उन्हाने लाही-लाही झाल्यानंतर कधी एकदा पाऊस पडतो असे सगळ्यांनाच झालेले असते. पाऊस पडला की हवेत थोडा गारवा येतो आणि हुश्श वाटते. पावसामुळे निसर्गाचे पालटलेले रुप मोहून टाकणारे असते. हेच रुप पाहण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाण्याचे बेत ठरतात. मित्रमंडळी किंवा कुटुंबासोबत पावसाचा आनंद लुटण्यासाठी आपण शहराच्या जवळपास कुठे ना कुठे तरी आवर्जून जातोच. पाऊस म्हटला की आपल्याला साहजिकच हवेतला सुखद गारवा, भजी, गरमागरम चहा, कणीस यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. वर्षा सहल म्हणजे सगळीकडे मस्त हिरवेगार डोंगर, रस्त्यातून जाताना दिसणारे धबधबे आणि प्रसन्न वातावरण. पावसाळ्याच्या काळात या सगळ्याचा आनंद लुटायलाच हवा. पण ही मजा करताना आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. पावसाळ्यात आहार, नैसर्गिक आपत्ती, पाण्यातून पसरणारे विकार यांकडे विशेष लक्ष द्यायला हवे. कारण विषाणू आणि किटकांसाठी हा सगळ्यात चांगला काळ असल्याने या काळात आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. मग वर्षा विहाराचा आनंद लुटताना कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. याविषयी काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स…
१. भिजताना हे लक्षात ठेवा – लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पावसाळ्यात भिजायला आवडते. पण भूरभूर किंवा कमी पाऊस असेल तर ठिक आहे. धो धो पावसात खूप जास्त भिजलो तर त्याचा नक्कीच त्रास होऊ शकतो. भिजल्यानंतर केस, डोकं आवर्जून कोरडं करा. केसांत आणि डोक्यात पाणी मुरले तर त्यामुळे आजारपण येण्याची शक्यता असते. तसेच बाहेर फिरायला गेल्यावर आपण ओले होतो आणि तसेच गाडीत किंवा एखाद्या हॉटेलमध्ये बसतो. पण ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहिले आणि त्यावर गार वारा लागला तर गारठ्यानी सर्दी-ताप होऊ शकते. त्यामुळे पावसाचा आनंद घेताना तब्येतीची काळजी घ्यायला हवी.
२. आहार जपायला हवा – पावसाळ्यात बाहेर गेलो की आपण साहजिकच बाहेरचेच खातो. यामध्ये तेलकट पदार्थांचा समावेश जास्त असतो. पण जास्त प्रमाणात तेलकट खाल्ल्याने घशाला त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात शक्यतो ठेवलेले, शीळे, उघडे, आंबवलेले अन्न खाणे टाळायला हवे. अन्यथा पावसाळ्याच्या दिवसांत पोट खराब होणे, उलट्या, जुलाब यांसारखे पोटाचे विकार होऊ शकतात. शक्यतो उकळून गार केलेले पाणी प्यायला हवे. त्यामुळे घरातून निघतानाच सोबत भरपूर पाणी घ्यायला हवे. बाहेर पाणी पित असाल तर शक्यतो स्वच्छतेची काळजी घेऊनच पाणी प्यावे. पावसाळ्यात गढूळ पाण्यामुळेही आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात.
३. दूषित पाण्याशी संपर्क टाळा – बरेचदा आपण फिरायला गेल्यावर आपण उत्साहात आणि आनंदात असतो. अशावेळी आपल्या आजुबाजूला दूषित पाणी असू शकते. या पाण्याशी संपर्क आल्यास त्वचेच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घ्या. तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी डासही जास्त प्रमाणात असतात. जे चावल्याने आपल्याला डेंगी, मलेरिया यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
४. दरड, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींकडे लक्ष द्या – घाट रस्त्यातून शक्यतो प्रवास टाळायला हवा. कारण अतिवृष्टी झाल्यास घाटात दरड कोसळण्याची भिती असते. तसेच खूप जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास रस्ते खचणे, नदीला पूर येणे, झाड पडणे यांसारख्या नैसर्गिक आपत्ती ओढवू शकतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या सहलीचे नियोजन करायला हवे. याशिवाय वीजेच्या खांबांना, भिंत, ओल्या तारा यांना हात लावणे टाळायला हवे कारण वीजेचा धक्का बसून जीव धोक्यात जाण्याचीही शक्यता असते.
– सायली जोशी-पटवर्धन