतःचा विचार न करता समस्त सृष्टीच्या कल्याणाचा विचार करतो. जिथे इतर विचारसरणींचे आणि संस्कृतींचे ज्ञान संपते, तिथून भारतीय तत्त्वज्ञानाची कवाडे उघडतात. जोपर्यंत विज्ञानाला अध्यात्माची, नफ्याला मानवतेची आणि प्रगतीला मूल्यांची जोड मिळत नाही, तोपर्यंत हे जग अपूर्णच राहील. हीच ती जोड देण्याची क्षमता, म्हणजेच जगाच्या या अपूर्णतेला विश्व पूर्णतेत बदलण्याची ताकद केवळ आणि केवळ भारताच्या एकात्मिक जीवनदृष्टीत आहे. म्हणूनच, आजच्या काळात जगाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व फक्त भारतच देऊ शकतो.
सेवा, स्वावलंबन आणि समरसता
संघाचे कार्य जगभरातील सर्वांत मोठे सेवाकार्य बनले आहे. भारतीय शिक्षण मंडळ सारख्या संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचे भारतीयीकरण करणे, विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणे, आणि समाज मनातून जातिभेद नष्ट करून ‘सामाजिक समरसता’ निर्माण करणे, हे संघाचे प्रत्यक्ष कार्य आहे. हे कार्य कोणत्याही राजकीय लाभासाठी नसून, भारताला सामर्थ्यशाली बनवून जगाला ‘पूर्णत्व’ देण्याच्या मोहिमेत आपले योगदान देणारे आहे.