Wednesday, July 8, 2026

भारतीय पर्यटकांना आशियाई देशांच आकर्षण !

Share

“भारतीय पयर्टकांची आशियाई देशांना पसंती हा ट्रेंड भारतीय कुटुंबे परदेशातील सुट्ट्यांचे नियोजन कसे करतात ? यातील व्यापक विचारांचे  प्रतिबिंब आहे. भारतीय पर्यटक अजूनही उत्कृष्ट, सुनियोजित  आणि  नवीन अनुभव मिळतील या शोधात आहेत. त्याचप्रमाणे ते बजेट, व्हिसाची मुदत, विमान प्रवासाच्या  सवलती , पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि एकूण सोयीसुविधा बद्दल अधिक जागरूक होत आहेत. या बदलामुळे आशियाई देशांना मोठा फायदा होत आहे.” हे पिकयुअरट्रेलचे सीईओ आणि सह-संस्थापक हरी गणपती यांच भारतीय पर्यटकांच्या बाबतीत मत आहे. भारतीय प्रवाशांचा या प्रकारचा हा  ट्रेंड मागील काही वर्षात पर्यटन क्षेत्रात जाणवतो आहे. 

मधल्या दोन-तीन वर्षांच्या काळामध्ये भारतीय राजकारणाने आशियाई देशांशी संबंधांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे भारतातले उद्योग स्नेही आणि पर्यटन उत्सुक लोक मोठ्या प्रमाणावर आशियाई देशांना प्राधान्य देत आहेत. आतापर्यंत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये युरोपच्या पर्यटन स्थळांना पसंती देणारे भारतीय मध्यम वर्गातले कुटुंब, आज आशियाई देशातील प्रमुख सांस्कृतिक स्थळांना पसंती देत आहेत. चालू उन्हाळी हंगामात (मे-जून २०२६) भारतीय पर्यटकांनी युरोपकडे स्पष्टपणे पाठ फिरवली असून, आशियातील समृद्ध हिंदू-बौद्ध वारसा लाभलेली तीर्थक्षेत्रे, भव्य मंदिरे आणि भारतीय खाद्यसंस्कृतीला पूरक असणाऱ्या देशांना आपली पहिली पसंती दिली आहे.

देशातील काही महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्रातल्या कंपन्या ‘क्लिअरट्रिप’ (Cleartrip), ‘यात्रा ऑनलाइन’ (Yatra Online) आणि ‘मेकमायट्रिप’ (MakeMyTrip) यांच्या कडे नोंदणीकृत असलेले भारतीय पर्यटक यांच्याकडे बघता या एकूण सांस्कृतिक पर्यटन  बदलावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भारतीय पर्यटक आणि जागतिक पर्यटक हे मोठ्या प्रमाणात सुरक्षित वातावरणाच्या अनुभवाचा  विचार करतात. औद्योगिक क्षेत्रात नवीन गुंतवणुकीचा विचार करत असताना या पर्यटनाचा फार मोठा फायदा सहाजिकच पर्यटन करणाऱ्या व्यक्तींना होतो.  ‘यात्रा ऑनलाइन’च्या अंतर्गत आकडेवारीनुसार,  जागतिक पर्यटकांमध्ये युरोपामध्ये फिरण्याचा विचार अनेक पर्यटकांमध्ये कमी होत असल्याची आकडेवारी दिसते. 2024 मध्ये युरोपामध्ये जाणारे एकूण जागतिक प्रवाशांमध्ये 25 ते 30 % लोक होते. त्यामध्ये 2025 मध्ये घसरण होऊन 23% वरून, 2026 मध्ये हे प्रमाण 15% च्या  नीचांकावर आलेल आहे. याउलट मे जून 2026 दरम्यान आशियाई देशांमध्ये बुकिंग मध्ये (एकटे प्रवासी,  कुटुंबांचा प्रवास आणि  व्यवसायानिमित्त प्रवास)  वर्षाला २५% ते ३५% ची  मोठी वाढ आहे. 

शेंगेन व्हिसा व  तीर्थाटन प्रवास

युरोपीय देशांमध्ये फिरत असताना ‘शेंगेन व्हिसा’ ची गरज मोठ्या प्रमाणात भासते. दशकानुदशके ‘शेंगेन व्हिसा’ मिळविण्यासाठी ही अत्यंत किचकट, वेळ खाऊ प्रक्रियेतुन जाव लागत. लाखो रुपये खर्च करण्याची तयारी असूनही भारतीयांना व्हिजासाठी अनेक महिने ताटकळत राहाव लागायच. आता काही अंशी ही प्रक्रिया जरी सुलभ झाली असली तरीही आशियाई देशांमध्ये प्रवास करताना थेट ‘व्हिसा-मुक्त’ (Visa-free) प्रवेश किंवा ‘ऑन-अरायव्हल व्हिसा’ ची सवलत दिली आहे. भारतीय प्रवाशांनी आपल्या आत्मसन्मानाला प्राधान्य देत युरोपीय कटकटींना नकार दिला आहे. 

भारतीय पर्यटक हा संस्कृती प्रवण असल्याकारणाने ते ‘तीर्थाटन’ प्रवासाला प्रथम मान्यता देतात. भारतीय पर्यटकांची ही मूळ ओळख आता आंतरराष्ट्रीय पर्यटनातही अधोरेखित होत आहे. भारतामध्ये मागील काही दशकात या सर्व आशियाई देशांमध्ये  ही नवी सांस्कृतिक ओळख पुन्हा पुनर्जीवित होत असताना, भारतीय हे या आशियाई देशांमधली असलेल्या संस्कृतीशी तोंड ओळख करून घेत आहेत. त्यामुळे या सर्व आशियाई देशांमध्ये फिरत असताना सांस्कृतिक आकृतीबंध पुन्हा निर्माण होताना दिसत आहेत. 

कंबोडिया: जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असलेले ‘अंगकोर वाट’ पाहण्यासाठी भारतीयांची गर्दी होत आहे.

इंडोनेशिया (बाली): जिथे आजही प्रत्येक चौकात रामायण-महाभारतातील पात्रांचे पुतळे आहेत आणि हिंदू संस्कृती जिवंत आहे, ते ठिकाण भारतीयांचे हक्काचे घर बनले आहे.

श्रीलंका: ‘रामायण सर्किट’ (अशोक वाटिका, रावण कट्टा) च्या माध्यमातून भारतीय प्रवाशांना त्यांच्या श्रद्धेची ठिकाणे परदेशात अनुभवायला मिळत आहेत.

पारंपरिक खाद्यसंस्कृती व युरोपातील युद्धजन्य परिस्थिती

आशियाई देशांमध्ये बनणारे खाद्यपदार्थ यांचा भारतातल्या खाद्य संस्कृतीशी काही प्रमाणात साधर्म्य गुण आढळतो. त्यामुळे या आशियाई देशांमध्ये असलेले पारंपारिक खाद्यपदार्थ आणि कौटुंबिक जीवन मूल्यांची जडणघडण ही भारतीयांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करते. आशियाई संस्कृतीतील आदरातिथ्य आणि कौटुंबिक वातावरण भारतीय मूल्यांशी तंतोतंत जुळणारे असल्याने, बहु-पिढी गटांना (आजी-आजोबांपासून नातवंडांपर्यंत) येथे प्रवास करणे अधिक सुरक्षित आणि सुखावह वाटते.

युरोपमध्ये सध्या सुरू असलेली अंतर्गत युद्धजन्य परिस्थिती, रशिया-युक्रेन संघर्ष आणि पश्चिम आशियातील तणावामुळे तिथले हवाई क्षेत्र कमालीचे असुरक्षित झाले आहे. प्रवासाचे मार्ग लांबल्यामुळे विमानांची तिकिटे गगनाला भिडली आहेत. अशा वेळी, पाश्चात्त्य देशांच्या युद्धाच्या सावटाखाली आणि आर्थिक मंदीच्या वातावरणात जाण्याऐवजी, भारतीय प्रवाशांनी भारताचे परममित्र असलेल्या आणि सुरक्षित वातावरण लाभलेल्या आशियाई देशांची निवड करून अत्यंत शहाणपणाचा निर्णय घेतला आहे.

पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांच मत

क्लिअरट्रिपच्या मुख्य विपणन आणि महसूल अधिकारी पल्लवी सक्सेना यांनी सांगितले की, “पश्चिम आशियातील सद्य परिस्थितीमुळे प्रवासमार्ग निवडीबाबत सावधगिरी वाढली आणि युरोपमधील पर्यटन स्थळांवरील वाढलेल्या भाड्यांनी पर्यटनाची मानसिकता कमी केली. या दोन्ही गोष्टींनी मिळून, आशियाई देशांकडे कल वाढला आहे. या वर्षी आशियामध्ये अधिक पर्यटन स्थळे आणि अल्माटीसारख्या नवीन बाजारपेठांचा समावेश झाल्याने पूर्वेकडील पर्यटन आकर्षित करते.”

यात्रा ऑनलाइनचे हवाई आणि हॉटेल व्यवसाय विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत मलिक यांनी स्पष्ट केले की,”युरोप हे नक्कीच एक जागतिक पर्यटकांना मोहात पाडते, परंतु वाढलेल्या विमान प्रवास भाड्याने आणि प्रवासाच्या एकूण खर्चाने प्रवासाची स्थळ निवडताना तो खर्चाचा हिशोब खिशाला परवडत नाही. त्यामुळेच मे-जून २०२६ दरम्यान आशियाच्या बुकिंगमध्ये मोठी वाढ तर युरोपमध्ये घट दिसते आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदिनीं जागतिक स्तरावर निर्माण केलेली भारताची मजबूत पत ही , ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भावनेतून आली आहे. सरकारने  आशियाई देशांशी दृढ केलेले सांस्कृतिक संबंध आणि भारतीयांच्या मनात जागृत झालेला सांस्कृतिक अभिमान यांमुळेच आज जागतिक पर्यटनाचे नियम बदलत आहेत. युरोपच्या मागणीत झालेली १५% पर्यंतची घट हे स्पष्ट संकेत देत की, आगामी काळात जागतिक पर्यटन क्षेत्राची दिशा पाश्चात्त्य जग नाही, तर भारतीय पर्यटकांची सांस्कृतिक पसंती आणि आर्थिक ताकद ठरवणार आहे. 

अन्य लेख

संबंधित लेख